५९% भारतीय दररोज घेतात ६ तासांपेक्षा कमी झोप; कॅन्सरसह 'या' ७ आरोग्य समस्यांचा मोठा धोका
Updated:March 11, 2025 15:24 IST2025-03-11T14:57:36+5:302025-03-11T15:24:14+5:30
पुरेशी झोप न मिळाल्याने कोणत्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया.

लोकलसर्कलने केलेल्या एका सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की, ५९% भारतीय दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात. यापैकी जवळजवळ निम्मे लोक आठवड्याच्या शेवटीही झोपेची कमतरता भरून काढू शकत नाहीत.
रिसर्चमधून असंही दिसून आलं की, ३८% भारतीयांना सुट्टीच्या दिवशी किंवा आठवड्याच्या शेवटीही झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी संघर्ष करावा लागतो. झोप न येण्याने त्रस्त ७२% लोक रात्री वारंवार उठून वॉशरूममध्ये जातात.
वाढतं वय, अनियमित झोपेची पद्धत, मेटाबॉलिज्म, रात्री स्क्रीन टाइम, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि मद्यपान यासारखे घटक झोपेच्या व्यत्ययाची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहेत.
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने किमान ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. जर तुम्ही ६ तासांपेक्षा कमी झोप घेतली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्याने कोणत्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया.
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते
झोपेचा अभाव शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो, ज्यामुळे आजारांचा धोका वाढतो. रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, झोप आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्यात संबंध आहे.
हृदयासंबंधी समस्या
५ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक आणि हृदयरोगांचा धोका वाढतो.
कॅन्सरचा धोका वाढतो
अपुऱ्या झोपेचा संबंध कॅन्सरशी जोडला गेला आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये हा धोका आणखी जास्त असतो.
विचार, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम
एका रात्रीची अपूर्ण झोप देखील मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकते. कमी झोपेमुळे लक्ष केंद्रित करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो असं रिसर्चमध्ये आढळून आलं आहे.
स्मरणशक्ती कमकुवत होते
झोपेचा अभाव स्मरणशक्तीवर परिणाम करतो. रिसर्चमध्ये असं दिसून आले आहे की, चांगली झोप मेंदूची लक्षात ठेवण्याची आणि शिकण्याची क्षमता मजबूत करते.
वजन वाढणं
अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. २१,४६९ लोकांवर केलेल्या रिसर्चमध्ये असं आढळलं की जे लोक दिवसातून ५ तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.
मधुमेहाचा धोका
कमी झोप घेतल्याने शरीराच्या इन्सुलिन सेन्सिटिव्हीटीवर परिणाम होतो, ज्यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. नियमितपणे ७ ते ८ तास झोप घेतल्याने मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
पुरेशी झोप केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. म्हणून, तुमच्या झोपेची दिनचर्या संतुलित ठेवा आणि चांगल्या आरोग्यासाठी दररोज ७-८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.