लोक वर्षानुवर्षे आवडीने खातात असे ८ पारंपरिक भारतीय पदार्थ! बघा, यापैकी तुम्ही किती पदार्थ खाल्लेत? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 3:48 PM 1 / 9दर मैलागणिक जशी भाषा बदलते तसेच खाद्यसंस्कृतीसुद्धा बदलते. 'जिथे जे पिकतं तेच शिजत' असं म्हणतात. आपल्याला जसा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसंच खाद्यसंस्कृतीचा देखील एक इतिहास आहे. भारताच्या प्रत्येक विभागात एक वैशिट्यपूर्ण खाद्य संस्कृती उदयाला आली आहे. प्रत्येक खाद्यसंस्कृतीचा संबंध तेथील भौगोलिक हवामान, पीकपाणी आणि आर्थिक संपन्नता यांच्याशी असतो. भारताच्या ठराविक भागातील असे काही खास पारंपरिक पदार्थ आहेत जे भारतीय आजही आवडीने खातात(8 Foods From The Indian History That People Love Till Now).2 / 9कामाच्या गडबडीत स्वयंपाक करायला वेळ नसेल आणि पौष्टिक गरमागरम खाण्याची इच्छा झाली तर आपण लगेच कुकरला खिचडी लावतो. खिचडी हा अतिशय सोपा आणि झटपट होणारा पारंपरिक पदार्थ आहे. मुगाच्या डाळीची खिचडी, मसूर डाळीची खिचडी असे खिचडीचे अनेक प्रकार आहेत. डाळ, तांदूळ वापरून केल्या जाणाऱ्या खिचडीला तूप, हिंग, जिरे यांची फोडणी दिल्यावर ती अजूनच खमंग लागते. 3 / 9आपल्या देशात दही वड्याला चाट संस्कृतीतील पारंपरिक पदार्थ म्हणता येऊ शकत. दही वडे म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत. उडद डाळीपासून हा वडा तयार केला जातो त्यानंतर त्यावर घट्ट दही घालून खजूर आणि चिंचेची आंबट - गोड चटणी घातली जाते. मग मसाला, चाट मसाला भुरभुरला जातो. इतके सोपस्कार करून हा दही वडा समोर आल्यावर अगदी चवीने खाल्ला जातो. 4 / 9तांदळाच्या पीठापासून तयार करण्यात येणारे फरे ही बनारसी पारंपरिक डिश आहे. तांदुळाचे पीठ आणि चण्याच्या डाळीपासून बनविले जाणारे फरे मोमोजसारखे दिसतात. लसूण, धण्याची पावडर आणि मिरची यांचा वापर करून फरे चविष्ट बनविले जातात. उत्तर भारतीय लोक तांदळाचे फरे हेल्दी स्नॅक म्हणून खातात. 5 / 9कित्येक लोक सकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा असे पदार्थ खातात. तुम्हाला माहित नसेल राजा तिसरा सोमेश्वर याच्या 'मानसोल्लास' अर्थात 'अभिलाषितार्थ चिंतामणी' या संस्कृत ग्रंथात 'डोसाका' असा 'डोसा' या पदार्थाचा उल्लेख केलेला आढळतो. तव्यावर खरपूस भाजलेल्या कुरकुरीत डोश्याचा एक तुकडा मस्त चटणी अथवा सांबरमध्ये बूडवून खाणं हे सुखच आहे. एवढंच नाही तर डोसाचे निरनिराळे प्रकार लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे एकाच प्रकारच्या बॅटरपासून तुम्ही डोश्याचे विविध प्रकार तयार करू शकता.6 / 9कोणताही सण असो किंवा गोड बातमी आपण जिलेबी खाऊन तोंड गोड करतो. गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला मस्त असं या पदार्थांचं वर्णन करता येईल. जिलेबी ही मैदा आणि साखरेचा पाक यापासून केली जाते. मैद्याच्या मिश्रणापासून गोल जिलेबी करून त्या तळून मग साखरेच्या पाकात सोडल्या जातात. 7 / 9भात, दूध आणि साखर यांच्या मिश्रणाने बनणारी खीर ही प्राचीन भारतीय इतिहासातील बहुतेक लोकांचे मिष्टान्न म्हणून ओळखली जाते. जर कोणत्या गोड पदार्थांची यादी काढायची ठरवले तर खीरीशिवाय ही यादी पूर्ण होणारच नाही. भारतात बहुतेक प्रत्येक सणाला खीरीचा मान पहिला असतो. गव्हाची खीर, तांदुळाची खीर, शेवयांची खीर असे खीरीचे अनेक पारंपरिक प्रकार आहेत. जसजसा काळ बदलत गेला तसतस या खीरीचे रूपही बदलत गेले. आजकाल वेगवेगळ्या फ्लेवर्ड स्वरूपात ही खीर मिठाईच्या दुकानात सहज मिळते. 8 / 9आजसारख्या कुकिंग टेक्निक प्राचीन काळात इतक्या विकसित नव्हत्या. त्यामुळे जर काही गोड खाण्याची इच्छा झाली तर काही मोजकेच पदार्थ उपलब्ध असायचे आणि बर्फी हा त्यापैकी एक महत्वाचा पदार्थ होता. भारतात प्राचीन काळात बेसनचा वापर भरपूर प्रमाणात होत असे. त्यामुळे जर काही गोड खाण्याची इच्छा झाली तर, तुपात बेसन परतून त्यात गुळ घालून ही बर्फी तयार केली जायची. 9 / 9- प्राचीन काळातील 'संगम' नामक तामिळ साहित्यात कोटान सोरु या डिशचा उल्लेख 'वन पॉट मिल' (One Pot Meal ) असा केला आहे. जेव्हा एखाद्या डिशमधील महत्वाचे इंग्रिडियन्स एकाच पॉट मध्ये एकत्रित करून शिजविले जातात तेव्हा त्यास वन पॉट मिल असे म्हणतात. तांदूळ, मिक्स भाज्या, तळलेले शेंगदाणे, तिखट मिरचीची पेस्ट, छोटे कांदे एकत्रित करून कोटान सोरु बनविले जाते. कोटान सोरु बनविण्यासाठी खूप कमी मसाल्यांचा वापर करूनही ती चवीला फार छान लागते. आणखी वाचा Subscribe to Notifications