Join us   

कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्याचा 'असा' करा वापर, इवलुशा देठाचे माहित नसतील इतके उपयोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 8:10 AM

1 / 7
कोथिंबीर ही आपल्या फ्रिजमध्ये कायमच असते. गरमागरम पोहे, उपमा, मिसळ असे काही पदार्थ असतात ज्यावर कोथिंबीर भुरभुरवून घातल्याशिवाय ते पदार्थ खाण्यात मजा येत नाही. आपण अगदी रोजच्या स्वयंपाकात देखील कोथिंबिरीचा वापर करतो. रोज लागणारी ही कोथिंबीर आपण एकदाच विकत आणून ती साफ करुन तिची पान मोडून निवडून ठेवतो. त्यानंतर फ्रिजमध्ये स्टोअर केलेली ही कोथिंबीर आपण पाहिजे तशी वापरतो. पण कोथिंबीर निवडून तिचे देठ मात्र आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण याच कोथिंबिरीच्या देठाचा वापर आपण अनेक पदार्थात करु शकतो तो नेमका कसा करायचा ते पाहूयात(6 Ways To Use Coriander Stem).
2 / 7
कोथिंबीरीचे देठ आपण एकदम बारीक चिरुन सूप मध्ये घालू शकता. सूप मध्ये असे बारीक कोथिंबीरीचे देठ घातल्यानंतर सूप २ ते ३ मिनिटे व्यवस्थित शिजू द्यावे, यामुळे सूपची चव आणखीनच छान लागते तसेच कोथिंबीरचा फ्लेवर त्या सूपमध्ये उतरतो.
3 / 7
कोथिंबीरच्या पानांप्रमाणेच आपण चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीरच्या देठाचा वापर करु शकतो. जर चटणी करताना त्यात कोथिंबीर कमी पडत असेल तर कोथिंबीरचे हिरवेगार देठ धुवून बारीक कापून घालावेत. यामुळे चटणी चवीला स्वादिष्ट तर होतेच सोबत चटणीचा रंग देखील हिरवागार होतो.
4 / 7
आपण काही असे पदार्थ करतो की ते करण्याआधी आपण त्याला छान मॅरीनेट करुन घेतो. असे मॅरीनेट करताना त्या मॅरीनेटच्या बॅटरमध्ये देखील आपण हे कोथिंबीरचे देठ बारीक चिरुन घालू शकतो. कोणताही पदार्थ मॅरीनेट करताना आपण त्यात सुके मसाले, आलं - लसूण पेस्ट, लिंबाचा रस असे अनेक पदार्थ घालतो त्याचप्रमाणे आपण यात कोथिंबीरचे देठ देखील घालू शकता.
5 / 7
कोथिंबीरचे देठ फेकून न देता ते सॅलड किंवा कोशिंबीरमध्ये बारीक चिरुन घालू शकता. यामुळे सॅलड कोशिंबीरची पौष्टिकता तर वाढतेच सोबतच ते चवीला देखील तितकेच चांगले लागते.
6 / 7
आपण साधा पांढरा भात, पुलाव, बिर्याणी असे भाताचे अनेक प्रकार तयार करतो. भाताचे अनेक प्रकार तयार करताना आपण त्यात कोथिंबीरचे देठ घालू शकतो. फ्राईड राईस, मसाले भात, पुलाव, बिर्याणी करताना सर्वात आधी आपण मसाले, आलं - लसूण पेस्ट, कांदा - टोमॅटो हे सगळे पदार्थ परतून त्याचा एक बेस तयार करून घेतो. तेव्हा या बेसमध्ये आपण कोथिंबीरचे देठ बारीक चिरुन घालू शकतो.
7 / 7
भजी, वडे, बटाट्याचे - वांग्याचे काप, बेसन चिला असे तळणीचे पदार्थ अधिक क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण या कोथिंबिरच्या देठाचा वापर करु शकतो. असे तळणीचे पदार्थ तयार करताना त्याच्या बॅटरमध्ये कोथिंबीरचे देठ बारीक कापून घालावेत. यामुळे तळणीचे पदार्थ कुरकुरीत तर होतातच शिवाय ते चवीला देखील अधिक रुचकर व चविष्ट लागतात.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.