Join us   

फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 2:53 PM

1 / 10
प्रत्येक खेळाडूचे किमान एकदा तरी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याचे स्वप्न असते (Dhinidhi Desinghu). अथक परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खेळाडू ऑलिम्पिकच्या स्पर्धेत खेळण्याचा बहुमान मिळवतात, आणि जिंकतात (Olympic). हीच सुवर्ण संधी भारताची लेक १४ वर्षीय जलतरणपटू धिनिधी देसिंघूला मिळाला आहे. धिनिधी ही भारतीय संघातील सर्वात तरुण खेळाडू आहे. दरम्यान, धिनिधी देसिंघू नक्की आहे तरी कोण? पाहूयात(Paris Olympics: Decoding Dhinidhi Desinghu, the 14-year-old swimming sensation).
2 / 10
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुरू झाले असून, आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी चांगली सुरूवात केली. तर आज म्हणजेच दुसऱ्या दिवशी भारतीय संघ बॅडमिंटन, नेमबाजी, नौकानयन, टेबल टेनिस आणि जलतरण या खेळांमध्ये सहभाग घेणार आहेत. ज्यात धिनिधी देसिंघू हिचा देखील समावेश आहे.
3 / 10
धिनिधी देसिंघू ही भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी आतापर्यंतची दुसरी सर्वात तरुण स्पर्धक आहे. हा विक्रम आरती शाहच्या नावावर होता. जिने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
4 / 10
बंगळुरू येथील नववीत शिकणाऱ्या धनिधी देसिंघूने युनिव्हर्सॅलिटी कोटा सिस्टीमद्वारे पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिकीट मिळवले आहे.
5 / 10
धिनिधीने बेंगळुरूमधील डॉल्फिन एक्वाटिक्समधून स्विमिंगचे प्रशिक्षण घेतले. ज्याचे नेतृत्व द्रोणाचार्य पुरस्कार विजेता निहार अमीन करतात. मधु कुमार यांनी तिला प्रशिक्षण दिले आहे.
6 / 10
इंडिअन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत धिनिधी देसिंघू हिच्या आई वडिलांनी काही गोष्टी शेअर केल्या. धिनिधीला सुरुवातीला दुसऱ्यांसोबत बोलताना किंवा मिसळण्यात अडचण होत होती. तिला तिच्या विश्वात रमायला आवडत असे. म्हणून आई वडिलांनी स्विमिंग करण्यास प्रोत्साहन दिले. कारण त्यांच्या घराशेजारीच एक पूल होता. धिनिधीने स्विमिंग करता - करता काही मित्र करावेत अशी त्यांची इच्छा होती.
7 / 10
पण धिनिधीला सुरवातीला पाण्याची भीती वाटत होती. धिनिधी म्हणते 'स्विमिंग पूलमध्ये मी कधी पाय ठेवेन असं वाटलं नव्हतं. माझ्यासाठी हे आव्हानात्मक होतं. स्विमिंग पूलमध्ये पाय ठेवल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. तेव्हा लहानशा स्विमिंग पूलमध्ये उतरून आई वडिलांनी दाखवलं, माझ्या मनातली भीती घालवली.'
8 / 10
यासंदर्भात, धिनिधीची आई जेसिथ म्हणाली, 'धिनिधी स्विमिंगमध्ये तरबेज आहे. पण तिला अनेकदा दडपण देखील जाणवते. कारण स्पर्धेच्या आदल्या दिवशी तिला ताप येतो, किंवा उलट्या. पण बंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत, तिने उत्तम कामगिरी दाखवली.'
9 / 10
तिने आजपर्यंत आपल्या नावे अनेक विक्रम नोंदवले आहेत. राष्ट्रीय खेळांमध्ये सात सुवर्णपदके जिंकणारी सर्वात तरुण महिला जलतरणपटू होण्याचा मान तिला मिळाला आहे.
10 / 10
तिने याआधी महिलांच्या २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये राष्ट्रीय विक्रम केला आहे. २०२२ च्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने भाग घेतला होता.
टॅग्स : पॅरिस ऑलिम्पिक २०२४प्रेरणादायक गोष्टीसोशल व्हायरलबेंगळूर