आई झाल्यानंतर प्रियंका चोप्राच्या बदललेल्या आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमात बरंच काही छापून येतंय. मुलीचं संगोपन करण्यात गुंतलेल्या प्रियंकाचं दैनंदिन आयुष्य कसं बदललं याच्या चर्चा सुरु आहेत. पण आई झालेल्या प्रियंकाच्या मनातही बऱ्याच उलथापालथी घडत आहेत. आपल्या काही महिन्यांच्या मुलीचं संगोपन करताना एक आई म्हणून आपण कसं असायला हवं, कसं वागायला हवं याचा प्रियंका सतत विचार करत आहे. त्याबद्दल आता ती प्रसारमाध्यमांशी मोकळेपणानं बोलतही आहे.
Image: Google
लिली सिंह यांचं प्रियंकावर ' बी अ ट्रिॲंगल: हाउ आय वेण्ट फ्राॅम बिइंग लाॅस्ट टू गेटींग अप लाइफ' नावाचं पुस्तक येत आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं पालकत्व या विषयावर प्रियंकानं आपले विचार मांडले आहेत. प्रियंका म्हणते, 'पालक म्हणून माझा अनुभव छोटा आहे. पालकत्वाचा माझा प्रवास जरी नुकताच सुरु झालेला असला तरी पालकत्वाच्या भूमिकेबाबत काही विचारांवर आणि माझ्या मतांवर मी ठाम आहे. मी माझ्या मुलीची आई आहे. मालक नाही. तिच्यावर हक्क गाजवणारी मी कोण? आई आहे म्हणून मी तिचं संगोपन करायला हवं. तिचं संगोपन करताना ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे याची जाणीव मी कायम ठेवायला हवी.' प्रियंका म्हणते, 'मी कधीही माझ्या मुलीवर माझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, माझ्या मनातल्या भीती लादणार नाही. ती तिचं आयुष्य स्वत: घडवेल.'
Image: Google
मूल आईवडिलांकडून येत नाही तर आई वडिलांद्वारे या जगात येतं. मी माझ्या मुलीची आई आहे म्हणून तिचं आयुष्य पूर्णपणे मीच घडवणार हा विचारच चुकीचा असल्याचं प्रियंका म्हणते. मुलांना त्यांचं आयुष्य स्वत: घडवायचं असतं याची जाणीव खूप लवकर झाल्यानं त्याची मदत होत असल्याचं प्रियंका सांगते. प्रियंकाचे एक आई म्हणून असलेले पालकत्वाबद्दलचे विचार नव्या जुन्या पालकांना पालकत्वाची नवी समज आणि दृष्टी देणारे आहेत.