Join us   

अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? - पाहा मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, व्यायाम आणि धमाल आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2022 6:34 PM

1 / 10
श्रावण महिना (Shravan Special) म्हटला की सोमवारी महादेवाची पूजा, मंगळवारी मंगळागौरीची आणि शुक्रवारी जिवतीची हे ठरलेलेच. नव्याने लग्न झालेल्या मुली लग्नानंतर ५ वर्ष मंगळागौर पूजतात. नव्याने लग्न झालेल्या मुलींना बोलावून हे व्रत केले जाते. सकाळी मंगळागौर आणि महादेवाच्या पिंडीची पूजा आणि रात्री जागरण करुन मंगळागौरीचे खेळ असा या दिवसाचा कार्यक्रम असतो (Mangalagauri vrat Rituals Shravan Festivals).
2 / 10
पूर्वीच्या काळी महिलांना रोजच्या कामातून थोडा आराम मिळावा यासाठी हे खेळ मोठ्या उत्साहात साजरे केले जात. नवरी मुलीला माहेरी बोलवून मोठ्या थाटात तिचे कोडकौतुक केले जात असे. काळाच्या ओघात या सणावारांचे रुप थोडे बदलले असले तरी आजही हे खेळ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
3 / 10
पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये पूर्वी उत्साहाने खेळले जाणारे हे खेळ कुटुंबातील महिलांना येतातच असे नाही. अशावेळी असे खेळ खेळणाऱ्या ग्रुपना आवर्जून आमंत्रण दिले जाते. पुण्यातील मंगल ग्रुपचे व्यावसायिक पद्धतीने मंगळागौरीचे खेळ खेळतानाची काही खास क्षणचित्रे.
4 / 10
फुलपाखरु ज्याप्रमाणे स्वच्छंदपणे सगळीकडे विहार करते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील काही क्षण हे स्वच्छंदपणे जगायला हवेत असे सांगणारा फुलपाखरु हा खेळ.
5 / 10
फुगडी हा मंगळागौरीतील एक महत्त्वाचा खेळ. आपल्याकडे असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या फुगड्या अतिशय उत्तमपणे खेळल्या जातात. त्यातलीच एक ताक फुगडी हा कौशल्यपूर्ण प्रकार करताना महिला.
6 / 10
दही वडा हा मंगळागौरीच्या खेळातील एक आगळावेगळा प्रकार. व्यायामासाठी हे सगळे प्रकार अतिशय उत्तम असून यामुळे शरीर मोकळे होण्यास मदत होते.
7 / 10
फुगडीबरोबरच दोन-तीन प्रकाराचा झिम्मा, तळ्यात-मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, आटुंश पान, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडू बाई, कीस बाई कीस.. दोडका कीस, आगोटं-पागोटं, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, आळुंकी-साळुंकी असे अनेक खेळ खेळले जातात. त्यातील तिखट मीठ मसाला हा खेळ.
8 / 10
सासू-सुनेचे अथवा सवतींचे भांडण हा या खेळातील आणखी एक खास खेळ. आवळा वेचू की कवळा वेचू, किकीचे पान, माझी आई मोठी की तुझी आई मोठी, नखोल्या, ताक, सोमू-गोमू, काच-किरडा, धोबीघाट असेही काही खेळ या प्रसंगी खेळले जातात. मुलीच्या आयुष्यातील विविध नात्यांचे पदर उलगडणारे हे खेळ खेळताना तरुण मुली मनमोकळेपणाने हसतात.
9 / 10
होडी, मासा, भोवर भेंडी, अडवळ घूम - पडवळ घूम, गोफ असे मजेदार व प्रसंगी मिश्कील खेळ रंगतात आणि उपस्थित महिला या सगळ्या खेळांचा अतिशय मनसोक्त आनंद घेताना दिसतात. असाच काहीसा कौशल्य पणाला लावून खेळला जाणारा हा होडीचा खेळ.
10 / 10
नातेवाईक, शेजार पाजारच्या मैत्रिणी यांच्यामध्ये रमलेली ही नववधू माहेरवाशीण म्हणून येते आणि या सणावारांच्या निमित्ताने आनंदात न्हाहून निघते. मंगळागौरीच्या या खेळात महिला इतक्या दंग होतात की पहाटेचा कोंबडा आरवेपर्यंत त्या या खेळांचा आनंद लुटतात.
टॅग्स : सोशल व्हायरलश्रावण स्पेशल