उन्हाळ्यात मासिक पाळीच्या दिवसात गळून गेल्यासारखं वाटतं, तगमग होते? ९ टिप्स - वाटेल फ्रेश... Published:March 31, 2023 06:41 PM 2023-03-31T18:41:59+5:30 2023-03-31T18:53:52+5:30
Top Tips For Coping With Your Period During Summer : मासिक पाळीतली दुखणी आणि त्यात उन्हाळ्यात होणारा डिहायड्रेशन, युरिन इन्फेक्शनचा त्रास यावर उपाय काय? मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. दर महिन्यात चार ते पाच दिवस येणारी मासिक पाळी हा काळ स्त्रियांसाठी खूप वेदनादायी काळ असतो. व्यक्तीपरत्वे मासिक पाळी दरम्यान अनेकींना वेगवेगळे अनुभव येतात. कोणाला खूप त्रास होतो तर काहींना अजिबात वेदना होत नाहीत. काही महिलांना क्रॅम्प्स, मूड स्विंग आणि ब्लोटिंगचा सामना करावा लागू शकतो. पण ही एक नैसर्गिक आणि गरजेची प्रक्रिया असून मासिक पाळी येणं ही चांगली बाब असते. म्हणूनच, महिन्याच्या या काही दिवसांमध्ये खूप काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात आपण सगळेच वाढत्या उष्णतेमुळे हैराण होतो त्यातच पिरिएड्स आले तर जीव नकोस होतो. घाम, उष्णता, गरमी यामुळे आधीच खूप थकवा आलेला असताना त्यात पिरिएड्स आले तर अजून नकोसे होते. उन्हाळ्यात मासिक पाळी अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करण्यासाठी तुम्ही नक्की काय करू शकता? याबाबत मॅक्स हेल्थकेअरमधील प्रसूती आणि स्त्रीरोग सल्लागार, डॉ. प्रियंका चौहान यांनी सांगितलेल्या काही महत्वाच्या टिप्स(How To Cope In A Summer Season When You're On Your Period).
१. भरपूर पाणी प्यावे :-
आपण दिसभराच्या कामात कितीही व्यग्र असलात तरीही थोडा वेळ काढून पाणी प्यावे. आपल्या रोजच्या कामातून थोडा वेळ काढून काही ठराविक काळाने थोडे थोडे पाणी पीत राहावे. उन्हाळ्यांत वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. यामुळेच उन्हाळयात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रावांचा समतोल राखण्यासाठी पाणी गरजेचं आहे. आपल्या शरीरातील द्रावांचे कार्य योग्य पद्धतीने चालावे यासाठी शरीराचे तापमान योग्य राखणे आवश्यक असते. डिहाड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मंदावते. पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने शरीराची कार्य करण्याची क्षमता खालावते, त्यामुळे पोटात क्रॅम्प्स किंवा पेटके येतात. यासाठी उन्हाळ्यांत मासिक पाळी आली असता या काळात भरपूर पाणी प्यावे.
२. मासिक पाळी दरम्यान कॅफिनयुक्त पेये आणि अल्कोहोल टाळा :-
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, जर आपण अकोल्होल आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला झोपेचा त्रास व डोकेदुखी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागेल. मासिक पाळीच्या दिवसात कॅफिनयुक्त पदार्थ व अकोल्होलचं सेवन केल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या हार्मोन्सवर झालेला दिसून येतो.
३. स्वच्छ आणि ताजे अन्न खावे :-
मासिक पाळी दरम्यान घरी बनवलेले स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यावर जास्त भर द्यावा. समतोल आहारामुळे पाळीचं चक्र नियमित राहातं. पाळीमध्ये अगोदरपासूनच गुंतागुंत असेल तर आहारात योग्य बदल केल्यानं फायदा होऊ शकतो. जंक फूडमुळे मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाळी उशीरा येणं किंवा वेळेपेक्षा जास्त लांबणं असे प्रकार घडू शकतात. अन्नात हिमोग्लोबिनची कमतरता असेल पाळीच्या वेळी कमी रक्तस्राव होऊन त्रास होऊ शकतो. यासाठी पाळीच्या दरम्यान स्वच्छ आणि ताजे अन्न खावे. मासिक पाळी दरम्यान शरीर थकते. महिलांना खूप थकवा जाणवतो. अशावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात फळे खावीत. त्याचसोबत पाणी प्यावे, पालेभाज्या, आलं, हळद, बदाम, काजू यासोबतच प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
४. मासिक पाळी दरम्यान पुरेशी झोप घ्यावी :-
मासिक पाळी दरम्यान पुरेशी झोप घ्यावी. किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. मासिक पाळी सुरु असताना महिलांना बराच थकवा येतो. हा थकवा दूर कारण्यासाठी मासिक पाळी दरम्यान पुरेशी झोप घ्यावी. मासिक पाळी दरम्यान आपल्या झोपेचे रोजचे रुटीन व्यवस्थित फॉलो करावे.
५. केमिकल प्रोडक्टचा वापर टाळा :-
मासिक पाळीच्या दरम्यान योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी केमिकल फ्री प्रोडक्टचा वापर करावा. काही प्रोडक्टमध्ये केमिकल असते त्यामुळे आपल्या योनीमार्गाला त्रास होऊ शकतो.
६. स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला :-
मासिक पाळी दरम्यान स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला आणि काही ठराविक तासांनी ती बदला. अस्वच्छ अंतर्वस्त्रांमुळे शरीरातून दुर्गंधी येत राहते आणि संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. या दिवसांत महिलांनी जास्तीत जास्त सुती अंतर्वस्त्र घालण्याचा प्रयत्न करावा. कारण यामुळे त्वचा मऊ राहते आणि त्या भागांवर वारंवार खाजेची समस्या उद्भवणार नाही. याचबरोबर आरामदायी सैल-फिटिंग कॉटनची अंतर्वस्त्रे घालावीत.
७. व्यायाम करा :-
मासिक पाळीदरम्यान निरोगी अन्न खाण्यासोबतच व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे नियमितपणे हलका व आपल्या शरीराला झेपेल इतका व्यायाम करावा . त्यामुळे आपल्या मासिक पाळीदरम्यानच्या वेदना कमी होऊ शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम नाही केले तर तुम्हाला वेदना होऊ शकतात त्याचसोबत मूड स्विंग देखील होऊ शकते. अशावेळी व्यायाम करावा.
८. सॅनिटरी पॅड्सचा वापर करा :-
मासिक पाळी दरम्यान महिलांनी कापड न वापरता नेहमी सॅनिटरी पॅडचा वापर करावा. पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी, स्वतःला स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात दर चार ते सहा तासांनी सॅनिटरी पॅड बदलणे आवश्यक आहे. जर दिवसभर एकच पॅड वापरले तर आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. वापरलेले पॅड नीट पेपरमध्ये गुंडाळून बंद कचरापेटीत टाकावे. एकाच पॅडचा जास्तवेळ वापर केल्यामुळे खाज आणि संसर्गही होऊ शकतो. उन्हाळ्यांत आपल्या शरीरावर खूप घाम येतो. आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात हा घाम साचून राहतो. यामुळे संसर्ग होण्याची भीती असते. यासाठी उन्हाळ्यात सॅनिटरी पॅड्सचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी.
९. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा :-
जर तुम्हाला तुमच्या गुप्तांगात किंवा त्याच्या आसपासच्या भागात कोणत्याही प्रकारचे पुरळ किंवा संसर्ग झाल्याचा संशय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका याबाबत तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञानाचा सल्ला घ्यावा.