Join us  

काही केल्या मुलं पालकांचं ऐकतच नाहीत, दुर्लक्ष करतात? तज्ज्ञ सांगतात, २ महत्त्वाची कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 5:33 PM

Why Children’s Don’t Listen to Their Parents Parenting Tips : मुलं आपलं का ऐकत नाहीत याचा शांतपणे विचार करुन मुलांशी कसे वागले तर ते ऐकतील याचा शोध पालकांनी घ्यायला हवा.

ठळक मुद्दे एकदा सांगितलेला नियम कायम आणि सगळ्यांकडून पाळला जायला हवा.  मुलांसमोर आपण सतत मोबाइल वापरत असू तर त्यांना मोबाइल वापरु नको असे सांगून ते ऐकणार नाहीत.

आपल्या मुलांनी आपलं सगळं ऐकावं अशी प्रत्येक पालकांची किमान अपेक्षा असते. पण मुलं काही केल्या आपलं ऐकत नाहीत. ते असं का करतात, विनाकारण आपल्याला का चिडायला लावतात असे प्रश्न पालक म्हणून आपल्यालाही अनेकदा पडतात. बरेचदा प्रेमाने सांगूनही त्यांना समजत नाही, मग नकळत आपला पारा चढतो आणि आवाजही वाढतो. काही वेळा आपण मुलांवर इतके चिडतो की हात उचलतो किंवा त्यांना काहीतरी शिक्षा नक्कीच करतो (Parenting Tips). असं करुनही पुढच्या वेळी पुन्हा तेच होते आणि ते त्यांना पाहिजे तेच करतात. पालक म्हणजे आपण मुलांचे मालक नसतो ही गोष्ट पालकांनी लक्षात घ्यायला हवी. मुलं आपलं का ऐकत नाहीत याचा शांतपणे विचार करुन मुलांशी कसे वागले तर ते ऐकतील याचा शोध पालकांनी घ्यायला हवा. म्हणजे मुलांचे आणि पालकांचे दोघांचे जगणे सोपे होऊ शकेल (Why Children’s Don’t Listen to Their Parents).

कधी अभ्यासाबाबत मुलं ऐकत नाहीत तर कधी खेळायच्या बाबतीत हट्टीपणा करतात. कधी खाण्या-पिण्यासाठी त्रास देतात तर कधी अमुकच गोष्ट हवी म्हणून मागे लागतात. काही करु नको सांगितलं की मुलं मुद्दाम तेच करतात. हे तमाम पालकवर्गाला भेडसावणारे प्रश्न आहेत. हेच प्रश्न दूर व्हावेत यासाठी पॅरेंटींगविषयी काही माहिती घेणे आजच्या काळात अतिशय आवश्यक गोष्ट झाली आहे. इन्स्टाग्रामसारख्या सोशलम मीडियाच्या माध्यमातूनही काही जण अशाप्रकारची जागृती करतात. पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती (Parenting diaries with pritee) या इन्स्टाग्राम पेजवरुन प्रिती या सध्या विविध गोष्टींशी झगडत असणाऱ्या पालकांशी काही नेमक्या गोष्टी शेअर करतात. नुकताच त्यांनी मुलं का ऐकत नाहीत याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी मुलांनी न ऐकण्याची २ महत्त्वाची कारणं शेअर केली आहेत.

१. मुलांना सांगतो तसे आपण वागतो का? 

आपण मुलांनी असे वागावे, तसे वागावे अशी अपेक्षा करतो. पण त्यांच्याकडून आपण जशी अपेक्षा करतो तसे आपण स्वत: वागतो का? याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुलांनी मोबाइल वापरु नये असे आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या मोबाइलच्या वापरावर नियंत्रण आणायला हवे. अनेकदा आपल्याला मोबाइलवर ऑफीसचे किंवा इतर काम असू शकते हे मान्य आहे. अशावेळी एका विशिष्ट खोलीत जाऊन मगच आपण मोबाइलचा वापर करायला हवा. बेडरुम किंवा लिव्हींग रुम, किचन याठिकाणी मुलांसमोर आपण सतत मोबाइल वापरत असू तर त्यांना मोबाइल वापरु नको किंवा कमी वापर हे आपण कितीही ओरडून सांगितले तरी ते ऐकणार नाहीत. 

२. आपल्या सोयीनुसार निर्णय बदलणे 

काही वेळा आपण मुलांना एखादी गोष्ट करु नका असे सांगतो. मात्र दुसऱ्या एखाद्या वेळी आपल्या सोयीनुसार त्यांनी ती गोष्ट केलेली आपल्याला चालते. याचे उदाहरण म्हणजे बेडरुममध्ये जेऊ नका असे आपण मुलांना पहिल्या दिवशी सांगितले असेल तर १० व्या दिवशी मूल बेडरुममध्ये जेवायला गेल्यावर तोच नियम लागू व्हायला हवा. जर मुलांना आपण हा नियम सांगितला असेल तर आपणही मुलांसमोर बेडरुममध्ये जेवायला किंवा खायला बसणे योग्य नाही. मुलं आपले न ऐकण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. एकदा सांगितलेला नियम कायम आणि सगळ्यांकडून पाळला जायला हवा.  

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं