Join us

Early Menopause: अवघ्या चाळीशीत महिलांना का येऊ लागला आहे मेनोपॉज? जाणून घ्या ५ कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:35 IST

1 / 9
महिलांच्या आयुष्यात तीन महत्त्वाच्या घटना असतात. पहिली मासिक पाळी, जी स्त्रीला गर्भधारणेची संधी मिळाल्याचे दर्शवते. दुसरी, गर्भधारणा आणि तिसरी, रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी बंद होणे. हा स्त्रीत्त्वाचा मुख्य प्रवास आहे. हे तिन्ही सोहळे बाईला बाईपण बहाल करणारे आहेत. हा तिचा सन्मान आहे आणि तिच्या अस्तित्त्वाची खूण सुद्धा! हे तिन्ही टप्पे सांभाळून आपले शारीरिक, मानसिक आरोग्य जपत ती घर, संसार सांभाळून कर्तृत्त्व सिद्ध करते हे आणखीनच गौरवास्पद आहे. मात्र लवकर येणारा मेनोपॉज हा तिच्या आयुष्यातील अनाकलनीय टप्पा ठरू शकतो. तसे का होते ते जाणून घेऊ.
2 / 9
वास्तविक पाहता रजोनिवृत्ती ४५ ते ५५ वयोगटात येते, परंतु आजकाल महिलांना कमी वयात रजोनिवृत्तीचा अनुभव येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञांचे मत जाणून घेऊ.
3 / 9
रजोनिवृत्तीचे दोन टप्पे असतात. पहिला म्हणजे रजोनिवृत्तीपूर्व काळ ज्यामध्ये मासिक पाळी पूर्णपणे थांबत नाही तर अनियमित होते किंवा मासिक पाळी अनेक दिवसांनी येते. दुसरा टप्पा म्हणजे जेव्हा मासिक पाळी हळू हळू बंद होऊ लागते आणि थांबते याला रजोनिवृत्ती म्हणून ओळखले जाते.
4 / 9
या गोष्टीला मुख्यत्त्वे कारणीभूत आहे आपली बददललेली आहार आणि जीवनशैली! वेळेअभावी महिला अनेकदा पॅक केलेले किंवा जंक फूड खातात. त्यात पोषणाचा अभाव असतो, ज्यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकते. याशिवाय बाहेरच्या पदार्थात अतिरिक्त कॅलरीज वापरल्या जातात, परंतु पुरेसा व्यायाम न केल्यामुळे लठ्ठपणा येतो. आणि हार्मोनल असंतुलित होऊन अकाली रजोनिवृत्ती येऊ शकते.
5 / 9
घरात, ऑफिसमध्ये, व्यवसायात येणारा कामाचा तणाव देखील हार्मोनल असंतुलनासाठी करतो. दीर्घकाळापर्यंत मानसिक ताणामुळे शरीरात लक्षणीय बदल होतात, जे प्रजनन प्रणालीवर परिणाम करतात आणि लवकर रजोनिवृत्ती होऊ शकतात.
6 / 9
वाढते प्रदूषण देखील यासाठी जबाबदार ठरू शकते. प्रदूषणामुळे, वाईट रसायने शरीरात प्रवेश करतात आणि हार्मोनल संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. यामुळे लवकर रजोनिवृत्ती देखील होऊ शकते.
7 / 9
अनेक प्रकारच्या गंभीर आजारात उपचाराचा एक भाग म्हणून केमोथेरपी आणि रेडिओथेरपीसारख्या उपचारांमुळे अंडाशय काम करणे थांबवू शकतात, ज्यामुळे रजोनिवृत्ती देखील होऊ शकते.
8 / 9
रजोनिवृत्ती देखील अनुवांशिक कारणांवर अवलंबून असते. जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला लवकर रजोनिवृत्ती येते, तर तिच्यासोबतही असेच होऊ शकते. मात्र तसेच होते असे नाही, त्याला अन्य गोष्टीही कारणीभूत असतात.
9 / 9
रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्याचा एक टप्पा आहे. त्याआकाळात अकारण उदास, निराश वाटू शकते. आता आपल्याला कोणीच विचारत नाही अशी भावना निर्माण होते, एकाकी वाटू लागते. टोकाचे विचार येतात. हे टाळण्याची पूर्वतयारी म्हणजे याही टप्प्याचे आनंदाने स्वागत करा, स्वतःला आवडत्या कामांमध्ये, मैत्रिणींमध्ये, छंद वर्गामध्ये गुंतवून घ्या. सकस आहारावर लक्ष घ्या, बाहेरचे तेलकट, तुपकट खाणे टाळा, जेणेकरून निरोगी राहता येईल.
टॅग्स : महिलाआरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य