Join us  

आईबाबा ऑफिसात आणि वयात येणारी मुलं घरी एकटीच? ४ गोष्टी मुलांना सांगा, नाहीतर होते गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 9:57 PM

Working Parents Must Teach These Things To Their Children : आईबाबा ऑफिसला आणि मुलं घरी एकटी राहतात तेव्हा पालकांना काळजी वाटणं साहजिकच आहे, मात्र त्यासाठी काही गोष्टी आवश्यक

सध्याच्या या बदलत्या काळात आणि महागाईच्या जमान्यात केवळ एकाच जोडीदाराच्या कमाईने घर चालवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही जोडीदारांना कामासाठी घराबाहेर पडावे लागते. परंतु ही परिस्थिती केवळ पालकांसाठीच नाही तर मुलांसाठी देखील खूप कठीण असू शकते. आई-वडील दोघेही वर्किंग असताना, त्यामुळे मूल घरात एकटेच राहते. अशा मुलांना सहसा स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते. तथापि, हे करणे फार काही कठीण काम नाही. यासाठी वर्किंग असणाऱ्या पालकांनी त्यांच्या मुलांना थोडे हुशार बनवण्याची गरज आहे. जर आपण मुलांना एकटे ठेवून कामावर जात असाल तर, आपल्या अनुपस्थितीत उपयोगी पडतील अशा किमान काही गोष्टी मुलांना शिकवण्याची जबाबदारी वर्किंग असणाऱ्या पालकांची आहे.

दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे काहीवेळा मुलं दिवसभर घरात एकटीच रहातात. अशावेळी, घरात आधार देणारी व्यक्ती कुणी नसल्यामुळे मुलं काहीवेळा घाबरतात किंवा एकलकोंडी बनतात. वर्किंग असणाऱ्या पालकांना सतत कामावर असताना आपल्या मुलांची चिंता लागून राहिलेली असते. आपला पाल्य नीट जेवला आहे का नाही, तो एकटा आहे, काय करत असेल यांसारखे हजारो प्रश्न वर्किंग पालकांच्या डोक्यात असतात. अशावेळी, मुलांनाच, पालकांनी थोडे सजग आणि जागरुक करून स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे(Working Parents Must Teach These Things To Their Children).     

वर्किंग असणाऱ्या पालकांनी मुलांना नक्की कोणत्या गोष्टी सांगाव्यात? 

१. स्वतःच्या सुरक्षेबाबत मुलांना करा सजग :- बहुतेकवेळा वर्किंग असणारे दोन्ही पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत कायम चिंतेत असतात. नोकरी किंवा बिझनेस निमित्त कायम बाहेर असणारे पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेचा नेहमी विचार करत असतात. परंतु चिंता करण्यापेक्षा आपल्या मुलांनाच त्यांच्या सुरक्षेबाबत थोडं जागरूक केलं पाहिजे. हाच यावर एक उत्तम पर्याय आहे. उदाहरणार्थ :- मुलांना तुमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवायला सांगा किंवा त्यांच्याकडून तोंडपाठ करुन घ्या. याशिवाय, तुम्ही मुलांना एक डायरी देऊ शकता, ज्यामध्ये काही आवश्यक जवळच्या माणसांचे मोबाईल नंबर लिहिलेले असतील. याचप्रमाणे कोणत्याही अज्ञात,अपरिचित व्यक्तीसाठी घराचा दरवाजा उघडू नये, जर एखाद्या व्यक्तीने एखादे निमित्त सांगून दरवाजा उघडण्यास सांगितले तर अशावेळी  त्याला स्पष्टपणे नकार दिला पाहिजे. एखाद्या वेळी जर काही पार्सल आले तर अशा परिस्थितीतही मुलांनी ते पार्सल गेटवर ठेवण्यास सांगावे, परंतु दार अजिबात उघडू नये. अशा छोट्या - छोट्या गोष्टींबाबत मुलांना खबरदारी घेण्यास शिकवावे. या सर्व गोष्टी मुलांना नीट समजावून सांगाव्यात. अशाप्रकारे मुलांना स्वतःचे संरक्षण करण्यास जागरुक करावे. 

२. काही महत्वाच्या गोष्टींबद्दल जरुर सांगा :- जेव्हा मुले घरात एकटी असतात, तेव्हा ते सहसा कोणत्याही गोष्टीशी खेळू लागतात. पण अशा स्थितीत ते अनेकवेळा स्वत:ला इजाही करून घेतात. किंबहुना ते तसे करु नये, म्हणून तुम्ही त्यांना काही गोष्टींबद्दल सांगा. उदाहरणार्थ :- मुलांना समजावून सांगा की त्यांनी चाकू, कात्री किंवा इतर कोणत्याही धारदार, तीक्ष्ण वस्तूने अजिबात खेळू नये. यामुळे त्यांना स्वतःला गंभीर दुखापत होऊ शकते, हे त्यांना नीट पटवून द्या. शक्य असल्यास अशा गोष्टी मुलांच्या आवाक्याबाहेर किंवा लगेच त्यांच्या हाताला लागतील अशा जागी ठेवू नका.  

३. लहानपणापासूनच मुलांना आत्मनिर्भर बनवा :- सहसा मुले प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. पण जर आपण नोकरी करत असाल किंवा नोकरी, बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर आपण मुलाला स्वावलंबी बनवावे. आपण अगदी सुरुवातीपासूनच मुलं लहान असतानाच त्याला त्याच्या स्वतःच्या काही गोष्टी करायला शिकवा. उदाहरणार्थ :- मुलांनी स्वतःचे जेवण स्वतःच्या हातांनी जेवावे किंवा त्याने स्वतःचे कपडे स्वतः घालावे. अशाप्रकारे, मुलं जेव्हा स्वतःचे काम स्वतः करतो, तेव्हा त्याला तुम्ही कामावर असतांना देखील स्वतःचे व्यवस्थापन करण्यास अडचण येणार नाही.

४. मुलांची कुटुंबातील इतर सदस्यांशी जवळीक वाढवा :- काही मुलं फक्त त्यांच्या आई-वडिलांना, विशेषतः आईलाच आपलं जग मानतात. अशा स्थितीत नोकरीला गेल्यावर मुलं बऱ्यापैकी विक्षिप्त होतात किंवा बिथरतात. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना मुलाला सांभाळणे कठीण होऊन बसते. अशावेळी  कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मुलाचे नातेसंबंध दृढ करणे ही नोकरी करणाऱ्या पालकांची मुख्य जबाबदारी आहे. जर आपली मुलं एखाद्या केअरटेकर किंवा आया जवळ रहात असतील, तर ते केअरटेकर किंवा आया यांच्या कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाबद्दल किंवा निष्काळजीपणाबद्दल घाबरुन न जाता सरळ तक्रार करु शकतात. जेव्हा मुलांना हे चांगले समजते, तेव्हा आपण ऑफिसमध्ये असतानाही ते स्वतःला चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.

टॅग्स :पालकत्व