Join us   

पांढरे केस आनंदाने मिरवणाऱ्या ६ बॉलिवूड अभिनेत्री, ना खोटे रंग-ना वय लपवण्याची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 6:27 PM

1 / 7
वय वाढलं की केस पांढरे होणारच. पण कमी वयातच केस पांढरे होतात तेव्हा काहीजणींना ती खूपच लाजिरवाणी गोष्ट वाटते. ऐन तारूण्‍यांत केस पिकत असतील तर त्‍यामुळे तुमच्‍यातला आत्‍मविश्वास कमी होतो. पाढंऱ्या केसाची चिंता डोक्‍यात शिरते. अकाली केस पांढरे होणं हे आपल्या बिघडलेल्या लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे होते. सध्या लहान वयातच पांढरे केस होणं ही समस्या आजकाल २५ ते ३० वयोगटातील तरुणींना सतावतेय. कमी वयातच केस पांढरे झाल्याने ते पुन्हा काळे करण्यासाठी आपण त्यावर अनेक उपाय करतो. परंतु याउलट काहीजणी न लाजता आपले पांढरे केस अगदी आनंदाने मिरवत आहेत. आजच्या काळातही काही बॉलिवूड अभिनेत्री अशा आहेत की ज्या आपल्या केसांचा पांढरा रंग न लपवता, आपले केस पिकलेले किंवा पांढरे आहेत या सत्य परिस्थितीचा स्विकार करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री केस पांढरे होणं या गोष्टीला लाजिरवाणी न समजता जे आहे ते असे आहे हेच खरे आहे आणि ते आनंदाने मिरवून कौतुकास पात्र ठरत आहेत.
2 / 7
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींपैकी पिकलेले केस आनंदाने मिरवणारी एक अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी. दोन मुलांची आई असणारी बॉलिवूड अभिनेत्री हिचे केस देखील पांढरे झाले आहेत. समीरा आपल्या पांढऱ्या केसांना एक लाजिरवाणी गोष्ट न समजता ही एक नैसर्गिक आणि वयोमानानुसार होणारी खास गोष्ट आहे असे मानून आपले केस आनंदाने मिरवण्याचा आनंद लुटत आहे.
3 / 7
झीनत अमान यांनी आपले केस न रंगवता ते तसेच पांढरे ठेवणे पसंत केले आहे. झीनत अमान म्हणतात की, सुरुवातीला मला माझे केस रंगवायचे नव्हते, पण लोकांनी मला ते रंगवण्याचा सल्ला दिला. माझ्या काही शुभचिंतकांनी तर असेही म्हटले की याचा माझ्या करियरवर विपरित परिणाम होईल. परंतु या गोष्टीवर मी थोडा विचार केला आणि मला जाणवले की मला आपल्या समाजातील तरुणांच्या आदर्शांना बळकटी देण्याची खरोखर गरज आहे. पुढे त्या म्हणतात, तरुण असणे ही छानच गोष्ट आहे, परंतु म्हातारे होणे हे देखील तितकेच अद्भुत आहे. माझ्या राखाडी केसांना इतरांसाठी स्टाईल स्टेटमेंट बनवण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता तर यातून मला जास्त आनंद मिळतो.
4 / 7
४४ वर्षीय नेहा धुपिया देखील आपले पांढरे झालेले केस काळे करत नाही. नेहाला देखील आपले केस आहेत तसेच नैसर्गिक पद्धतीने ठेवायला आवडतात. नेहा धुपिया आपल्या पांढऱ्या केसांच्या पॅचला 'लकी चार्म' असे म्हणत रेड कार्पेट असो किंवा कितीही मोठे अवॉर्ड फंक्शन ती अगदी आनंदाने आपले पांढरे मिरवते. केस न लाजता, न लपवता सगळ्या जगाला दाखवते.
5 / 7
रत्ना पाठक अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी कधीही आपले पांढरे केस काळे केले नाहीत. रत्ना यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याचे कारण सांगितले होते की, माझ्या वयाच्या ३० व्या वर्षी माझे केस पांढरे दिसायला लागले होते आणि मी मेंदी लावायलाही सुरुवात केली होती. पण माझा नवरा मला बराच वेळ समजावत होता आणि शेवटी मला ते समजले आणि मी पांढरे केस काळे करणे सोडून दिले.
6 / 7
लारा दत्ता ही देखील या अभिनेत्रींपैकीच एक आहे, जी आपल्या पांढऱ्या केसांची लाज न बाळगता त्याचा अतिशय आनंदाने स्वीकार करताना दिसत आहे. चक्क मिस युनिव्हर्स असलेली लाराला देखील आपले पांढरे केस काळे करणे पसंत नाही. केसांच्या या पांढऱ्या रंगाचा मला कसलाच त्रास होत नाही असे म्हणत तिने आपल्या पांढऱ्या केसांवरील प्रेम व्यक्त केले आहे.
7 / 7
सुप्रसिद्ध हिंदी सिरीयल तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशी यांची मुलगी, नियती जोशी ही देखील तिच्या पांढऱ्या केसांमुळेच कायम चर्चेत राहिली. नियतीने आपल्या आयुष्यातील सर्वात खास प्रसंग असणाऱ्या लग्नाच्या दिवशी देखील आपले पांढरे केस आहेत तसेच पांढरे ठेवले होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सफॅशन