६ चुका केल्या तर दात कायम पिवळेच दिसतात! चमकदार- स्वच्छ-पांढरेशुभ्र दात हवे तर..
Updated:April 22, 2025 17:46 IST2025-04-22T17:18:02+5:302025-04-22T17:46:02+5:30

बऱ्याच जणांच्या बाबतीत असं दिसनू येतं की ते दातांची खूप काळजी घेतात. पण तरीही त्यांच्या दातांचा पिवळेपणा काही केल्या कमी होत नाही.(how to get rid of yellow teeth?)
कारण रोजच्यारोज त्यांच्याकडून अशा काही चुका होत जातात की त्यामुळे दातांवर पिवळा थर साचत राहातो आणि मग तुम्ही दिवसांतून कितीही वेळा ब्रश केला तरी दात काही पांढरेशुभ्र होत नाहीत. त्या चुका नेमक्या कोणत्या ते पाहा..(6 Everyday Mistakes That Might Cause Yellow Teeth)
याविषयी डॉ. मनदिप सिंग मल्होत्रा यांनी दिलेली माहिती टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहे. यामध्ये ते असं सांगत आहेत की सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात खूप स्ट्राँग चहा घेऊन करणाऱ्यांचे दात पिवळे होण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण चहातल्या टॅनिनमध्ये असणारे काही घटक दातांवर चिकटून बसतात आणि दातांचा पिवळेपणा वाढवतात.
काही लोकांना दात खूप जोर देऊन घासण्याची सवय असते. यामुळे दातांवर असलेले आवरण पातळ होत जाते आणि त्यामुळे दात पांढरे दिसण्याऐवजी पिवळट दिसू लागतात.
ब्रश करण्यासाठी नेहमी सॉफ्ट ब्रिसल्स असणारा ब्रश वापरावा. यामुळे दातांवरचे आवरण टिकून राहाते आणि त्यामुळे दातांचा चमकदार पांढरेपणा टिकून राहण्यास मदत होते. कडक ब्रश असेल आणि तो ही दातांवर खूप जोरजोरात दाब देऊन घासण्याची सवय असेल तर दातांवरचे आवरण पातळ होऊन दात पिवळे होऊ शकतात.
आपल्याकडे जोपर्यंत दातांची काहीही तक्रार नसते तोपर्यंत दातांची तपासणी करायला कोणीही जात नाही. पण ही सवय चुकीची आहे. वर्षातून एकदा तरी डेंटिस्टकडे जाऊन दातांची स्वच्छता करणं गरजेचं आहे. यामुळे दातांची चमक आणि त्यांचे आरोग्य दोन्हीही टिकून राहण्यास मदत होते.
जे नेहमीच गोड पदार्थ खातात आणि त्यानंतर दातांची पुरेशी स्वच्छता करत नाहीत, त्यांनाही दातांच्या पिवळेपणाचा त्रास सुरू होतो आणि त्याशिवाय इतरही त्रास होतात.
डॉक्टर सांगतात की स्ट्रेस हे देखील दातांच्या पिवळेपणाचं एक कारण असू शकतं. कारण खूप ताण असेल, चिडचिड होत असेल तर अनेकांना दात खाण्याची सवय असते. याशिवाय खूप ताणामुळे तोंड कोरडं पडतं. तोंडात गरजेपुरती लाळ तयार होत नाही. त्यामुळे मग अन्नपदार्थांचे अनेक सुक्ष्म कण दातांवर चिकटून राहतात आणि दातांचे आरोग्य बिघडू लागते.