Join us

हळदी कुंकू असो वा बोरन्हाण, घरात 'असं' दिमाखदार डेकोरेशन करा, पाहुणे तारीफ करून थकतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 13:39 IST

1 / 9
घरी येणारे पाहुणे प्रवेश द्वार पाहूनच थबकतील एवढे ते देखणे सजवा. तुमच्या घराला अंगण असो नाहीतर उंबरठा, त्यावर सुंदर सुबक रांगोळी काढा. त्यातही संक्रांत विशेष म्हटल्यावर पतंग, तीळ गूळ, हळदी कुंकू, नथ, साडी अशा डिझाईन समाविष्ट करता येतील. तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर चक्क काळा कार्डबोर्ड घ्या. त्यावर फुलांची सुंदर सजावट करा, जेणेकरून कमी कष्टात सुंदर रांगोळी तयार होईल. त्या रांगोळी भोवती आकर्षक दिवे ठेवले तर ती अधिक उठावदार दिसेल.
2 / 9
छान साडी नेसली, मेक अप केला, शेवंतीची फुलं आणली, वाण दिलं, अत्तर लावलं, तिळगुळ दिला आणि हळदी कुंकू लावलं, एवढ्यावर हळदी कुंकू समारंभ उरकून न टाकता, तो आणखी प्रेक्षणीय केला तर तर संस्मरणीयसुद्धा होईल. येणारे पाहुणे तुमचं कौतुक करतील आणि पुढच्यावेळी तुमच्याकडून डेकोरेशन टिप्सही घेतील. त्यासाठी फार कष्ट लागणार नाहीत की फार खर्चही करावा लागणार नाही. थोडीशी रसिकता, उत्साह आणि कल्पकता लागेल एवढंच. बाकी पुढे दिलेल्या टिप्स फॉलो करा की झालं!
3 / 9
मंगलकार्य असो किंवा एखादा समारंभ, दाराला आम्रपल्लव आणि झेंडुचे तोरण लावण्याचा आपल्याकडे रिवाज आहे. त्याबरोबरच आणखी थोडं डेकोरेटिव्ह करण्यासाठी उंबरठ्यावर विड्याची पाने, झेंडूची फुले, शेवंतीची फुले रचून छान डेकोरेशन करू शकता. शिवाय बाजारात मिळणाऱ्या सजावटीच्या माळा लावू शकता, खणाचे तोरण लावू शकता. दाराला एखादा सुंदर लामण दिवा लावून त्यात पणती ठेवून लक्षवेधी बनवू शकता. काही ठिकाणी मिनी पतंगाचे तोरण मिळते त्याचाही वापर करू शकता किंवा घरच्या घरीदेखील बनवू शकता.
4 / 9
पूर्वी घराघरात सापडणारे घंगाळे आता शोभेची वस्तू म्हणून वापरले जाते. सण समारंभात त्याचा अधिक वापर केला जातो. घरात प्रवेश केल्यावर दिसणारे घंगाळे आणि त्यात पाण्यावर तरंगणारी सुंदर फुलं पाहून कोणालाही प्रसन्नच वाटेल. त्यामुळे घंगाळ्याचा वापर करायला विसरू नका. तुमच्याकडे घंगाळे नसेल तर एखाद्या परातीत पाणी घालून त्यात फुलांची रचना करा आणि ती परात एखाद्या पाटावर, स्टुलावर ठेवू शकता.
5 / 9
जिथे हळदी कुंकू समारंभ करणार आहात, त्याच्या समोरील भिंत आकर्षक पडदा किंवा सुंदर काठपदरी काळ्या रंगाची पैठणी लावू शकता. त्यावर छोटे पतंग, फुलांच्या माळा, आरसे, टिकल्या लावून सजवू शकता. त्यावरही सुंदर तोरण लावून पडद्याची फ्रेम डेकोरेटिव्ह करू शकता. बोरन्हाण करणार असाल तर चॉकलेटची माळ लावू शकता, चॉकलेट बुके ठेवू शकता. हलव्याचे दागिने लावू शकता. पडद्यांची रंगसंगती करून भिंत आकर्षक बनवू शकता. दिवाळीतल्या लायटिंगच्या माळाही सुशोभीकरणासाठी वापरता येतील. घरात छानसे झुंबर असेल तर तेही लावायला विसरू नका.
6 / 9
तिळगुळ, हलवा, तिळवडी, चिक्की, गुळपोळी, बोरं, रेवडी, सुका मेवा, चॉकलेट वेगवेगळ्या आकर्षक बाउलमध्ये ठेवता येईल किंवा एका ट्रेमध्ये छान रचून ठेवता येईल. वाण देण्याचे साहित्यदेखील एका ट्रे मध्ये ठेवून लोकांची उत्सुकता वाढवू शकता. फुलदाणीत फुलांची आकर्षक रचना डोळ्यांना आल्हाददायक वाटेल. मनी प्लांट किंवा तत्सम इनडोअर प्लांट शोभेसाठी रचून ठेवता येईल. शिवाय पतंग, मांजा, लाह्या, बत्तासे एखाद्या आकर्षक टोपलीत रचून ठेवता येईल.
7 / 9
पाहुण्यांचे स्वागत गुलाबजल शिंपडून केले तर त्यांना ते नक्कीच आवडेल. पूर्वी लग्न समारंभात अशी अत्तरदाणी असे. आता ती कालबाह्य झाली असली, तरी अशाच पारंपरिक गोष्टींचा समावेश करून नव्या जुन्याचा मेळ घालता येईल. लोकांना ते स्मरणात राहील. शिवाय हळद-कुंकू लावून झाल्यावर मनगटावर सुंगंधी अत्तर लावायला विसरू नका.
8 / 9
एखादी भेटवस्तू तुम्ही काय देताय हे महत्त्वाचे नसून ती कशी देताय हे महत्त्वाचे असते. वाण आपल्या पसंतीने आपण घेतो, पण तेच छान आवेष्टन गुंडाळून अर्थात गिफ्ट पॅकिंग करून दिले, तर घेणाऱ्याचेही कुतूहल वाढते आणि घेताना आनंद होतो. त्यामुळे हेअर क्लिप असो नाहीतर वापरातली कोणती वस्तू, ती देताना थोडी कल्पकता पणाला लावा, तरच तुमचे वेगळेपण दिसून येईल हे नक्की.
9 / 9
या बरोबरीने घरात स्वच्छता विशेषतः बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करायला विसरु नका. स्वच्छ बेडशीट, हलक्या रंगाचे पडदे, जमिनीवर अंथरलेली सतरंजी, गालिचा यामुळेही तुमचे घर देखणे दिसू शकते. अल्पोपहारसुद्धा आटोपशीर ठेवा, जेणेकरून सांडलवंड होणार नाही आणि तुमच्या सजवलेल्या घराला बाधा येणार नाही.
टॅग्स : मकर संक्रांतीगृह सजावट