Winter Food: रसरशीत फळांचा मेवा, हृदयविकार दूर ठेवा; हिवाळ्यात आवर्जून खा 'ही' फळं!
Updated:January 15, 2025 17:30 IST2025-01-15T17:18:24+5:302025-01-15T17:30:34+5:30
Winter Food: हिवाळ्यात हृदयाची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण याच काळात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. थंडीच्या वातावरणात रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात त्यामुळे रक्ताभिसरण कमी होते. रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आणि ज्या लोकांची जीवनशैली आधीच खराब असते त्यांच्या हृदयाला जास्त धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत, हृदय निरोगी राहावे म्हणून ऋतुमानानुसार कोणत्या फळांचा आहारात समावेश करायला हवा ते जाणून घेऊ.

हिवाळ्यात पचन शक्ती मंदावते. पण भूकही फार लागते. त्यामुळे पचायला हलके आणि शरीराला पोषक अशा पदार्थांचा आहारात समावेश करा असे आहार तज्ज्ञ सांगतात. त्यातही हिवाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं यांचे शक्य तेवढे जास्त सेवन केले तर शरीराला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. म्हणून आहार तज्ज्ञांनी सुचवलेले बदल करा आणि गुलाबी थंडीचा टेन्शन फ्री राहून आनंद घ्या.
अक्रोड :
हिवाळ्यात अक्रोड सारख्या सुक्या फळांचा किंवा सुक्या मेव्याचा आहारात समावेश करावा, त्यात ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते. यामध्ये अल्फा लिनोलेनिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
संत्र :
हिवाळ्यात रसरशीत संत्री बाजारात येतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध संत्र्याचे सेवन करणे आवश्यक असते. त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि रक्तवाहिन्यांचे काम सुरळीतपणे चालते. व्हिटॅमिन सी जळजळ कमी करते.
आवळा :
हिवाळ्यात तुम्ही आवळ्याचेही सेवन करावे. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर देखील भरपूर आहेत, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्वचा, केस यांचेही आरोग्य सुधारते.
लसूण :
कच्च्या लसणाचाही आहारात समावेश करावा. त्यात ॲलिसिन नावाचे संयुग असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते, रक्तवाहिन्या निरोगी बनवते, जे हृदयाच्या आरोग्यास पुष्टी देते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदाने रोज दोन लसूण पाकळ्या अंशपोटी खाव्यात असा सल्ला दिला आहे. ब्रश करण्याआधी लसूण खाणे केव्हाही चांगले.