मखाणे खा ७ फ्लेवर्सचे, आजच्या काळातले सूपरफूड देईल तुम्हाला सुपरपॉवर, लहान मुलेही होतील गुटगुटीत! Published:October 18, 2024 03:17 PM 2024-10-18T15:17:04+5:30 2024-10-18T15:29:19+5:30
7 Flavoured Makhana : Healthy Snack Makhanas for snacks in 7 ways : Quick & Easy Snack : मखण्यांना थोडासा ट्विस्ट देत वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड मखाणे झटपट घरच्याघरीच करु शकतो... मखाणे हा अतिशय आरोग्यदायी पदार्थ मानला जातो. मखाण्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर घटक असतात. मखाणे शरीरातीन बॅड कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात. त्यामुळे मखाणे आहारात असायलाच हवेत. दोन वेळच्या खाण्यामध्ये छोटीशी भूक लागली किंवा टी टाइम स्नॅक्स तसेच मुलांच्या डब्यासाठी सुका खाऊ म्हणून आपण मखाणे खाणे पसंत करतो. परंतु या रोज खाल्ल्या जाणाऱ्या मखण्यांना थोडासा ट्विस्ट देत आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड मखाणे झटपट घरच्याघरीच करु शकतो. कोणकोणत्या फ्लेवर्सचे मखाणे घरीच झटपट तयार करता येतील ते पाहूयात(Healthy Snack Makhanas for snacks in 7 ways).
१. लेमन पेपर मखाणा :-
एका भांड्यात थोडेसे तूप घेऊन त्यात काळीमिरी पूड, लिंबाचा रस घालावा. त्यानंतर या मिश्रणात मखाणे घालून ते क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यावेत. लेमन - पेपर फ्लेवर्ड मखाणे खाण्यासाठी तयार आहेत.
२. पेरी - पेरी मखाणा :-
कढईत तेल किंवा तूप घालून त्यात चवीनुसार मीठ व पेरी - पेरी मसाला घालावा. आता या मसाल्यात मखाणे घालून ते व्यवस्थित हलवून घ्यावेत. पेरी - पेरी मसाल्यात मखाणे परतल्याने त्यांची चव अधिकच छान लागते.
३. गुळाच्या पाकातील मखाणे :-
गुळाचा पातळ पाक करून घ्या. त्या पाकात भाजलेलं मखाणे व थोडेसे सफेद तीळ टाकून परतून घ्या. गुळाच्या पाकातील मखाणे हे चवीला कॅरेमलाइस्ज्ड पॉपकॉर्नसारखेच लागतात. कॅरेमलाइस्ज्ड पॉपकॉर्न खाण्यापेक्षा गुळाच्या पाकातील मखाणे खाणे शरीराला उत्तम आहे.
४. फ्लॅक्स सीड मखाणे :-
कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात फ्लॅक्स सीड्सची पावडर म्हणजेच आळशीची पूड आणि कडीपत्ता, चवीनुसार मीठ घालून खमंग फोडणी द्यावी. आता या मिश्रणात मखाणे घालून ते खरपूस परतून घ्यावेत. जर आपण वजन कमी करत असाल तर स्नॅक्स म्हणून किंवा भूक लागल्यावर असे फ्लॅक्स सीड मखाणे खाऊ शकता. यामुळे पोट भरेल तसेच हेल्दी देखील खाल्ले जाईल.
५. पीनट मखाणा :-
पीनट मखाणे तयार करण्यासाठी सर्वात आधी शेंगदाण्याचा कूट करून घ्यावा. आता कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ व लाल तिखट घालावे हे जिन्नस हलकेच परतून घेतल्यावर त्यात मखाणे घालावेत. पीनट मखाणे खाण्यासाठी तयार आहेत.
६. गार्लिक फ्लेवर्ड मखाणे :-
गार्लिक मखाणे तयार करण्यासाठी कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात गार्लिक पावडर चवीनुसार मीठ घालावे. आता यात मखाणे घालून ते परतून घ्यावेत. गार्लिक फ्लेवर्ड मखाणे खाण्यासाठी तयार आहेत.
७. सॉल्टी बटर मखाणा :-
कढईत थोडेसे तेल घेऊन त्यात बटर घालावे, बटर वितळल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे. आता यात मखाणे घालून ते बटरवर क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यावेत. सॉल्टी बटर मखाणा खाण्यासाठी तयार आहे.