Curry Leaves benefits: रोज सकाळी कढीपत्त्याची पाने चावून खाण्याचे चमत्कारिक फायदे वाचा आणि अनुभव घ्या! Published:December 3, 2024 01:01 PM 2024-12-03T13:01:05+5:30 2024-12-03T13:05:05+5:30
Curry Leaves Benefits: कढीपत्ता ज्याला मराठीत आपण कढीलिंब म्हणतो, तो अत्यंत गुणकारी आहे. केवळ फोडणी चटकदार करण्यात त्याचा हातखंडा आहे असे नाही तर संपूर्ण आरोग्य सुदृढ करण्याच्या दृष्टीनेही तो हितकारी आहे. त्याचा कसा, कधी आणि किती प्रमाणात उपयोग केला असता शरीराला आवश्यक लाभ होतो, ते जाणून घेऊया. कढीपत्त्याची हिरवी पाने तजेलदार वाटतात. ती जेवणाची चव तर वाढवतातच शिवाय आपले आरोग्य सुधारण्यासही हातभार लावतात. कढीपत्त्याच्या पानांमध्ये कोणते गुणधर्म नाहीत म्हणून विचारा! सौंदर्य असो, आरोग्य असो, नाहीतर रोग प्रतिकार शक्ती वाढवणे असो, कढीपत्त्याची गुणकारी पाने सगळ्या उणिवा भरून काढतात.
कढीपत्ता, हा भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य घटक आहे आणि त्यात अनेक औषधी फायदे आहेत, जे कदाचित अनेकांना माहितही नसतील! आपल्या दैनंदिन आहारात कढीपत्त्याचा समावेश करा शिवाय दिवसाची सुरुवात कढीपत्त्याची पाने चघळून करा. त्यामुळे कोणकोणते लाभ होऊ शकतात? चला जाणून घेऊ.
पचनाच्या समस्या दूर होतात :
कढीपत्त्यामधील तंतुमय गुणधर्म आतड्यांच्या हालचाली सुरळीत करतात. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते. ज्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी कढीपत्ता हा एक उत्कृष्ट पर्याय आहे जो आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवून अपचनाची समस्या दूर करतो.
मऊ, लांबसडक केस :
कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात असलेले बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे विविध घटक, केसांची पोत सुधारण्यास मदत करतात. केस दाट, लांबसडक आणि मऊ होतात. केस दीर्घकाळ काळे राहतात. ज्यांची केसांची वाढ थांबली आहे, केसांच्या तक्रारी आहेत, त्यांनी आपल्या रोजच्या तेलात कढीपत्त्याची पाने उकळून घेतल्यास, त्या पानांचा अर्क तेलात उतरतो आणि त्या तेलाने मालिश केल्यास केस गळणे थांबून नवीन केस येण्यास सुरुवात होते.
मधुमेहींसाठी वरदान :
आयुर्वेदानुसार कढीपत्ता इंसुलिनचा प्रभाव वाढवण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास लक्षणीय मदत करू शकतो. त्यामुळे मधुमेहींसाठी कढीपत्त्याचा वापर अधिक गुणकारी ठरतो.
वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता हा रामबाण उपाय :
दररोज कढीपत्त्याचे सेवन करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे चरबीचा निचरा होण्यास मदत होते आणि चयापचयाची क्षमता वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. चरबीचे वेळेवर विघटन झाल्याने वजन नियंत्रणात राहते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारात कढीपत्त्याचे सेवन वाढवावे.
यकृताचे तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते:
कढीपत्त्यातील गुणधर्मामुळे फुफ्फुसांचे शुद्धीकरण होते. विषारी घटक शरीरातून बाहेर फेकले गेल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. शरीर निरोगी बनते. कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला हानिकारक रॅडिकल्सपासून वाचवतात. त्यामुळे त्वचेवर गडद ठिपके, मुरुम दूर होऊन त्वचेचा रंग उजळतात.
कढीपत्त्याचा वापर करायचा कसा?
ताज्या कढीपत्त्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थात केला जातो. तर दीर्घकाळ वापर करायचा असल्यास कढीपत्ता वाळवून त्याची पूड करून घ्यावी आणि तिचा हवा तेव्हा, हवा तसा वापर करावा. कढीपत्त्याची चटणी रोजच्या जेवणात घेतल्यानेही पुरेसे घटक शरीराला मिळतात.