मुलं मोठी होवू लागली की सर्वच गोष्टी आई बाबांना सांगत नाही. काही गोष्टी सांगतात, काही लपवतात. काही गोष्टी फिरवून सांगतात. पालकांना हळूहळू कळायला लागतं की आपली मुलं खोटी बोलू (children lie) लागली आहेत. आपलं मूल आपल्याशी खोटं बोलत आहे ही जाणीव कोणत्याही पालकासाठी वेदनादायी अशीच असते. आपलं मूल खोटं बोलतं याचं दु:ख करण्यापेक्षा ते खोटं का बोलतं (why children lie) याची कारणं शोधून त्यांची खोटं बोलण्याची सवय घालवणं (what to do when children lie) ही महत्वाची बाब आहे. याबाबत मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे.
Image: Google
मुलं खोटं का बोलतात
तज्ज्ञांच्या मते मुलांच्या खोटं बोलण्यामागे प्रामुख्याने चार कारणं आढळून येतात.
1. आई बाबा रागावतील म्हणून...
मुलांना आपल्या आई वडिलांचा स्वभाव चांगलाच माहित असतो. काय झालं की आई बाबा लाड करतात, कोणत्या गोष्टींवर ते रागवतात, ते रागवतात म्हणजे काय करतात याचा मुलांना चांगलाच अंदाज असतो. आई बाबा मुलांच्या चुकीच्या गोष्टींवर चिडल्यानंतर त्यांच्यावर मोठ्यानं ओरडणं, त्यांना मारणं, त्यांना शारीरिक शिक्षा करणं या कृती करत असतील तर मुलं आई वडिलांच्या रागवण्याला घाबरतात. त्यामुळे आई वडील रागावतील अशी गोष्ट त्यांच्याकडून घडली की आई बाबांची संतापातली ती कृती चुकवण्यासाठी जे घडलं ते सांगतच नाही. त्याबद्दल खोटं बोलतात.
2. आई बाबाच खोटं बोलतात म्हणून
मुलं अनेक गोष्टी आपल्या आई बाबांकडे बघून, मोठ्यांचं वागणं बोलणं बघून शिकतात. मुलांसमोर जर आई बाबाच खोटं बोलत असतील तर मुलंही सहज खोटं बोलायला शिकतात. मुलांच्या अनेक प्रश्नांवर आई बाबांकडे योग्य उत्तरं नसतील तर आई बाबा मुलांशी त्याबद्दल खोटं बोलतात. कालांतरानं आपल्याशी आई बाबा खोटं बोलले हे मुलांनाही कळतं. त्यातून त्यांनाही ज्यावर समर्पक उत्तरं देता येत नाही त्यावर खोटं बोला असा धडा मिळतो.
3. चोरी लपवण्यासाठी
काहीतरी चुकीचं घडलं तर ते लपवण्यासाठी मुलं खोटं बोलतात. अमूक् गोष्ट चुकीची घडली आता यावर घरातले मोठे चिडणार, मारणार, रागावणार या कृतींचा अंदाज असल्यानं गोष्टी चुकीच्या घडल्या तर त्या आई बाबांना कळणार नाही अशा तऱ्हेनं वागण्या बोलण्याच्या सवयीतून मुलं खोटं बोलतात.
4. नैराश्यातून खोटं बोलतात
लहान मुलांनाही वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक विकार जडतात. मुलं जर नैराश्यात असतील तर ते मोठ्यांशी खोटं बोलतात. आपलं म्हणणं खरं करण्यासाठी, दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी खोट्याचा आधार घेतात. आपली मुलं मानसिक आजारामुळे तर खोटं बोलत नाही ना हे समजून घेण्यासाठी आई बाबांना आपली मुलं आधी समजणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची गरज आहे हे पालकांनी ओळखणं गरजेचं आहे.
Image: Google
मुलं खोटं बोलताय हे कसं ओळखावं?
