अनेक पालकांना प्रश्न पडतो की आपल्या बाळाचं वजनच वाढत नाही. अनेकदा मूल वर्षाचं होतं पण बाळसं धरत नाही. लहान मुलांना नेमकं काय खाऊ घातलं तर ते छान गुटगुटीत होतील असं पालकांना वाटतं. कधीकधी प्रश्नही पडतो की आपण मुलांना कमी किंवा जास्त तर खाऊ घालत नाही. पुढे मुलं तीन-चार वर्षांची होतात तरी खाण्याचे नखरे फार. हाताने खात नाही. त्यांचं पोट भरलं की नाही हेच कळत नाही. वजन वाढत नाही, सतत आजारी पडतात. तिखट नको, भाज्या नको, गोडच दे असा हट्टही काही मुलं करतात. अशावेळी करायचं काय? वजन कमी आहे पण बाळ ॲक्टिव्ह आहे तर काळजी करु नका असं डॉक्टरही सांगतात तरी मुलांनी नीट खावं बाळसं धरावं असं पालकांना वाटतंच. अशावेळी काय करावं?
(Image : google)
बारीक बाळाचे वजन वाढीसाठी काय करावं?
बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी सांगतात..
१. पातळ अन्नात पाणी जास्त असते. ते बंद करा. घट्ट अन्न द्या.
२. बाळ जे खातो त्यात दरवेळी थोडे तेल, तूप घाला.
३. रोज १० मिली तेल तूप पोटात गेले तर दरमहा पाव किलो वजन वाढेल.
४. खोबरे तेलाने मालिश करा. नंतर साबण लावू नका. तेल जिरते वजन वाढते.
५. गर्मीमुळे वजन घटते. थंडी वाजल्या शिवाय कपडे नको. थंडी नसेल तर अर्धी चड्डी सर्वोत्तम.
६. शक्य तेंव्हा बाळाला एसीत ठेवा. एसी २६वर ठेवा. जमत असेल तर खोलीचे तापमान दाखवणारे डिजिटल घड्याळ घ्या. २५-२६. अंश तापमान चांगलं.