नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही!

Updated:December 12, 2024 17:21 IST2024-12-12T17:08:56+5:302024-12-12T17:21:12+5:30

Relationship Tips: दोन व्यक्तींचा एकत्र संसार म्हणजे एका कुंडीत लावलेली दोन वेगवेगळी रोपं! त्यात कधी पानगळती होणार तर कधी कीड लागणार, पण मूळं घट्ट असतील तर तेच रोप पुन्हा बहरू शकते. संसाररुपी रोपट्याची मशागत दोघांकडून व्हायला हवी, तरंच ते रुजेल, टिकेल आणि बहरेल! यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या टाळायला हव्यात हे जाणून घेऊ.

नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही!

वैवाहिक जीवनात लैंगिक संबंध महत्त्वाचे असले तरी इतरही अनेक गोष्टी संसार उभारण्यास हातभार लावत असतात. त्या छोट्या-मोठ्या विषयाबाबत दोघांमध्ये सुसंवाद असेल, पारदर्शकता असेल तर वादाला कारण उरणारच नाही. शिवाय एकमेकांप्रती आदर, विश्वास आणि प्रेम हे सहजीवनाचे मुख्य भाग आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याबरोबरीने कोणत्या चुका टाळायला हव्यात ते जाणून घेऊ.

नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही!

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोलणे केव्हाही चांगले. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. कारण दोन्ही व्यक्तींची जडण-घडण स्वतंत्र वातावरणात झालेली असते. त्यामुळे एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यावर काय पर्याय शोधता येईल यावर चर्चा करावी. काही वादाचे मुद्दे असतात, त्यावर हसत खेळत तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. कोणताही विषय मांडताना समोरून त्याला विरोध होणार हे स्वीकारून मनाची तयारी ठेवावी आणि शांत डोक्याने आपला मुद्दा मांडावा, पटवून द्यावा. समोरच्याचा नकार असेल तर तो का आहे हे समजून घ्यावे, त्यावर त्याच्याकडे काय पर्याय आहे ते जाणून घ्यावे. कदाचित एका बैठकीत प्रश्नाची उकल होणार नाही, तेव्हा विचार करण्यासाठी वेळ घ्यावा आणि त्यावर चिंतन करून प्रतिसाद द्यावा. समोरच्याचे बोलणे पूर्ण ऐकावे, मग विचारपूर्वक बोलावे. या नियमांमुळे संवाद घडतो. अन्यथा वाद होईल या भीतीने अनेक जोडपी अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलणे टाळतात आणि त्याचे पर्यवसान विसंवादात होते आणि बोलणे खुंटते, नाते तुटते.

नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही!

शॉपिंग, आउटिंग, गिफ्ट ही भौतिक सुखं नात्याला खतपाणी घालतात असे नाही. या गोष्टीही कराव्यात. पण छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद नात्यामधले बंध घट्ट करतात. जसे की एखाद्या गोष्टीचे कौतुक करणे, केलेल्या मदतीबद्दल आभार मानणे, चार चौघात चुका न दाखवता एकांतात समजावून सांगणे, एकमेकांची काळजी घेणे, यामुळे नात्याची वीण घट्ट होते. वयाबरोबरच नातेही परिपक्व होते. कधी चुका झाल्याच तर समजुतीने घेण्याची मानसिकता तयार होते. याउलट, सतत एकमेकांना घालून पाडून बोलण्याने संवाद होत नाही, नाते दुरावते, मन संसारात रमत नाही आणि ताणतणाव वाढून नाते तुटते. तसे होऊ नये म्हणून पुढील ३ चुका टाळा!

नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही!

दोघांच्या संसारात इतरच जास्त ढवळाढवळ करतात. तो हस्तक्षेप एवढा वाढतो की नवरा बायको यांना स्वतःचे विचार मांडायला जागाच उरत नाही. दुसऱ्यांचे बोलणे योग्य वाटून त्यांच्या प्रभावाखाली येऊन दोघांमध्ये भांडण लागते. त्यामुळे कोणी कितीही जवळचे असले, कितीही त्यांनी सल्ले दिले तरी ते ऐकून घ्यावेत, त्यातल्या योग्य-अयोग्य मुद्द्यांचा विचार करावा आणि स्वतःचा व जोडीदाराचा विचार करून मगच निर्णयापर्यंत पोहोचावे. कारण, रागाच्या भरात जोडीदाराची वाईट बाजू आपल्याला दिसत असली, तरी अडीअडचणीच्या काळात त्याने केलेले त्याग, कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. या गोष्टी फक्त नवरा बायकोला एकमेकांबद्दल माहीत असतात, त्यामुळे इतरांचा आपल्या संसारात किती हस्तक्षेप होऊ द्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे.

नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही!

पाया भक्कम असेल तर त्यावर कोणतीही इमारत न डगमगता उभी राहू शकते. संसार वास्तूचा पाया देखील विश्वास असतो. विश्वास ठेवणे याचा अर्थ चुकीच्या गोष्टींकडे डोळेझाक करणे नाही, तर कोणाकडून ऐकू आलेल्या गोष्टींमुळे आपल्या जोडीदारावर संशय न घेता त्याच्याशी चर्चा करून खातरजमा करून घेणे. जोडीदाराला विश्वासात घेणे महत्त्वाचे असते. अंधविश्वास कामाचा नाही, त्यामुळे एखादी व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते. सतर्क राहणे, विश्वास कमावणे आणि विश्वास निर्माण करणे या तिन्ही जबाबदाऱ्या दोघांच्या असतात. त्या नीट पार पाडल्या तर नात्याला संशयाचा सुरुंग लागणार नाही.