Join us   

मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा व्यायाम करण्याआधी या ९ गोष्टी लक्षात ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2023 10:08 PM

1 / 10
प्रत्येकजण आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतो. शारीरिक आरोग्याची काळजी घेताना आपण विविध फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी, झुंबा, डान्स, ऍरोबिक्स, जिमिंग करण्याचा प्रयत्न करतो. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते. आपण या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी दररोज नियमितपणे करण्याचा प्रयत्न करतो. परंतु काहीवेळा कामाच्या गडबडीमुळे, धकाधकीच्या व्यस्त जीवनामुळे आपल्याला रोज व्यायाम करणे सहज शक्य होत नाही. काहीवेळा तर आपण अचानक व्यायाम करणेच सोडून देतो, किंवा काहीवेळा आपल्या रोजच्या व्यस्त कामांमुळे व्यायाम करण्यात भरपूर महिन्यांचा खंड पडतो. अशा परिस्थितीत खूप मोठ्या कालावधी नंतर परत व्यायाम करण्यास सुरुवात करणे फारच कठीण होऊन बसते(9 Simple Ways To Start Exercising Again After A Break).
2 / 10
खूप मोठ्या कालावधीच्या ब्रेक नंतर जर आपण परत व्यायाम करण्यास सुरुवात करत असाल तर सुरुवातीला सोप्या व्यायाम प्रकारांपासून सुरुवात करावी. खूप दिवसांनंतर जर आपण परत जिम सुरु केले असेल तर जिममध्ये जाऊन आपल्याला लगेच व्यायाम करायला जमत नसेल तर बाहेर पडून सरळ चालण्यास सुरुवात करावी. सुरुवातीला हलके जॉगिंग किंवा रनिंग करावे आणि सवय झाल्यानंतर परत पुन्हा आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करण्यास सुरुवात करावी.
3 / 10
वॉर्मअप एक्सरसाइज न करता व्यायाम करण्यास सुरुवात केल्यास लवकर थकवा येऊ शकतो. अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर व्यायाम सुरु करताना सुरुवातीला ५ मिनिटांचा वॉर्मअप एक्सरसाइज करावा. वॉर्मअप एक्सरसाइज केल्या नंतर सुरुवातीला ३० मिनिटे नंतर १ तास असे दररोज हळूहळू व्यायामाची वेळ वाढवत न्यावी.
4 / 10
अनेक जण उत्साहाच्या भरात ब्रेकनंतर व्यायाम करण्यास सुरुवात करतात. व्यायामाची वेळ पाळत नाही. मिळेल त्या वेळेत केव्हाही व्यायाम करतात. मात्र, काही दिवसांत त्यांना त्रास सुरू होतो. मग पुन्हा व्यायाम न करण्यासाठी कारण सापडतं. त्यामुळे व्यायामाचं एक वेळापत्रक तयार करा. ठरलेल्या वेळातच नियमित व्यायाम करा.
5 / 10
खूप दिवसांच्या ब्रेक नंतर व्यायाम करायला परत सुरुवात करणे खूपच कठीण असते. अशावेळी व्यायाम न करण्याची अनेक करणे सापडतात. दुसऱ्या दिवशी उठून व्यायाम करण्यासाठी स्वतःची जिम बॅग किंवा एक्सरसाइजची साधने आदल्या रात्रीच झोपताना आपल्या पलंगा जवळच ठेवा. सकाळी व्यायाम करण्यासाठी अंथरुणातून उठणे शक्य होत नसेल तर घड्याळात अलार्म लावून घड्याळ पलंगापासून लांब ठेवा. तो अलार्म बंद करण्यासाठी आपल्याला अंथरुणातून उठावेच लागेल.
6 / 10
जर आपल्याला व्यायामाची सवय आपल्या अंगी परत रुजवायची असल्यास स्वतःला एक महिन्याचे आव्हान द्या. एक महिन्याचे आव्हान देणे अवघड वाटत असेल तर आधी किमान दोन आठवड्यांचे आव्हान द्यावे. आपली दिनचर्या सुरू करण्यासाठी एक महिन्याचे छोटे आव्हान स्वीकारण्याचा प्रयत्न करा. येत्या एका महिन्यात मी एकदाही व्यायाम करणे टाळणार नाही... अशी खूणगाठ मनाशी बांधून पुन्हा सुरुवात करा.
7 / 10
खूप दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा नव्याने व्यायाम करणे थोडे अवघड जाते. अशावेळी एकट्याने व्यायाम करण्याऐवजी व्यायामासाठी साथीदार शोधा. एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांना आव्हान देऊन उत्साहाने व्यायाम करण्यास सुरुवात करावी.
8 / 10
इतर कोणासाठी नाही तर स्वतः साठी करा हा नियम लक्षात ठेवा. तंदुरुस्त आणि निरोगी राहिल्याने स्वत:ला देखील छान वाटते. स्वतःमधील आत्मविश्वास वाढवणे आणि सर्वोत्तम बनण्याचे ध्येय गाठणे आवश्यक आहे.
9 / 10
खूप दिवसांच्या ब्रेकनंतर व्यायामाची सुरुवात करताना स्वतःला किती चांगले, एनर्जेटिक, रिफ्रेशिंग वाटते याकडे लक्ष द्या. खूप दिवसांनंतर पुन्हा एक्सरसाइज करणे फारच अवघड वाटत असले तरीही प्रयत्न करणे सोडू नका.
10 / 10
रोज थोडा तरी व्यायाम करण्याचा सराव सुरु ठेवा. खूप दिवसांनंतर व्यायाम करणे अवघड असले तरी रोज थोडा व्यायाम करण्याची सवय ठेवा.
टॅग्स : फिटनेस टिप्स