Join us  

सगळं येतं, पाठ असतं पण परीक्षेत काही आठवत नाही? घ्या ३ मंत्र, वाचलेलं विसरणंच शक्य नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2024 5:15 PM

मुलांच्या लक्षात का राहत नाही? अभ्यास विसरण्याचं कारण काय?

-डॉ. श्रुती पानसे

मी आणि माझी मैत्रीण एकत्र अभ्यास करतो. एकत्र वाचतो. एकमेकींना प्रश्न विचारतो. दुसऱ्या दिवशी तिच्या सगळं लक्षात असतं. पण मला तुटक तुटक आठवतं. नीट आठवत नाही, असं का होतं?’ अनिका सांगत होती. तिच्यासारखं अनेक मुलांचं होतं की एरव्ही सगळं आठवतं पण परीक्षा म्हंटली की काहीच आठवत नाही. आईबाबांनी रिव्हिजन घ्यायला सुरुवात केल्यावर तर काहीच आठवत नाही.असं का होतं?‘जेव्हा वर्गात शिक्षक शिकवत असतात, माझं त्यांच्याकडे पूर्ण लक्ष असतं. तेव्हा मला सगळं समजतं. म्हणजे खरं तर मला सगळं काही समजलं आहे असं मला वाटतं. मग मला वाटतं की माझा अभ्यास झाला आहे. कशाला वाचायचं पुन्हा पुन्हा ? आणि परीक्षेच्या आधी अभ्यास करायला गेला की काही आठवतच नाही. ’ 

 

(Image :google) 

अनिकासारखं अनेक मुलांचं होतं...

१. यासाठी पारंपारिकरित्या तीन मंत्र सांगितले जातात. त्याचा उपयोग करून बघावा. हे मंत्र म्हणजे वाचन, मनन, चिंतन. आपल्या जे लक्षात राहायला हवं आहे, त्याचं लक्षपूर्वक वाचन केलं पाहिजे. नुसतं वाचन नाही, लक्षपूर्वक वाचन. एकाग्रतेने वाचन. हे वाचन झालं की आकलनही होतं. आपण काय वाचलं आहे हे नीट समजतं.२. ही पायरी नीट जमली की दुसरी पायरी म्हणजे मनन. याचा अर्थ असा की जे आपण वाचलं आहे, त्याचा पुन्हा विचार करावा. मनात घोळवावा. हे काम अगदी मनापासून करावं. पुन्हा विचार करताना कदाचित काही अवघड जागा सापडतील. काही कच्चा, न समजलेला भाग राहून गेलेला असेल तर तो लक्षात येईल. कारण शिक्षक शिकवतात तेव्हा सगळंच काही समजलेलं असतं असं नाही. मनन करताना मात्र अशा न समजलेल्या शब्दांची/ विषयाची/ मुद्यांची / गणितातल्या उदाहरणाची/ विज्ञानातल्या प्रयोगाची/ नियमांची वगैरे एकीकडे यादी करावी.यादी करून झाल्यावर एकएक मुद्दा समजून घ्यावा. त्यासाठी पुस्तकाची, शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्यावी. एकदा हे अडथळे पार केले की आपल्याला अभ्यास समजायला लागतो.३. यानंतरची तिसरी पायरी म्हणजे चिंतन. जे काही पूर्णपणे समजलेलं आहे याचा पूर्णपणे विचार. एखादा विषय पूर्ण विचार करून डोळ्यासमोर आणणे. या तीन पायऱ्या पूर्ण झाल्या की खरोखर आपला कोणत्याही विषयाचा अभ्यास नीट होतो. मात्र या साठी थोडा वेळ द्यावा लागतो. थोडा रिकामा वेळ मिळाला तर या तीनही क्रिया होऊ शकतात. आणि विसरणं कमी होतं.

(संचालक, अक्रोड)shruti.akrodcourses@gmail.com

टॅग्स :शिक्षणशाळालहान मुलंपरीक्षा