आपल्या मुलांनी आपल्याला सगळं सांगावं-मनातलं बोलावं असं वाटतं ना? ४ गोष्टी करा-नातंच बदलेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 9:17 AM 1 / 6तुमचं मुलांसोबतचं बॉण्डिंग नेहमी वाढतच जाईल. त्यासाठी फक्त ४ गोष्टी करा- मुलं तुमच्यापासून कधीच काही लपवून ठेवणार नाहीत... प्रत्येक गोष्ट सगळ्यात आधी तुमच्याशी येऊन मोकळेपणाने बोलतील..2 / 6पालकांचं आणि मुलांचं एकमेकांशी असणारं नातं अधिक घट्ट करणाऱ्या त्या ४ गोष्टी कोणत्या याविषयीची माहिती पॅरेंटींग एक्सपर्टने ganesh.emotional.alchemist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.3 / 6यामधली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या दिवसाची सुरुवात आनंदाने करा. सकाळी त्यांना उठवताना किंवा उठवल्यानंतर लगेचच कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्यावर डाफरू नका. ओरडू नका. प्रेमाने त्यांना जवळ घेऊन दिवसाची सुरुवात करा. यामुळे त्यांना जो आनंद मिळेल तो दिवसभर त्यांना फ्रेश ठेवेल.4 / 6मुलं शाळेत जाताना आधीच थोडी बावरलेली, घाबरलेली असतात. थोडी असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात असतेच. अशावेळी त्यांच्यावर ओरडू नका. पालकांच्या किरकिऱ्या स्वभावामुळे काही मुलांना घरापेक्षाही शाळा- मित्रमैत्रिणी अधिक जवळचे वाटू लागतात. असं तुमच्या मुलांच्या बाबतीत होऊ देऊ नका. शाळेवर, मित्रमैत्रिणींवर प्रेम असावेच. पण घराची ओढ मात्र कमी होता कामा नये.5 / 6मुलं शाळेतून आल्यावर त्यांची चौकशी करायला विसरू नका. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी १० मिनिटांचा वेळ का असेना पण तो त्यांना द्या. शाळेतून आल्यानंतर तिथल्या गमतीजमती, किस्से सांगायला मुलांना त्यांचं ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं. त्यामुळे थोडा वेळ शांत बसा आणि त्यांचं सगळं ऐकून घ्या. ते सांगत आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्हालाही खूप रस आहे, तुम्ही ते मनापासून ऐकत आहात, हे त्यांना जाणवू द्या.6 / 6चौथी गोष्ट म्हणजे झोपण्यापुर्वी मुलांची चौकशी करायला विसरू नका. झोपण्यापुर्वी त्यांच्यावर ओरडू नका. त्यांना न सांगता झोपू नका. त्यांना सांगून, गुड नाईट म्हणून, त्यांच्या अंगावर पांघरूण घालूनच झोपा. या गोष्टी वरवरच्या, साध्या वाटत असल्या तरी त्यांचा मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो. त्यांना तुमच्याबद्दल अधिक ओढ, प्रेम, आदर, आधार आणि विश्वास वाटतो. काही दिवस करून तर पाहा.. आणखी वाचा Subscribe to Notifications