Winter Food: हिवाळ्यात गुलाबी पेरू खा; बिया ना दातात अडकणार, ना रक्तातील साखर वाढवणार!
Updated:December 31, 2024 17:20 IST2024-12-31T17:11:16+5:302024-12-31T17:20:39+5:30
Winter Food: स्वस्त आणि मस्त फळ अशी ओळख असलेला पेरू हिवाळ्यात नाविन्यपूर्ण ढंगात अवतरतो. जो गोड असूनही साखर वाढवत नाही आणि त्याच्या बिया दातात अडकतही नाही. शिवाय या पेरूचे सरबत अगदीच रिफ्रेशिंग असते. भरपूर प्रमाणात शरीराला लोह देणारा पेरू आपल्या आहारात समाविष्ट करायलाच हवा, जाणून घेऊया अधिक फायदे!

उत्तम आरोग्यासाठी रोज एक तरी फळ खा असे डॉक्टर सांगतात, पण सगळीच फळे खिशाला परवडतात असे नाही. मात्र पेरू हे फळ इतर फळांच्या तुलनेत नक्कीच स्वस्त असते आणि सहज उपलब्ध असते. मात्र हिवाळ्यात बाहेरूप पोपटी आणि आतून गुलाबी रंगाचे पेरू बाजारात येतात. आतून पांढऱ्या असणाऱ्या पेरूच्या तुलनेत ते वेगळे कसे आहेत आणि किती गुणकारी आहेत ते जाणून घेऊ.
हिवाळा आणि पावसाळा हे पेरूचे मुख्य ऋतु आहेत, पण हिवाळ्यात बाजारात मिळणारे पेरू जास्त गोड आणि चविष्ट असतात. पेरू नुसता चांगला लागतोच, पण काही खवय्ये त्यापासून अनेक रेसेपी देखील बनवतात. पेरू खाणे महत्त्वाचे! कारण त्यात प्रथिनांचा आणि जीवनसत्त्वांचा समावेश असतो. जो आरोग्य वर्धक असतो. त्यामुळे डोळ्याचे, पोटाचे विकारही बरे होतात. एवढेच काय तर पेरूची पानेदेखील अत्यंत गुणकारी मानली जातात.
दोन्ही पेरूमधला फरक
गुलाबी आणि पांढऱ्या पेरूच्या पोषकतत्त्वांमध्ये खूप फरक आहे. पेरूचा लाल रंग लाइकोपीन नावाच्या रंगद्रव्यामुळे असतो. हा एक प्रकारचा नैसर्गिक रंग आहे जो पेरूच्या लगद्यामध्ये आणि सालीमध्ये असतो. तर पांढऱ्या पेरूमध्ये लाइकोपीन नावाच्या रंगद्रव्याचा अभाव असतो. ज्यामुळे ते पांढरे दिसते. गुलाबी पेरूमध्ये बिया कमी असतात किंवा काहींमध्ये अजिबात बसतात. त्यामुळे पेरूची बी दातात अडकण्याचा प्रश्न येत नाही आणि फळाचा आनंद घेता येतो.
चवीत फरक :
पांढऱ्या पेरूची चव थोडी आंबट आणि गोड असते. तर लाल पेरू हा बहुतेक गोड असतो. यासोबतच लाल पेरूमध्ये रसही जास्त असतो. तिखट मीठ न लावताही या पेरूच्या फोडी रुचकर लागतात.
दोन्ही प्रकारच्या पेरूचा वापर
या दोन्ही पेरूंचा वापर करण्याच्या पद्धतीत आणि त्यांच्या रचनेत खूप फरक आहे. लाल पेरू थोडा मऊ असतो आणि पांढरा पेरू कडक असतो. मात्र, शिजवल्यानंतर दोन्ही मऊ होतात. लाल पेरूपासून स्मूदी, ज्यूस आणि आईस्क्रीम इत्यादी बनवता येते. तर पांढऱ्या पेरूपासून चटणी, लोणचे, कोशिंबीर बनवता येते.
पेरू खाण्याचे लाभ :
लाल पेरूमध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते. ते अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी परिपूर्ण असते. त्याचे सेवन त्वचा आणि हृदयासाठी चांगले असते. तर पांढऱ्या पेरूमध्ये कमी प्रमाणात लाइकोपीन कमी असले तरी व्हिटॅमिन सी आणि लोह चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. वेट लॉस करणाऱ्यांसाठी तसेच मधुमेही, रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे फळ अतिशय उपयुक्त ठरते. पाळीच्या समस्येवरही अतिशय लाभदायी असे हे फळ आहे. त्वचेचा पोत सुधारतो आणि शरीरात कॅन्सरला रोखणाऱ्या पेशी तयार होतात.