मुलांच्या खोटं बोलण्यामागे विशिष्ट कारणं असतात. ही कारणं ओळखणं जितकं गरजेचं तेवढंच आपली मुलं खोटं बोलत आहे हे ओळखणंही महत्वाचं आहे. मुलांच्या वागण्या बोलण्याचं नीट निरीक्षण केल्यास मुलं कधी आणि काय खोटं बोलत आहेत हे सहज ओळखता येतं.
1. मुलं जे घडलं आहे ते लपवण्यासाठी जेव्हा गोष्टी रचू लागतात तेव्हा ते काही तरी लपवत आहे, खोटं बोलत आहे हे समजावं.
2. मुलं जे लपवू पाहात आहे, त्याबद्दल घरातल्या मोठ्यांनी त्यांना प्रश्न विचारल्यावर ते चिडत असतील तर..
3. एखादी गोष्ट मुलं खोटं बोलत असतील तर नेहेमीपेक्षा जोरात बोलतात.
4. मुलांना काही लपवायचं असल्यास/ लपवत असल्यास त्यासंबंधीचे प्रश्न ते टाळतात, वेगळाच विषय काढण्याचा प्रयत्न करतात.
5. मुलं खोटं बोलत असतील तर आई बाबांशी नजरेला नजर मिळवत नाही.
6. विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरं द्यायला मुलं गरजेपेक्षा जास्तच वेळ घेत असतील, बोलताना, उत्तर देतांना अडखळत असतील तर मुलं खोटं बोलत आहे हे सहज कळतं.
Image: Google
मुलांची खोटं बोलण्याची सवय सुटणार कशी?
मुलांना खोटं बोलण्याची सवय आपोआप लागत नाही. त्यामागे विशिष्ट कारणं असतात. त्यातली बरीचशी कारणं घरातल्या मोठ्यांशी, आई बाबांशी निगडित असतात. त्यामुळे मुलांची खोटं बोलण्याची सवय सोडवण्यासाठी पालकांना थोडे प्रयत्न करावे लागतात, जाणून बुजून काही गोष्टी कराव्या लागतात.
1. मुलं आई बाबांच्या धाकानं गोष्टी लपवतात, खोटं बोलतात. तेव्हा आई बांबानी आपली मुलं मोकळेपणानं आपल्याशी बोलायला हवी असं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे.
2. मुलं खोटं बोलता आहेत हे कळल्यावर त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा, त्यांना शिक्षा देण्यापेक्षा खोटं बोलण्याचे काय परिणाम होतात, यामुळे मुलांचं काय नुकसान होवू शकतं याबाबत मुलांना प्रेमानं जाणीव करुन दिल्यास मुलांची खोटं बोलण्याची सवय कमी होते.
3. मुलं स्वत:हून झालेली चूक सांगत असतील तर त्यांना चुकले म्हणून रागावण्यापेक्षा त्यांनी चूक कबूल केली याबाबत त्यांचं कौतुक करुन पुढे अशी चूक होवू नये म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आई बाबांनी सांगणं गरजेचं आहे. या कृतीतून आई बाबा आपलं ऐकतात, आपल्याला समजून घेतात हा विश्वास मुलांमध्ये निर्माण होतो. या विश्वासाच्या बळावरच मुलांना आई बाबांपासून काही लपवण्याची गरज नाही, त्यांच्याशी खोटं बोलण्याची गरज नाही याची जाणीव होते.
4. मुलांना खोटं बोलण्याची सवय लागली असल्यास ती तुटण्यास जरा वेळ लागतो. त्यबाबतीत पालकांनी जरा संयम राखायला हवा. मुलांना आज सांगितलं तर मुलांनी उद्यापासून नीटच वागायला हवं असा आग्रहा धरणं चुकीचं आहे. मुलांशी याबाबत वारंवार बोलून, आम्ही तुझं ऐकतो, तुला समजून घेतो हा विश्वास देऊनच ही खोटं बोलण्याची सवय घालवता येते.