Join us  

आई-बाबा, कटकट करू नका! मुलं पालकांना असं उद्धटपणे बोलतात, अजिबात ऐकत नाहीत.. त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 7:04 PM

world family day : सुटीत घरोघरी मुला-पालकांचे वाद, अरे ला कारे म्हणत भांडणं आणि त्रागा याला उपाय काय? येत्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त खास चर्चा.

ठळक मुद्दे कधी कधी पालक विचार करून हतबल होतात.

-स्मिता पाटील'आई, प्लिज लाज नको आणूस हां.' ‘चिल् मार ग. कशाला इतकी पॅनिक होतीयेस?'‘बाबा, जरा वेडा आहेस का तू?'‘तुला ना, काही कळतच नाही!'‘प्लिज, आता पुन्हा कटकट सुरू करू नकोस,'तुमच्या घरातली ही वाक्ये आहेत का? अशी वाक्ये कानावर पडतात सध्या तुमच्या घरात?ही आणि अशी अनेक वाक्ये घरात कानावर यायला लागतात जेव्हा तुमचं मूल मोठं व्हायला लागतं. अनेकदा त्यांच्या बोलण्यानं आपण अवाक् होत असतो. लहानपणी किती हुशार आणि कसा बोलतो ना हा, असं कौतुकानं वाटणारं मन बदलायला लागतं आणि नजरेत हळूहळू राग यायला लागतो. कौतुकाची जागा रागाने घेतली जाते. त्याप्रमाणे मग आपला स्वर, आपल्या आवाजाची पट्टी, आपली देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव सगळं सगळं बदलायला लागतं.काय बोललं की, यांचा पारा चढतो, कसं वागलं की, यांची चिडचिड होते, हे पण ही पोरं नीट जोखत असतात.वाढत्या वयाची मुलं आणि पालक म्हटलं की, अनेक घरांमध्ये पालक वेगवेगळ्या तक्रारी करताना दिसून येतात. वेळेवर काही करायचं नाही. स्वतःचं स्वतः आवरायचं नाही, घरातली स्वच्छता करायची नाही, वैयक्तिक स्वच्छता नीट करायची नाही. घरातल्या कामांमध्ये मदत करायची नाही. घरामध्ये पसारा भरपूर करायचा, तो आवरायचा नाही, घेतलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या नाहीत, उद्धटपणे बोलायचं, सांगितलेलं काहीच ऐकायचं नाही, सतत अपमान करायचा. अशा एक ना अनेक तक्रारी पालकांच्या असतात. त्रागाही दिसतो.

(Image : Google)

काही काही मुलं तर पालकांच्या अंगावर पण हात उगारतात, अशा अनेक तक्रारी पालक घेऊन येतात. पालकांशी थोडा संवाद साधायला लागलं, की भराभरा सगळी यादी पुढे येते. लहानपणीचा सगळा कौतुकाचा सोहळा मुलं वाढायला लागली की, कसा युद्धभूमीत बदलतो, हे अनेक घरांमध्ये पाहण्यासारखं असतं. घरात बाहेरचं कुणी आलं तरी बोलायचं नाही, घरातल्या लोकांशी बोलायचं नाही, सतत आपल्या खोलीत बसून राहायचं. वाढता स्क्रीन टाइम हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. सतत गेम्स खेळत बसायचे, रिल्स बघत बसायचे. सतत हातात मोबाइल. कुठे बाहेर जायचं म्हटलं तर तिथे यायचं नाही. करिअरसंदर्भात गांभीर्य नाही, अभ्यासाची गोडी नाही. काही करून दाखवायची जिद्द नाही. कुठलं ध्येय नाही. इतरांच्या बाबतीत संवेदनशीलता नाही, अशा तक्रारी पालक करत असतात.पालक म्हणतात की, आमचं धाडसच नव्हतं. घरामध्ये कोणाला उलट बोलायचं. एका नजरेच्या धाकात आम्ही असायचो. कधीही आम्हाला कोणी मारलं नाही, बोललं नाही किंवा ती वेळच आम्ही कधी आणली नाही आणि आता मात्र यांना सतत सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. पण, ही मुलं ऐकतच नाहीत.घराची अगदी युद्धभूमी होऊन जाते. मग सुरू होतो मोठ्यांचा आरडाओरडा. मुलांचं उलट बोलणं, पालकांना अजिबात सहन होत नाही. कधी अबोला, कधी धुसपूस, कधी आरडाओरडा, कधी मारणं अशा सगळ्या गोष्टी वाढत्या वयाची मुलं घरात असताना होत असतात. याला अनेक घरांमध्ये अपवादही असू शकतात. पण, बहुतांश घरांमध्ये सध्या हे चित्र दिसतं.

