Join us   

मुलांच्या डब्यांत देण्यासाठी पौष्टिक पराठ्यांचे ८ नवीन प्रकार, रोज नवीन हेल्दी खाऊ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 1:26 PM

1 / 9
मुलांना रोज डब्यांत पोळी - भाजी दिली तर मुलं खायला कंटाळा करतात. मुलांना डब्यांत रोजची तीच ती पोळी - भाजी नको असते, त्यांना रोज काहीतरी वेगळा नवीन पदार्थ डब्यांत हवा असतो. पण मुलांच्या डब्यांत रोज काय द्यायचं असा प्रश्न घरच्या गृहिणीला पडतो. डब्यांत रोज नवीन काहीतरी पदार्थ द्यायचा म्हणजे त्याचा पौष्टिकतेकडे देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे. अशावेळी आपण मुलांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करुन देऊ शकतो. पराठे तयार करायला सोपे आणि झटपट होणारे असतात. मुलं देखील पराठे आवडीने खातात यासोबतच, पराठ्यांच्या स्टफिंगमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा इतर पदार्थ घालून तो अधिक पौष्टिक करु शकतो. मुलांना डब्यांत देता येतील असे पराठ्यांचे प्रकार पाहूयात (8 Healthy Paratha Recipes for Kids Lunch Box).
2 / 9
पनीर किसून त्यात चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, आलं - लसूण पेस्ट घालून पनीरचे स्टफिंग करुन घ्या. हे स्टफिंग कणकेच्या गोळ्यात भरून चपातीप्रमाणेच पराठा लाटून घ्यावा. पनीर पराठा खाण्यासाठी तयार आहे. पनीर पराठ्यात फार मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स असतात. यामुळे हाडे आणि स्नायू अधिक बळकट होण्यास मदत होते.
3 / 9
रताळी धुवून उकडवून त्याची सालं काढून मॅश करून घ्या. त्यात आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, मीठ, चाट मसाला, आलं - लसूण पेस्ट घालून रताळ्याचे स्टफिंग तयार करुन घ्या. हे स्टफिंग कणकेच्या गोळ्यात भरून चपातीप्रमाणेच पराठा लाटून घ्यावा. रताळ्यात असणारे फायबर आपल्या शरीरासाठी फार आवश्यक असतात. रताळ्याचा पराठा पचायला हलका असतो यासोबतच, त्यात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने दीर्घकाळासाठी आपले पोट भरलेले राहते.
4 / 9
पालक ब्लांच करून तो मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी तयार करुन घ्यावी. ही प्युरी कणकेत मिसळून कणीक व्यवस्थित मळून घ्यावे. या तयार कणकेचे पराठे लाटून भाजून घ्यावेत. पालक पराठा सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी आणखीनच छान लागतो. पालकमध्ये लोह, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट फार मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपली हाडे मजबूत होतात तसेच डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते.
5 / 9
कोबी बारीक चिरुन किंवा किसून घ्यावा. यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, मीठ, चाट मसाला, आलं - लसूण पेस्ट घालून कोबीचे स्टफिंग तयार करून घ्यावे. हे स्टफिंग आपण कणकेच्या गोळ्यात भरून पराठा लाटू शकता. किंवा गव्हाचे पीठ यात घालून ते एकत्रित मळून देखील याचे पराठे लाटू शकता. कोबीतील व्हिटॅमिन 'के' आणि 'सी' आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडांच्या मजबुतीसाठी देखील फायदेशीर ठरते.
6 / 9
गाजर बारीक किसून गव्हाच्या पिठात घाला त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून चपातीप्रमाणे कणीक मळून घ्यावी. या कणकेचे पराठे लाटून तेल किंवा तूप लावून भाजून घ्यावेत. गाजरात असणारे बीटा - कॅरोटीन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होऊन ते निरोगी राहण्यास मदत मिळते तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
7 / 9
मेथी बारीक चिरून किंवा फक्त पाने घेऊन ती गव्हाच्या पिठात मिसळून कणीक मळून घ्यावी. या कणकेचे पराठे लाटून तेल किंवा तूप लावून भाजून घ्यावेत. मेथीच्या पराठ्यांतून आपल्या शरीरास आवश्यक असणारे लोह फार मोठ्या प्रमाणावर मिळते. पचायला हलका असणारा हा मेथीचा पराठा आपण सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो. मेथीची भाजी आवडत नसेल तर त्यासाठी मेथीचा पराठा हा एक उत्तम पर्याय आहे.
8 / 9
बीटरुट उकडून मग ते किसून बारीक करून किंवा मिक्सरमध्ये आलं - लसूण, हिरव्या मिरच्या, बीटरुट वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट कणकेत मिसळून पीठ मळून घ्यावे. या पीठाचे पराठे लाटून ते भाजून घ्यावे. बीटरूटमध्ये असलेलं लोह, अँटिऑक्सिडंट शरीरासाठी आवश्यक असते, यामुळे वजन देखील नियंत्रित केले जाते.
9 / 9
ब्रोकोली उकडून मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, आलं - लसूण पेस्ट, गव्हाचे पीठ घालून मळून घ्यावे. या मळून घेतलेल्या पिठाचे पराठे लाटून ते तेलावर भाजून घ्यावेत. अँटिऑक्सिडंटयुक्त ब्रोकोली पौष्टिक तर असतेच सोबतच लहान मुलांच्या वाढीसाठी मदत करते.
टॅग्स : अन्नपाककृती