Join us  

उजव्या हातानेच जेव, उजव्याच हाताने लिही म्हणून तुम्ही मुलांना रागावता का? मुलं मठ्ठ होतील कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 5:42 PM

Why You Should Encourage Your Child To Use Both Hands :​ मुलांना दोन्ही हाताने काम करणं जमायला हवं, पण ते कसं जमावं, पाहा सूत्र...

आपण लहान मुलांना कोणतेही काम करायला शिकवताना त्यांना मुख्य एका हाताचा वापर करायला शिकवतो. पालक आणि शिक्षक सहसा मुलांना ते ज्या मुख्य हाताचा वापर करतात त्याच हाताने काम करायला शिकवतात. याउलट आपला जो दुसरा हात असतो त्याचा वापर आपण फारसा करत नाही. घरांतील मुलं जेव्हा हळुहळु मोठी होत असतात तेव्हा आपण त्यांना शिकवताना काही गोष्टींसाठी उजव्या हाताचा तर काही गोष्टींसाठी डाव्या हाताचा वापर करायला शिकवतो. आपण मुख्यत्वे सगळी काम करताना दोन्हींपैकी एका हाताचा वापर करतो. आपण एका हाताचा वापर सर्वात जास्त करतो तर दुसऱ्या हाताचा वापर काहीवेळाचं करतो, यालाच 'हॅन्ड डॉमिनन्स' (Hand Dominance) असे म्हटले जाते. लहान मुलं साधारणपणे ३ ते ४ वर्षांची असताना त्यांच्यात या 'हॅन्ड डॉमिनन्सचा' विकास होऊ लागतो. परंतु एका हाताने काम करण्यापेक्षा मुलांना दोन्ही हातांनी काम करायला शिकवणे गरजेचे असते. 

बंप २ क्रॅडेल्स (Bump 2 Cradle) च्या संस्थापिका आणि चाइल्‍ड डेवलपमेंट कंन्सल्टंट डॉक्‍टर अतचरा वेंकटरमन यांच्या म्हणण्यानुसार, मुलांनी लहान असतानाच दोन्ही हातांचा वापर करायला सुरुवात केल्याने मेंदूच्या दोन्ही बाजूंमधील कनेक्टिव्हिटी सुधारू शकते. फोटोग्राफिक स्मृती, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता,वाचन, भावना विकसित करणे हे उजव्या मेंदूचे मुख्य कार्य आहे. डाव्या मेंदूच्या कार्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, एकाग्रता, संख्यात्मक क्षमता आणि भाषा अभिमुखता यांचा समावेश होतो." (Why You Should Encourage Your Child To Use Both Hands).  

मुलांना दोन्ही हातांचा वापर करण्यास का शिकवावे ?

बहुतेक मुले त्यांच्या उजव्या हाताने लिहितात, त्यामुळे त्यांच्या मेंदूची डावी बाजू अ‍ॅक्टिव्ह राहते. याउलट जेव्हा आपण विरुद्ध हात वापरतो तेव्हा उजव्या बाजूचा मेंदू अ‍ॅक्टिव्ह असतो. मुलांचे दोन्ही मेंदू अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी मुलांना दोन्ही हात वापरायला शिकवावे. मुलाच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंनी कार्य करण्यासाठी, आपण मुलाला दोन्ही हातांनी काम करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. दोन्ही हात समान रीतीने वापरल्याने मुलाच्या विकासात अनेक फायदे होऊ शकतात आणि नंतर त्याचा फायदा होऊ शकतो.

दोन्ही हातांचा वापर केल्याने नेमके कोणते फायदे होतात? 

१. शारीरिक विकासात मदत होते :- मुलांनी लहान वयातच आपल्या दोन्ही हातांनी काम करण्यास सुरुवात केल्यास त्यांच्या शारीरिक विकासात मदत होते. त्याचबरोबर त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास होण्यास सुरुवात होते. मुलं जेव्हा दोन्ही हातांनी काम करतात तेव्हा त्यांचे हात आणि डोळ्यांमध्ये एक प्रकारचा समन्वय तयार होतो. अशाप्रकारचा समन्वय मुलांमध्ये लहान वयातच तयार झाल्यामुळे पुढे जाऊन मुलांना स्पोर्ट्स किंवा अन्य फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी  करण्यास मदत होते. दोन्ही हातांच्या वापरास प्रोत्साहन देऊन, आपण आपल्या मुलाची शारीरिक क्षमता विकसित करण्यात मदत करू शकता आणि त्याला विविध फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये अधिक यशस्वी करू शकता.

मोबाइल हातात दिला नाही तर मुलं जेवतच नाहीत? ५ टिप्स, मोबाइल सोडवा-मुलांना पोटभर भरवा...

२. मुलांमधील आत्मनिर्भरता वाढते :- जी मुले लहानपणापासूनच दोन्हीं हातांचा वापर करतात ते अधिक आत्मविश्वासू आणि स्वतःहून कार्य पूर्ण करण्यास सक्षम होतात. मुलांना दोन्ही हात वापरायला शिकवून आपण त्यांच्यात आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करू शकता. याचा आपल्या पाल्याला आजच नाही तर भविष्यातही खूप फायदा होईल.

३. मुलांना वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेता येते :- आजच्या बदलत्या जगात नवीन गोष्टी आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हे एक महत्त्वाचे कौशल्य बनले आहे. दोन्ही हातांनी काम करणाऱ्या मुलांना नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाते. दोन्ही हातांच्या वापरास प्रोत्साहन देऊन, आपण आपल्या पाल्याला  लवचिकता आणि अनुकूलता विकसित करण्यात मदत करू शकता ज्यामुळे त्यांना बदलत्या जगात यशस्वी होण्यास मदत होईल.

टॅग्स :पालकत्व