Join us   

अस्सल मराठमोळ्या सुंदर दागिन्यांची ही पाहा झलक, तुमच्याकडे यापैकी किती दागिने आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 6:27 PM

1 / 11
दागिने हा स्त्रियांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याकडे दागिने असणे म्हणजे आज काल एक प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. या सगळ्याचं दागिन्यांत प्रत्येकी स्त्रीचा जीव अडकलेला असतो. प्राचीन काळातही दागिन्यांना खूप महत्त्व दिले जात असे. फक्त राणी महाराणी नाही तर त्यांच्या दासी पण अनेक प्रकारचे दागिने परिधान करत असत. त्यात बांगड्या, बाजूबंद, सोन्याचे हार, वगैरे गोष्टी घालत असत त्यांचे दागिने पण खूप अनमोल असत. आजही आपल्या महाराष्ट्रात मराठमोळे दागिनयांचे खूप प्रकार पाहायला मिळतात यापैकी सर्व नाही पण काही पारंपरिक दागिन्यांचे प्रकार आपल्या ठेवणीच्या दागिन्यांमध्ये हवेत असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतंच. प्रत्येक समाजाला एक पारंपरिक, धार्मिक अशा काही विशिष्टय गोष्टींचा वारसा लाभलेला असतो. दागिन्यांच्या बाबतीतसुद्धा महाराष्ट्राला एक पूर्वापार परंपरा लाभली आहे. आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने काही पूर्वापार चालत आलेल्या पण आजही तितक्याच हौसेने वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांचे प्रकार पाहूयात(Marathi Bhasha Gaurav Din : Maharashtrian Traditional Jewellery).
2 / 11
तन्मणी हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो. याच्या मध्यभागी असलेल्या पदकाच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात बघायला मिळतात. त्यात दोन किंवा तीन सर असतात. हा दागिना मोत्यांच्या मण्यांत विणलेला असतो. पारंपारिक दागिन्यापैकी हा एक भारदस्त असा दागिना आहे. व काठपदराच्या साडीवर खूप शोभून दिसणारा हा दागिना आजच्या काळातही खूप प्रसिद्ध आहे.
3 / 11
महालक्ष्मीच्या दागिन्यातील हा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. हा दागिना कमी वजनाचा असला तरी दिसायला मात्र भारदस्त दिसतो. आजही अनेक स्रिया या दागिन्याला पसंत करतात. मोहनमाळ शक्यतो तीन पदरी असते व कधीकधी यात पदकही घातले जाते. हा दागिना घातल्या वर एक राजेशाही लूक येतो.
4 / 11
कोल्हापुरकरांची शान असलेला हा दागिना लाखेवर तयार केला जातो. कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरून त्याचे नामकरण ‘कोल्हापुरी साज’ असे केले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात. मध्यभागी लोलक असते त्यास 'पानडी' असेही म्हणतात.
5 / 11
कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिद्ध झाले. सोन्याचे किंवा मोत्याचे ६ ते ७मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुडय़ा या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात. कुडय़ांव्यतिरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल, सोन्याचे कान यांसारखी आभूषणेही कानात घातली जातात.
6 / 11
महाराष्ट्रीयन स्त्रीचे विशेष अभिमानाचे आभूषण म्हणजे नथ. नथ मोत्याची ,खड्यांची व हिऱ्याची असते.नथीचे मुख्य दोन प्रकार असतात एक संपूर्ण गोल असते आणि दुसरी लंबवर्तुळाकृती असून नाकाच्या एका बाजूस असते.
7 / 11
वज्रटीक हा दागिना गळ्यालगत घातला जातो. यात जोंधळी मणी घातलेले असतात यात सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसवून मध्ये एखादा पदक किंवा स्टोन लावलेला असतो व खाली सोन्याचे मणी किंवा मोत्याचे मणी झुपकेदार पद्धतीने लावलेले असतात. हा पारंपरिक दागिना स्त्रिया पूर्वी जास्त प्रमाणात घालत असे. पण आजही अनेक स्त्रिया हा दागिना आवडीने घालताना दिसतात.
8 / 11
तोडे हा हातात घालण्याचा दागिना आहे व तो बांगड्यांसारखाच असतो. हा दागिना बांगडयांपेक्षा ही दिसायला जाड असतो. शिवाय हिरव्या बांगड्या सोबत तोडे घातल्यावर खूप उठून दिसतात. या तोड्यांवर सुरेख असे बारीक नक्षीकाम केलेले असते. काठापदराच्या साडीवर हिरव्या बांगड्यांसोबत हा दागिना घातल्यावर त्या स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते.
9 / 11
ठुशी या प्रकारांत बारीक मणी एकमेकांमध्ये एकदम जवळजवळ गुंफलेले असतात. गोलाकार रुपात सोनेरी रंगाचे मणी गुंफलेले असतात असे ठुशीचे पारंपरिक स्वरुप आहे. परंतु आता मध्यभागी एखादा मोठा गोलमणी असेल किंवा छोटेसे पेडंट असते. याशिवाय चपट्या पट्टीवर जर मणी गुंफलेले असतील तर त्याला पट्टी ठुशी म्हणतात. ठुशीमध्ये मणी ठासून भरलेले असतात म्हणून त्याला 'ठुशी' असे म्हणतात. हा प्रकार राजघराण्यात फार प्रसिध्द होता. याशिवाय मोरणी ठुशी, मोहनमाळ ठुशी असे ठुशीचे अनेक प्रकार पहायला मिळतात.
10 / 11
कानाच्या खालच्या पाळीबरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर बुगडी घातली जाते. ही मोत्यापासून बनविलेली असते. कानाच्या पाळीच्या वरच्या भागांवर घातली जाणारी बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे.
11 / 11
चिंचपेटी हा देखील ठुशीसारखाच गळ्यालगत घालण्याजोगा एक पारंपरिक दागिना आहे. चिंचपेटी ही प्रामुख्याने मोत्याची असते. क्वचित सोन्याच्या पातळ उभ्या पेट्या जोडलेल्या स्वरूपातही असू शकते. हा दागिना गळ्यासोबत उंच बसणारा असतो. मोत्यांच्या दोन-तीन माळांमध्ये गुंफलेल्या उभ्या पेट्या हेच चिंचपेटीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कधी त्या पेट्यांना सरळ फाटा देऊन मध्येच एखादं माणकाचं पदक बसवलं जातं. कधी पेटीला खाली एकच मोती तर कधी त्या पेट्यांना मध्यभागी जाता-जाता लांबी वाढवत गेलेल्या मोत्यांच्या लहान माळांच्या छोट्या तोरणाने गळा भरून जाईल असा दागिनाही मिळतो.
टॅग्स : फॅशन