मूल जन्माला आल्यापासून किमान ६ ते ८ महिन्यांपर्यंत पूर्णवेळ आईकडे असते. दूध पिण्यासाठी, झोपण्यासाठी आणि इतरही सर्व गोष्टींची काळजी प्रामुख्याने आईच घेत असते. आईच्या गर्भाच्या स्पर्शापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे जन्माला आल्यानंतरही सुरूच असतो. याशिवाय बाबा, आजी-आजोबा आणि घरातील इतर मंडळींचा स्पर्श बाळाला हळूहळू कळायला लागतो. बाळ जसे रांगायला, बोलायला लागते तसा आई आई करणे कमी होईल असे आपल्याला वाटते खरे. पण ३ वर्षाचे होईपर्यंत हे बाळ सतत आईला चिकटलेले असते. खाण्या-पिण्याशिवाय इतरही सगळ्याच गोष्टींसाठी त्याला सारखी आई लागते (Why Babies Need Closeness Till 3 Years Especially Form Mothers).
आईने सतत आपल्याला कडेवर घ्यावे, जवळ घेऊन बसावे, आपल्याशी खेळावे अशी त्या कोवळ्या जीवाची अपेक्षा असते. पण घरातली कामं, ऑफीस, इतर जबाबदाऱ्या यांच्यामध्ये आपण बाळाची ही अपेक्षा १०० टक्के पूर्ण करु शकतोच असे नाही. पण तरीही बाळाला आई सतत सोबत हवी असावी असं वाटणं अगदीच स्वाभाविक आहे. तुम्ही जितका वेळ तुमच्या बाळाला जवळ घ्याल, त्याच्याशी खेळाल, शरीराने आणि मनाने त्याच्या सोबत राहाल तेवढा त्या बाळाचा ताण कमी होतो आणि पर्यायाने तुमचाही ताण कमी होतो. याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करुया.
१. आई भावनिक आणि शारीरिकरित्या जवळ असेल तर बाळांना तणावापासून संरक्षण मिळते. तसेच त्यांच्या भावनिक गोष्टींचे योग्य पद्धतीने नियमन होऊ शकते. हे दोन्ही मेंदूच्या निरोगी विकासासाठी अतिशय आवश्यक असते. भविष्यात मुलांनी चांगले वागावे यासाठी हे अतिशय आवश्यक असते.
२. पहिल्या ३ वर्षात आपल्याला दिवसभरात येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या ताणापासून प्रत्येक क्षणी आई आपले संरक्षण करत असते. त्यामुळे आपण संवेदनाक्षम होतो आणि भविष्यात ताणाचा सामना करु शकतो.
३. आई आणि बाबा दोघांची काळजी अतिशय महत्त्वाची असते. बायोलॉजिकली आपण त्या दोघांमध्ये अदलाबदल करु शकत नाही. मात्र मुलांच्या निकोप वाढीसाठी ही दोन्हीही चाके अतिशय महत्त्वाची असतात.
४. आईच्या शरीरात तयार होणारे ऑक्सिटोसिन हार्मोन आई आणि मूल यांच्यातले बॉंडींग स्ट्रॉंग होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. या हार्मोनमुळे कोणतीही आई मुलाचे अतिशय संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक पालनपोषण करु शकते.
५. त्याच परिस्थितीत पुरुषांमध्ये तयार होणारे ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन मुलांना अधिक खेळकर होण्यास उत्तेजित करतात. मुलांनी स्वतंत्र व्हावे आणि जास्तीत जास्त एक्सप्लोअर करावे यासाठी वडील प्रोत्साहन देतात.