कोरोनाकाळात व्हिटॅमिन सीचा मारा केला, त्याने तर तुमची मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येत नाही? Published:October 21, 2021 03:43 PM 2021-10-21T15:43:44+5:30 2021-10-21T15:53:47+5:30
मासिक पाळी पुढे-मागे होण्याची अनेक कारणे असतात. जीवनशैलीतील अनेक घटकांवर हा बदल अवलंबून असतो. पण व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतले तरीही ही समस्या उद्भवू शकते... आपली मासिक पाळी कधी येणार याचा आपल्याला अंदाज असतो. पण काही वेळा ही पाळी एकदम लवकर येते तर कधी बरेच दिवस उशीरा येते. औषधोपचार, ताण, हार्मोन्समधील बदल, वातावरणातील बदल, दगदग अशा अनेक कारणांमुळे ही पाळी पुढे-मागे होऊ शकते.
कोरोनाच्या काळात किंवा त्यानंतरही प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून व्हिटॅमिन सी चा आहारात जास्तीत जास्त समावेश करा असे सांगण्यात येत. त्यामुळे नियमित लिंबू, संत्री, आवळा खाणाऱ्यांची संख्या वाढली.
शरीरात एखाद्या व्हिटॅमिनचे प्रमाण वाढले तरीही पाळी लवकर येऊ शकते. यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात घेतले गेल्यास पाळी खूप अलिकडे येते किंवा खूप पुढे जाते.
आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा अतिशय आवश्यक घटक आहे. व्हिटॅमिन सी मुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, डोळ्यांचे आरोग्यही उत्तम राहते आणि त्वचा चमकदार होण्यास व्हिटॅमिन सी असलेला आहार उपयुक्त ठरतो.
परंतु व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेणे महिलांसाठी घातक ठरु शकते. कारण यामुळे त्यांची मासिक पाळीची तारीख चुकते आणि पाळी खूप अलिकडे येते किंवा खूप पुढे जाते
मासिक पाळीमध्ये महिलांना रक्तस्त्राव होत असल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. ही लोहाची पातळी आहाराच्या माध्यमातून पुन्हा वर न आल्यास लोहाची कमतरता होते आणि अनेक तरुणी आणि महिलांमध्ये अॅनिमिया झाल्याचे पाहायला मिळते.
मासिक पाळीमध्ये व्हिटॅमिन सीचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. व्हिटॅमिन सी मुळे इस्ट्रोजनची पातळी वाढण्यास मदत होते. त्याचवेळी प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होण्यासही व्हिटॅमिन सी कारणीभूत ठरते.
अशाप्रकारे हार्मोनमध्ये बदल झाला की मासिक पाळी लवकर किंवा उशीरा येऊ शकते. मात्र पाळी पुढे-मागे होण्याचे हे एकच कारण असल्याचा दावा आपण करु शकत नाही.
कारण लठ्ठपणा, महिन्यातील दिवस, ताणतणाव, वजन कमी होणे, औषधोपचार, संसर्ग यांसारख्या इतर अनेक गोष्टी मासिक पाळी अलिकडे येण्यास किंवा पुढे जाण्यास कारणीभूत असतात.