Join us   

शाळा सुरु होणार, रोज सकाळी मुलांना डब्यात काय द्यायचं? पहा झटपट, ७ पौष्टिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 3:30 PM

1 / 8
पुढच्या आठवड्यापासून मुलांच्या शाळा सुरू होतील. शाळा सुरू झाल्या की सकाळी सकाळी डब्याला काय द्यायचं हा प्रश्न तमाम आयांना भंडावून सोडतो. सकाळच्या घाईत रोज पोहे आणि उपीट देऊन मुलांचे त्यातून पोषण होत नाही. अशावेळी झटपट होणारे तरीही पौष्टीक काही दिले तर, पाहूया असेच काही पर्याय
2 / 8
एखादे कडधान्य भिजवून त्याला मोड आणावेत. या कडधान्याची उसळ करुन त्यावर कांदा, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर असे द्यावे. दुसऱ्या एका डब्यात थोडे फरसाण द्यावे. कडधान्य हा नाश्त्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच त्यासोबत सलाड पोटात जात असल्याने आणखी चांगले. मिसळ मिळाल्याने मुलेही खूश आणि आपणही. यामध्ये आपण मिक्स कडधान्ये किंवा वेगवेगळी कोणतीही कडधान्ये देऊ शकतो.
3 / 8
पराठा हा झटपट होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. पालक, मेथी, कोबी, दुधी, गाजर, बीट, बटाटा अशा कोणत्याही भाज्या किंवा पनीर, चीज यांचा पराठा आपण मुलांना डब्याला देऊ शकतो. त्यामध्ये आलं-मिरची लसूण पेस्ट घातली की त्यालाा छान चवही येते. दही किंवा स़ॉस, लोणचे या कशासबोतही हा पराठा खाता येतो.
4 / 8
आपण रोज साधारणपणे पोळ्या खातो. त्यामुळे गहू आपल्या पोटात जातो. पण ज्वारी, बाजरी, नाचणी ही धान्ये तुलनेने कमीच जातात. या पीठांचे डोसे अतिशय छान होतात. झटपट होणारे हे डोसे चवीलाही छान लागतात. यापैकी कोणतेही एक पीठ, त्यामध्ये थोडा रवा आणि दही, ओवा आणि मीठ घालून पातळसर पीठ १० मिनीटे भिजवून ठेवावे. त्यानंतर नॉनस्टीक तव्यावर तेल लावून डोसे घालायचे. हे डोसे अगदी पटकन आणि सुळसुळीत निघतात.
5 / 8
सलाड हा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. यामध्ये पनीर, टोफू, मशरुम असे काही असेल तर आणखीनच चांगले. यामध्ये आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, कोबी, ग्रीन सलाड, कोथिंबीर, कांदा यांचा समावेश करु शकतो. यात चवीसाठी मिरपूड, मीठ किंवा मिक्स हर्ब चांगले लागतात. यामध्ये एखादे कडधान्य, डाळींबाचे दाणे, कलिंगडाचे काप असे आपण आपल्या आवडीनुसार काहीही घालू शकतो. पोटभरीचा आणि हेल्दी पदार्थ डब्यासाठी चांगला पर्याय आहे.
6 / 8
उडीद, मूग यांसारख्या डाळी रात्री भिजत घातल्या आणि सकाळी उठल्या उठल्या लसूण, मिरची घालून मिक्सर केल्या तर त्यांची छान चविष्ट धिरडी होऊ शकतात. डाळींमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असल्याने अशी धिरडी आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात. यामध्ये भरपूर कोथिंबीर घातल्यास त्याची पौष्टीकता आणखी वाढते. तीन ते चार धिरडी डब्यात नेली तरी पोटभरीचे होते.
7 / 8
पुलाव हा मुलांचा ऑल टाइम फेवरिट पदार्थ असतो. पोटात भाज्या जाव्यात यासाठी हा पुलाव उत्तम उपाय आहे. घरात असतील त्या फरसबी, मटार, फ्लॉवर, ढोबळी, गाजर अशा कोणत्याही भाज्या या पुलावामध्ये घालता येतात. भाज्या आदल्या दिवशी चिरुन ठेवल्यास सकाळी पुलाव झटपट होऊ शकतो. काळी मीरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र यांची फोडणी घालून शिजवलेला हा पुलाव चवीलाही चांगला लागतो.
8 / 8
मुलांना आवडतील आणि झटपट होतील असे रव्याचे आप्पे हा डब्यासाठी थोडा वेगळा आणि झटपट होणारा प्रकार आहे. रव्यामध्ये दही, मिरची, जीरे आणि मीठ घालून ते १० ते १५ मिनीटे भिजवायचे. पाणी घालून थोडे सरबरीत करायचे. आणि आप्पे पात्रामध्ये तेल लावून याचे आप्पे घालायचे. गरमागरम आप्पे आणि चटणी डब्यात नेली तर पोटभरीचा आणि वेगळा नाष्ता होऊ शकतो.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.