Nag Panchami 2024 : नागपंचमी स्पेशल : हळदीच्या वाफाळत्या पातोळ्या, दिंड- गव्हाची खीर, पारंपरिक गरमागरम पदार्थ - तुम्ही कोणता करणार? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2024 3:22 PM 1 / 8श्रावण महिना म्हटलं की येतात ते अनेक सण. या महिन्यांत आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण अत्यंत आनंद साजरे करतो. श्रावण महिन्यात सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला नाग देवतेची पूजा करुन वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात. श्रावणात येणाऱ्या सणादरम्यान प्रत्येक घरात अनेक पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. नागपंचमी सणादिवशी काही कापायचे, चिरायचे नसते अशी फार पूर्वीपासूनची प्रथा आहे म्हणूनच या दिवशी पदार्थ वाफवून किंवा उकडवून केले जातात. नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर, अळूवड्या, पुरणाचे दिंड, पाटवड्या असे अनेक पारंपरिक पदार्थ केले जातात त्यापैकीच काही पारंपरिक पदार्थ पाहूयात.2 / 8कोकणात नागपंचमीला हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे हळदीच्या पानांतील पातोळ्या. या पातोळ्या थोड्याफार मोदका प्रमाणेच केल्या जातात. मोदकाप्रमाणेच तांदुळाच्या पिठाचे आवरण तयार करुन त्यात गूळ, ओल्या खोबऱ्याचे सारण भरुन या पातोळ्यांना करंजीसारखा आकार दिला जातो. नंतर या पातोळ्या हळदीच्या पानांत गुंडाळून वाफवून घेतल्या जातात. या गरमागरम पातोळ्यांवर तुपाची धार सोडून ७ ते ८ पातोळ्या फस्त केल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही. 3 / 8पाटवड्या हा विदर्भ, मराठवाडा, खान्देश, अशा महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जाणारा खास पदार्थ आहे. पाटवड्या या पाटवडीच्या रस्स्यासोबत खाल्ल्या जातात परंतु नागपंचमीला या पाटवड्या नुसत्याच खाल्ल्या जातात. बेसन पिठात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालून ताकात हे पीठ कालवून मग त्याला जिरे, मोहरीची फोडणी देत हे पीठ शिजवून घ्यावे. त्यानंतर या पिठाच्या वड्या पाडून घ्याव्यात. बारीक चिरलेली कोथिंबीर, ओल्या खोबऱ्याचा किस भुरभुरवून या पाटवड्या खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात. 4 / 8पुरणाचे दिंड हा प्रकार थोडाफार पुरणपोळी सारखाच असतो. पुरणाचे दिंड करताना पुरणपोळीचे जसे पुरण तयार करून घेतो तसेच पुरण तयार करुन घ्यावे. त्यानंतर चपातीसाठी कणीक भिजवतो तशी कणीक भिजवून घ्यावी. कणकेच्या गोल पुऱ्या करुन त्यात हे पुरण भरुन चारही बाजुंनी बंद करुन नंतर मोदकाप्रमाणेच स्टीमरमध्ये ठेवून वाफवून घ्यावेत. गोड पुरणाचे दिंड खाण्यासाठी तयार आहेत. 5 / 8 सण म्हटलं की आपण गोडाधोडाचे अनेक प्रकार करतोच. खीर ही त्यापैकीच एक. नागपंचमीला आपण विशेष गव्हाची खीर तयार करतो. गहू भिजत घालून त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तयार करुन त्यात जायफळ, वेलची पूड घातली जाते. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुटसचे काप घालून आपण ही खीर आधी चविष्ट करु शकतो. 6 / 8नागपंचमी निमित्त खास अळूवड्यांचा बेत केला जातो. अळूच्या पानांना चिंच - गूळ, बेसन पीठ लावून या वड्या वाफवून घेतल्या जातात. त्यानंतर या वड्या तेलात तळून खमंग, कुरकुरीत वड्या खाण्यासाठी सर्व्ह केल्या जातात. 7 / 8फुणके म्हणजे एक प्रकारचे शॅलो फ्राय कटलेट. हरभऱ्याची डाळ भिजवून त्यानंतर त्याची वाटून पेस्ट करून घ्यावी यात हळद, हिरवी मिरची, आलं, इतर मसाले असे अनेक पदार्थ घालून या बॅटरचे छोटे छोटे कटलेटच्या आकाराचे गोल फुणके तयार करुन घ्यावेत. आता हे फुणके तेलात खरपूस तळून घ्यावेत. 8 / 8नागपंचमीला गरमागरम, खरपूस ज्वारीचे वडे हे अगदी आवर्जून केले जातात. ज्वारी, गहू यांचे पीठ घेऊन त्यात बेसन, लसूण, आलं - हिरवी मिरची पेस्ट घालावी. त्यानंतर त्यात जिरेपूड, मीठ, कोथिंबीर, तीळ, ओवा घालून हे पीठ मिक्स करून घ्यावे. त्यानंतर गरम पाण्यात हे पीठ घट्ट भिजवून त्याचे गोलाकार वडे लाटून गरम तेलात खरपूस तळून घ्यावेत. आणखी वाचा Subscribe to Notifications