Lokmat Sakhi >Parenting > स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर..

स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर..

world autism awareness day 2025 : स्वमग्न मुलांचा स्वीकार ही त्यांच्या समृद्ध जगण्याची पहिली पायरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 17:46 IST2025-04-04T17:43:51+5:302025-04-04T17:46:58+5:30

world autism awareness day 2025 : स्वमग्न मुलांचा स्वीकार ही त्यांच्या समृद्ध जगण्याची पहिली पायरी!

world autism awareness day 2025 : autism in kids and what should parents do? | स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर..

स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर..

डॉ. उमा बच्छाव

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (स्वमग्न्ता) हा आजार नसून जन्मतः किंवा जन्मानंतर पहिल्या दोन वर्षांत आढळून येणारी मेंदूच्या कार्यात वेगळेपणा असलेली एक गुंतागुंतीची समस्या आहे. सध्या जगभरात प्रत्येक ३० पैकी एक मूल हे स्वमग्न आढळून येत आहे. पूर्वीच्या तुलनेत ही संख्या चिंताजनक आहे. संपूर्णपणे आनुवंशिकता वाहक समजली जाणारी ही समस्या इतक्या वेगाने का वाढते आहे, याचा शोध आणि अभ्यास सध्या सुरूच आहे. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे झालेले सोशल आयसोलेशन, मोबाइल फोनचा अतिवापर, बदलती जीवनशैली, आहारातले बदल, प्रदूषण अशी अनेक कारणे वाढत्या स्वमग्नेमागे सांगता येतील.
मात्र आपले मूल स्वमग्न आहे हे समजल्यावरही ते मान्य करायची अनेक पालकांची मानसिक तयारी नसते. अनेकजण ते नाकारतात किंवा तसे काही नाही म्हणत अनेक सल्ले घेतात. त्यामुळे स्वमग्नता म्हणजे काय आणि त्याची लक्षणं, उपचार, पालकांनी वेळीच ते स्वीकारणे का महत्त्वाचे आहे ते पाहूया..

ऑटिझमची मुख्य लक्षणे

१. भाषा विकासात विलंब किंवा वेगळेपणा
२. अलिप्तता (उदा. नजरेला नजर न मिळवणे, दुसऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, एकटेच खेळणे. आजूबाजूच्या व्यक्तींशी जुळवून घेण्यात अडचणी)
३. एकाच क्रियेचा नाद असणे (उदा. उड्या मारणे, स्वतःभोवती गोल फिरणे, हाताच्या व बोटांच्या हालचाली करणे, एकाच खेळात रमणे, स्वतःशीच बडबड करणे)
४. वर्तवणूक दोष (उदा. चंचलता, आक्रमकता)
५. सेन्सरी समस्या म्हणजेच इंद्रियांकडून जाणवणाऱ्या संवेदनेत वेगळेपणा (उदा. मोठे आवाज सहन न होणे, काही स्पर्श न आवडणे इत्यादी)
६. ही सगळी लक्षणे वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येतात. मात्र ती लक्षणे वेळीच समजून त्यासाठी योग्य सल्ला आणि थेरपी करायला हवी.

काय करायला हवे?

१. ऑटिझम हा आजार नसल्यामुळे तो औषधोपचाराने बरा करता येत नाही.
२. मात्र जर ऑटिझमचे निदान योग्य वयात म्हणजेच वयाच्या पहिल्या पाच वर्षात झाले तर अनेक थेरपींचा वापर करून या मुलांमध्ये कमालीची सुधारणा होते. यात प्रामुख्याने behaviour Therapy, Occupational Therapy, sensory Integration Therapy, Speech Therapy यासारख्या थेरपी उपयुक्त ठरतात.
३. तसेच म्युझिक थेरपी, डान्स थेरपी, मूव्हमेंट हे सारेही उपयोगाचे ठरते.
४. या मुलांसाठी पोहणे पण एक उत्तम व्यायाम आहे. योग्य वयात डॉक्टरांच्या सल्ल्याने या मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देता येते.

५. अनेकदा चुकीच्या आहारामुळे लक्षणांची तीव्रता वाढते. आज सहज उपलब्ध असलेले जंक फूड पालकच आपल्या मुलांना खाऊ घालतात. पण यामुळे पचनक्रिया बिघडून, गट-ब्रेन एक्सिसमध्ये बिघाड होतो आणि ऑटिझमच्या लक्षणांची तीव्रता वाढू शकते. म्हणूनच योग्य आहार फार महत्त्वाचा आहे.
६. बहुतांश स्वमग्न मुलांची बौद्धिक क्षमता चांगली असते, पण भाषा दोष आणि वर्तवणूक दोष असल्यास या मुलांना मुख्य प्रवाहाच्या शाळेत अडचणी येतात. मात्र, योग्य वयात काळजी घेतली तर अनेक स्वमग्न मुलं मुख्य प्रवाहाच्या शाळेत शिक्षण घेऊ शकतात.
७. या साऱ्यात कुठल्याही थेरपिस्ट किंवा डॉक्टरपेक्षा महत्त्वाची भूमिका ही पालकांची असते.

८. पूर्वी मुलांना सांभाळायला घरात अनेक माणसं असायची, जसे आजी, आजोबा, मामा, मावशी, आत्या, ताई, दादा व शेजारची माणसेही. पण आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हेच हरवले आहे. कुटुंब लहान झाली आहेत. आई-बाबा दोघेही नोकरी-व्यवसायात गुंतलेले, मग मुलाला सांभाळायला एक वेगळेच बेबीसीटर सापडले - मोबाइल फोन. बाळ रडलं की दाखवा मोबाइल, बाळाला शिकवायचंय, चित्र दाखवायचंय की दाखवा मोबाइल असे सर्रास घडते. त्यामुळेही ऑटिझमसारखी समस्या समाजात झपाट्याने वाढते आहे.
९. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे ऑटिझमचे निदान झाल्यावर पालक, डॉक्टर्स, न्यूरॉलॉजिस्ट, आयुर्वेद, होमिओपॅथी या सगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांचे सल्ले घेतात. औषधं घेऊन पाहू म्हणतात. मात्र या सगळ्या कॉकटेल सल्ला-नशेत पालक स्वत:च भरकटतात. त्यांच्या लक्षात येत नाही की आपण भरकटलो तर आपली मुलेही भरकटतात.

१०. त्यामुळे स्वमग्न मुलांच्या बाबतीत कुठल्याही उपचारापेक्षा पालकांचा स्वीकार, सहभाग आणि सकारात्मकता सगळ्यात आवश्यक ठरते. आपले मूल स्वमग्न आहे असे निदान झाले तर ते पालक जितक्या लवकर स्वीकारतील तितकी मदत मुलाला लवकर मिळेल. पालकांनी हे समजून स्वीकारले पाहिजे की आता पुन्हा आपल्या मुलांसोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्याची वेळ आली आहे. आपले हे मूल अपंग नव्हे तर देवाने दिलेले एक वरदान आहे. आपण त्याला स्वीकारले पाहिजे ही जाणीव पालकांना झाली पाहिजे.
११. आणि पालकांसह हाच विचार जर प्रत्येक डॉक्टर, थेरपिस्ट, शिक्षक, यांच्यासह समाजाने जोपासला तर येणाऱ्या काळात ऑटिझमकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. ही मुलेही एक सुंदर समृद्ध आयुष्य जगू शकतील, अशी आशा आहे.
 

Web Title: world autism awareness day 2025 : autism in kids and what should parents do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.