कंटाळा येतो, वेळ नाही म्हणून एकदाच कणिक भिजवून फ्रिजमध्ये ठेवता? शिळ्या पोळ्या बऱ्या की..
Updated:August 20, 2024 18:17 IST2024-08-20T15:45:03+5:302024-08-20T18:17:25+5:30

बाकीचा सगळा स्वयंपाक एकीकडे आणि कणिक भिजवून पोळ्या करणं एकीकडे. कारण कणिक भिजवून त्याच्या पोळ्या लाटत बसण्याचं काम अनेकींना खूप कंटाळवाणं आणि वेळखाऊ वाटतं.
त्यामुळे हे काम सोपं करण्यासाठी मग काहीजणी सकाळ- संध्याकाळची कणिक एकदाच भिजवून टाकतात आणि मग जास्तीची कणिक फ्रिजमध्ये ठेवून देतात. ही कणिक बऱ्याचदा काळी पडते. पण तरी आपण तिच्या पोळ्या खातो.
पण अशा फ्रिजमध्ये भिजवून ठेवलेल्या कणकेपेक्षा शिळी पोळी किंवा चपाती खाणं कधीही चांगलं, असं सांगणारा व्हिडिओ doctorhomemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (How long can we eat leftover chapati/roti?)
यामध्ये असं सांगितलं आहे की फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचे गुणधर्म बदलत जातात आणि ती आरोग्यासाठी लाभादायी नसते. पण पोळ्या मात्र तुम्ही केल्यानंतर १२ तासांत खाऊ शकता.
शिळ्या पोळीचा कुस्करा हा आपल्याकडचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. शिळ्या पोळ्या नेहमी दही किंवा ताकासोबत खाव्या. कारण त्यामुळे त्या अधिक पाचक होतात. शिळ्या पोळ्यांमधले अनेक कम्पाउंड बदलत जातात. त्यामुळे त्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात, ते फायदे नेमके कोणते पाहा...
शिळ्या पोळ्यांमधले स्टार्च कमी झालेले असतात आणि पचनासाठी चांगले असणारे बॅक्टेरिया त्यांच्यात वाढलेले असतात.
अशा पोळ्या खाल्ल्याने इन्सुलिन निर्मितीस अडथळा येत नाही. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही त्या उपयुक्त ठरतात.
तसेच व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी शिळ्या पोळ्या अधिक फायदेशीर ठरतात, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.
पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच शिळ्या पोळ्या खाव्या. कणिक फ्रिजमध्ये ठेवून नंतर तिच्या पोळ्या करण्यापेक्षा आधीच पोळ्या करून ठेवा आणि त्या १२ तासांच्या आत संपवा, असा त्यामागचा अर्थ आहे. १२ तासांपेक्षा जास्त शिळी पोळी खाऊ नये.