फेसबूकवरून मिळाली चित्रपटाची ऑफर आणि... बघा कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या अनसुया सेनगुप्ताची भन्नाट गोष्ट...
Updated:May 27, 2024 13:21 IST2024-05-27T13:14:31+5:302024-05-27T13:21:11+5:30

अतिशय प्रतिष्ठीत सोहळ्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनसुया सेनगुप्ता हिने सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला आणि अख्ख्या जगाच्या आणि खास करून भारतीयांच्या नजरा तिच्याकडे वळाल्या...
आलिया, ऐश्वर्या, करिना, दीपिका या अभिनेत्रींच्या नावाची नेहमीच चर्चा असते. पण जिच्या नावाची कधीच कुठेच चर्चा झाली नाही ती अनसुया येते आणि चक्क कान्स मधली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार पटकावते हा बहुतांश लोकांसाठी एक सुखद धक्काच होता. हा पुरस्कार पटकाविणारी अनसुया सेनगुप्ता ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
'द शेमलेस' या समलैंगिक संबंधांवर आधारित चित्रपटात तिने साकारलेल्या प्रमुख भुमिकेसाठी तिला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. बल्गेरियन निर्माता कॉन्स्टॅटिन बोजानोव्ह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून कोलकाता येथे प्रसिद्ध असलेली अनसुया हिने द कोलकाता टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की या कॉन्स्टॅटिन बोजानोव्ह यांनी फेसबूकवरून तिला या चित्रपटाची ऑफर दिली. त्यापुर्वी त्यांनी तिने दिलेली ऑडिशन पाहिली आणि ते पाहून लगेच तिला विचारणा केली.
अनसुया म्हणते की चित्रपटाची ऑफर येण्यापासून ते सर्वाेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार पटकविण्यापर्यंतचा सगळाच प्रवास खूप छान असून पुरस्कार सोहळ्यानंतर दिग्गज कलावंतांकडून जे कौतूक होत आहे त्यामुळे भारावून गेल्यासारखं होत आहे.
तिने हा पुरस्कार जगभरातील समलैंगिक समुदायाला आणि त्यांच्या हक्कासाठी ते देत असलेल्या लढ्याला समर्पित केला आहे.
अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगून अनसुया काही वर्षांपुर्वी कोलकाताहून मुंबईला आली. पण तिला विशेष काही भुमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे सध्या ती अनेक चित्रपटांसाठी प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम करत होती.