(Image : Google)

..असं का होतं?

का होतं बरं असं? काय बरं बदल झाले इतक्या वर्षांमध्ये? कशामुळे कुटुंबातलं हे चित्र असं एकदम बदलून गेलं? कधी कधी पालक हा सगळा विचार करून हतबल होतात.याबाबत मुलांशी बोलताना मुलं म्हणतात, की पालक आमच्याशी नीट वागत नाहीत, नीट बोलत नाहीत. सतत सूचना, टोमणे असं असतं घरात. आरडाओरडा करत असतात. अपमान करत असतात. आम्हाला नाही मिसळायचं तर कशाला जबरदस्ती करतात? आम्हाला नाही आवडत बाहेर जायला, लोकांमध्ये मिसळायला. एखादा बाहेर काही उपक्रम असेल तर पालकांना असं वाटतं, की मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. पण, मुलं नाही जात तिथे आणि मग पालकांना वाटतं की अरे काय हे? म्हणजे कशातच कसा इंटरेस्ट नाही? पण अनेक मुलं अशीही आहेत, की जी सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतात. काही चांगली कृती करत असतात. त्याकडे मात्र अनेकांचं सोयीस्कर दुर्लक्ष होत असतं.

(Image : Google)

करायचं काय ?

१. सगळ्यात आधी पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपल्या वेळची परिस्थिती खूप खूप वेगळी होती. तेव्हाही आपले पालक आपल्याला नावं ठेवत होतेच की. आता तर बदलाचा वेग एवढा मोठा आहे की, आपली आणि मुलांची तुलना होऊच शकत नाही.२. आपल्या मुलांपुढची आकर्षणं खूप आणि वेगळीसुद्धा आहेत. आपल्या लहानपणी हे इतकं सगळं नव्हतं. मुलांना सगळ्या सुखसोयी आपणच उपलब्ध करून दिल्यात ना ?३. आपल्या लहानपणी नसलेला सर्वार्थाचा मोकळेपणा आता मुलांना आहे. त्यामुळे त्याचं बोलणं- वागणं वेगळं असणारच आहे. वेगळं म्हणजे आपल्या विरुद्ध असा अर्थ होत नाही ना ?४. या सगळ्यांशी डील करताना हतबल होण्यापेक्षा, आरडाओरडा करण्यापेक्षा वेगळा मार्ग आपण घेतला पाहिजे. तो आहे उत्तम आणि स्पष्ट संवादाचा.५. संवादाला पर्याय नाही. हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मुलांशी बोलताना तर याचं भान आपल्याला पाहिजेच. आता कशीही परिस्थिती असली तरीही तुम्ही नव्या नोटवर संवादाला सुरुवात करू शकता.६. तुमचं प्रेमळ, सहृदय पण ठाम बोलणं मुलांच्या आणि आपल्या नात्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.७. मुलं वाढीच्या टप्प्यात असताना अनेक बदल मेंदूत होत असतात. ते आपण समजून घेतले पाहिजेत.८. संवादाचा अभाव हे घरातील अस्वस्थतेचं मूळ कारण असतं हे आपण समजून घेतलं तर काय करायला पाहिजे हे ठरवणं सोपं जातं.९. मुलं म्हणजे आपले वैरी नाहीत ना ? ते असं का वागतात याच्यामागचं कारण कळलं की, आपली निम्मी तगमग कमी होईल आणि ती ऊर्जा आपल्याला पुढे कसं वागायचं - बोलायचं आहे यात वापरता येईल.१०. नव्याने आपल्या आणि मुलांमधल्या चांगल्या नात्यासाठी सुरुवात करावी लागेल. त्यासाठी संवादाचे वेगवेगळे मार्ग वापरून पाहावे लागतील.

(लेखिका मुक्त पत्रकार असून सुजाण पालकत्वासंदर्भात काम करतात.)mita.patilv@gmail.com

टॅग्स :परिवारपालकत्वलहान मुलं