गुढीपाडवा 2025: नऊवारी नेसताय, पाहा कोणकोणते मराठी परंपरेतले दागिने घालायलाच हवेत! साज शृंगार तर हवाच..
Updated:March 26, 2025 11:58 IST2025-03-25T16:15:23+5:302025-03-26T11:58:48+5:30
Gudi Padwa Outfit Ideas: Nauvari is incomplete without traditional jewellery : नऊवारी नेसल्यावर त्याबरोबर हे दागिने हवेच. मगच वाटेल खरा मराठमोळा साज.

भारताच्या परंपरेला साजेसा पेहराव म्हणजे साडी. मग ती नऊवारी साडी असेल किंवा सहावारी. गुजराती साडी असेल किंवा बंगाली. साडी नेसल्यावर महिलांचे रुप खुलूनच दिसते.
प्रत्येक राज्यामध्ये साडी नेसायची पद्धत जशी वेगळी तशीच शृंगाराची पद्धतही. महाराष्ट्रामध्ये सणासुदीला जेव्हा महिला साडी नेसतात तेव्हा त्याबरोबर हाता-पायात तसेच गळ्यात काही दागिने घालतात.
साडी तशी कोणत्याही शृंगाराशिवायही छान दिसतेच. मात्र गुढीपाडव्यासारख्या सणांना नऊवारी साडी नेसल्यावर त्याबरोबर दागिन्यांचा साज हवाच.
नऊवारी साडी नेसल्यावर मोकळं नाक छान वाटत नाही. नाकामध्ये मस्त पैकी नथ हवीच. मग ती तुमच्या चेहऱ्याला जशी शोभेल तशी वापरा. लहान-मोठी, खड्याची-मोत्याची अनेक प्रकार असतात.
नऊवारीवर आपण मोठे छान हार घालतोच. मात्र नाजूक अशी ठुशी फारच सुंदर दिसते. कोणत्याही रंगाची साडी असो ठुशी छानच दिसते. गळा अगदी सुडौल दिसतो.
नऊवारी नेसल्यावर केसांच्या विविध हेअरस्टाईल चांगल्या वाटतात. मात्र आंबाड्याची बातच काही और आहे. लहान केस असतील तर, आंबाडा विकतही मिळतो. मानेपर्यंत आलेला घट्ट असा आंबाडा नऊवारीवर शोभून दिसतो.
नऊवारीवर झुमके साधे कानातले इतरही छान वाटतात. मात्र कुड्या घातल्यावर त्या जास्त छान दिसतात. पूर्वीच्या महिला कुड्यांचा वापर भरपूर करायच्या.
कान अजून सुशोभित दिसण्यासाठी गरजेची असते ती म्हणजे बुगडी. आजकाल तर अनेक विविध पद्धतीच्या बुगड्या बाजारात मिळतात.
नऊवारीवर मोकळे हात अजिबात चांगले वाटत नाहीत. हातामध्ये बांगडी तर हवीच. पण बांगडीपेक्षाही तोडे जास्त उठून दिसतात. बांगड्या आणि तोड्यांचे कॉम्बिनेशन करून हातात घालायचे.
आपल्याकडे कुंकू ठसठशीत असावं असे म्हटले जाते. मात्र नऊवारी नेसल्यावर कपाळाला चंद्रकोरच हवी. लहान असो वा मोठी. लाल असो वा रंगीत. चंद्रकोरेची शोभा वेगळीच असते.