Join us   

राखीपौर्णिमेला गोड काय करायचं प्रश्न पडलाय? करा झटपट होणारे ५ हटके पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 12:31 PM

1 / 6
बहिण-भावाच्या नात्याचे सेलिब्रेशन म्हणजे राखीपौर्णिमा (Rakhi Pornima, Raksha Bandhan Celebration 2022). हा दिवस खास व्हावा यासाठी आपण भाऊरायाला घरी जेवायला बोलावतो. भाऊ येणार म्हटल्यावर गोडाधोडाचे जेवण करणे तर ओघानेच आले. नेहमी काहीतरी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी वेळात करता येतील असे गोड पदार्थ कोणते ते पाहूया (Sweet Dish Options)...
2 / 6
दलियाची खीर - आपण शेवयांची खीर नेहमीच करतो. पण पोटभरीचे आणि मोजके पदार्थ करायचे असतील तर दलियाची खीर हा उत्तम पर्याय आहे. गव्हाचा दलिया शिजवून त्यामध्ये गूळ, वेलची पूड, सुकामेवा, तूप आणि दूध घालून ही खीर अतिशय छान लागते.
3 / 6
सुधारस - अगदी पारंपरिक झटपट होणारा हा पदार्थ सगळ्यांना आवडतो. पुरी, गरम पोळी यांच्यासोबत आवडीने खाल्ला जाणारा सुधारस काळाच्या ओघात काहीसा मागे पडला. अगदी कमी पदार्थांमध्ये होणारा सुधारस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. साखरेचा पाक, केळ्याचे काप, सुकामेवा, वेलची पूड आणि लिंबाचा रस यांच्यापासून केला जाणारा सुधारस झटपट होतो.
4 / 6
गुळाचा शिरा - आपण नेहमी प्रसादाला लागतो तसा साखरेचा शिरा करतो. पण गुळाचा शिरा फारसा करत नाही. साधारणपणे घरात रवा, तूप, गूळ हे पदार्थ सहज उपलब्ध असतात. झटपट होणारा आणि खाण्यासाठी पौष्टीक असा हा पदार्थ सगळेच आवडीने खातात. गूळ असल्याने डायबिटीस असणाऱ्यांनाही हा शिरा योग्य प्रमाणात खाल्ला तरी चालतो.
5 / 6
मूगाचा हलवा - हाही एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट पदार्थ आहे. मूगाची डाळ तूपावर भाजून त्याचा भरडा काढायचा. नंतर त्यामध्ये साखर आणि दूध किंवा साय घालून तो चांगला शिजवून घ्यायचा. यामध्ये आपण आवडीनुसार सुकामेवा, केशर घालू शकतो. मूग आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असल्याने हा हलवा आरोग्यदायी होतो. मात्र यासाठी तूप जास्त लागते हे लक्षात घ्यायला हवे.
6 / 6
नारळी भात - हा राखीपौर्णिमा किंवा नारळीपौर्णिमेसाठी आवर्जून केला जाणारा पारंपरिक पदार्थ. ओला नारळ, साखर, वेलची पावडर, सुकामेवा घालून केला जाणारा हा भात या दिवशी आवर्जून घरोघरी केला जातो. एरवी आपण नारळी भात मुद्दाम करत नाही पण या निमित्ताने झटपट होणारा हा भाताचा प्रकार आपण नक्की करु शकतो.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.रक्षाबंधन