Join us   

वजन कमी करण्याच्या वेडापायी लोक करतात ९ चुका, तज्ज्ञ सांगतात तुम्हीही चुका करत असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 11:15 AM

1 / 10
१. वाढत्या वजनावर ताबा मिळवणं, हे खरोखरंच एक अवघड काम आहे. वाढत्या वजनाला पाहून काही जणं एवढे पॅनिक, बैचेन होऊन जातात की झटपट वजन कमी करण्यासाठी काय करू आणि काय नको, असं त्यांना होऊन जातं. याच घाईघाईत किंवा मग खूप जास्त काळजी केल्यामुळे नेमक्या नको त्या चुका होऊन जातात आणि मग वजन काही कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यासाठीच तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. वेटलॉस करत असाल तर या चुका करणं टाळाच, असं त्या सांगत आहेत.
2 / 10
२. वजन कमी करताना होणारी सगळ्यात पहिली चुक म्हणजे आपण नेहमी आपल्या वजनावरच फोकस करतो. वजन कमी झालेलं दिसलं की खुश होतो. पण केवळ वजनच विचारात घेऊ नका. डाएटिंग, व्यायाम सुरु केल्यानंतर तुमची स्ट्रेन्थ, स्टॅमिना, स्टॅबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी या गोष्टींमध्ये काय फरक पडला आहे, तुमची एनर्जी लेव्हल किती वाढली आहे, तुमचा वेस्ट- हिप्स रेशो यात काही बदल झाला आहे का, यासगळ्या गोष्टीदेखील विचारात घ्या.
3 / 10
३. मागच्यावेळी वजन कमी करताना आपण ज्या गोष्टी केल्या, त्याच गोष्टी आपण पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. किंवा आपल्या ओळखीच्या मंडळींनी वजन घटविण्यासाठी काय केलं, ते आपण कोणाचाही सल्ला न घेता तसंच फॉलो करू लागतो. पण या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. तुम्ही मागे जेव्हा वजन घटवलं तेव्हा तुमचं वजन, वय, शरीराची ठेवण यात फरक होता. त्यामुळे तेच नियम आताही लागू होतीलच असं नाही. शिवाय दुसऱ्या कुणाचं वेटलॉस गणित तुमच्या बाबतीतही परफेक्टच ठरेल असंही काही नाही. त्यामुळे मागचेच नियम आता लागू करण्याचा प्रयत्न करू नका.
4 / 10
४. खूप जास्त कठीण डाएट प्लॅन घ्यायचा आणि मग त्याचं पथ्यपाणी करणं जमलं नाही तर स्वत:ला दोष द्यायचा, हा अनेकांचा अनुभव असतो. त्यामुळे सुरुवातीलाच खूप कठीण डाएट प्लॅन घेऊ नका. आहारात झालेला एकदम मोठा बदल सहजासहजी झेपत नाहीच. म्हणूनच सुरुवातीला जे तुम्हाला शक्य होईल, असाच डाएट प्लॅन घ्या.
5 / 10
५. अतिशय वेगात वजन कमी कसं होईल, असा अनेकांचा प्रयत्न असतो. पण वजन कमी करण्याच्या बाबतीत अशी खूप घाई करू नका. कारण त्याचा बाऊन्स बॅक परिणाम होण्याची खूप जास्त शक्यता असते, शिवाय ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुमच्या एकूण वजनाच्या १० टक्के वजन एका वर्षात कमी करणं, ही योग्य पद्धत असल्याचं ऋजुता यांनी सांगितलं.
6 / 10
६. वजन कमी करताना अनेक जणांकडून होणारी आणखी एक चूक म्हणजे खूप जास्त व्यायाम करणं. वजन कमी करण्यासाठी असा अतिरेकी व्यायाम टाळा. यामुळे खूप जास्त अशक्तपणा येऊ शकतो.
7 / 10
७. डाएट, व्यायाम यासगळ्या गोष्टी वेळच्यावेळी योग्य प्रमाणात करत असाल, पण वेळेवर झोपणे आणि उठणे या गोष्टींमध्ये चुकत असाल, तर वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे अतिशय गरजेचे आहे.
8 / 10
८. वजन कमी करण्याच्या बाबतीत मनानेच काही करण्यापेक्षा किंवा कुणाचं तरी ऐकून काही करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
9 / 10
९. दिवसभर खूपच कमी कमी खाणं, उपाशी राहणं, भूक मारणं असं अनेक जणं करतात. त्यामुळे मग रात्री कधीतरी त्यांना भूक कंट्रोल होत नाही आणि मग काहीतरी तोंडात टाकलंच जातं. त्यामुळे असं उपाशी राहणं टाळा. अति खाऊ नका. पण पोट भरेल एवढं नक्की खा.
10 / 10
१०. वजन कमी झालं की नाही, याबद्दल दुसऱ्याचं मत फार विचारात घेऊ नकां. ते तुमचं तुम्ही ठरवा.
टॅग्स : फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स