Join us   

आजचा रंग लाल : हे ६ लालचुटुक पदार्थ आपल्या आहारात हवे ! रोज खा - अशक्तपणा करा कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 8:00 AM

1 / 8
नवरात्रीत नवरंगांना विशेष महत्व असते. या नऊ दिवसात महिला अगदी प्रत्येक दिवशी प्रत्येक रंग फॉलो करतात. प्रत्येक दिवशी अगदी त्या - त्या रंगाचे कपडे परिधान करून अगदी नटून थटून त्या तयार होत असतात. परंतु या साजशृंगारासोबतच जर आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले तर ती अधिक फायदेशीर ठरेल. या नऊ दिवसांच्या रंगांप्रमाणे जर आपण प्रत्येक एका दिवशी त्या रंगाचे पदार्थ खाण्याला प्राधान्य दिले तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते अधिक उपयुक्त ठरेल. आज लाल रंगाच्या निमित्ताने आपण कोणते लाल पदार्थ खाऊ शकतो ते पाहूयात(Importance & Benefits Of Red Color Food).
2 / 8
आपण कलिंगड, सफरचंद, चेरी, डाळिंब, प्लम यांसारखी लाल रंगांची वेगवेगळ्या प्रकारची फळ खाऊ शकता. या रंगाची फळे खाल्ल्याने शरीरातील रक्त वेगाने वाढते. लाल रंगाची फळे अ‍ॅनिमियाच्या रुग्णांसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. याशिवाय त्यामध्ये लाइकोपिन असते ; जे कॅन्सर, हृदयाशी संबंधित आजार व डोळ्यांच्या समस्या दूर करण्यात मदत करते.
3 / 8
बीट किसून किंवा त्याचा रस काढून गव्हाच्या पिठात मिसळून आपण त्याचे पौष्टिक पराठे देखील बनवू शकतो. शक्यतो लहान मुलं किंवा घरातील इतर मंडळी बीट खाण्यासाठी नाकं मुरडतात अशावेळी आपण बीटाचा पौष्टिक पराठा बनवू शकतो. बिटाच्या पराठ्यांप्रमाणेच बीटाची भाजी, कोशिंबीर, बीटाचा रस आणि बीटाचा उपयोग करुन सँडवीज असे वेगवेगळे प्रकार करता येऊ शकतात.
4 / 8
लालचुटुक टोमॅटोची चटकदार चटणी बनवण्यासाठी लालेलाल, ताजे, शिजवून मॅश केलेले टोमॅटो लागतात. इडली, डोसा आणि गरमा गरम भातासोबत साइड डिश म्हणून अनेक भारतीय घरांत या स्वादिष्ट टोमॅटोच्या चटणीचा आस्वाद घेतला जातो. तोंडाला पाणी आणणारी, आंबट-तिखट अशी ही लालेलाल टोमॅटो चटणी आपण थंड व कोरड्या ठिकाणी स्टोअर करुन अनेक दिवस त्याचा आनंद घेऊ शकतो.
5 / 8
साऊथ इंडियन डिश मधील सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांना आवडणारा खास पदार्थ म्हणजे सांबार. डोसा, मेदू वडा, इडली यांसारख्या नाश्त्याच्या पदार्थांचा परफेक्ट पार्टनर म्हणजे सांबार. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करुन हे सांबार बनवले जाते हीच त्याची मुख्य खासियत आहे. सांबारमध्ये तूरडाळ, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, दुधी भोपळा यासारख्या फळभाज्यांचा समावेश असतो. हे सांबार खाण्यासाठी जितके चविष्ट लागते तितकेच ते पौष्टिक असते.
6 / 8
लाल माठाच्या भाजीत भरपूर फायबर असते, त्यामुळे पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी ही भाजी नियमित खावी. यासोबतच यात व्हिटॅमिन्स व खनिजे देखील भरपूर प्रमाणांत असतात. व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असते. त्यामुळे केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी उत्तम आहे. माठाच्या भाजीमध्ये लोह, मँगनीज आणि फोलेटचे प्रमाण देखील अधिक असते. ही भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी छान लागते.
7 / 8
साऊथ इंडियन पदार्थ म्हणून प्रसिद्ध असलेला गरमागरम आंबट - गोड चवीचा टोमॅटो राईस चवीला उत्तम लागतो. भरपूर लालचुटुक, ताज्या, रसाळ टोमॅटो व मसाल्यांचा वापर करुन आपण हा झटपट होणारा टोमॅटो राईस बनवू शकतो.
8 / 8
नाचणीमध्ये अमिनो अ‍ॅसिड, फायबर हे अधिक प्रमाणात असते. एवढंच नाही तर नाचणीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम, आयर्न देखील असतं. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या बहुगुणी नाचणीपासून बनवलेली भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीअन्न