फ्रिजमधून दुर्गंधी येते? ६ उपाय- फ्रीज होईल स्वच्छ आणि दुर्गंधीही गायब Published:February 17, 2023 03:25 PM 2023-02-17T15:25:17+5:30 2023-02-17T15:32:35+5:30
6 Natural remedies to get rid of bad smells in your fridge फ्रिज स्वच्छ करणं हे मोठं काम, ते वेळेत केलं नाही तर दुर्गंधी येते, त्यासाठीच काही सोपे उपाय. काम होईल सोपे. अन्नपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण फ्रिजचा वापर करतो. त्यात आपण पाण्याच्या बाटल्यांपासून पदार्थ, मसाले, भाज्या, उरलेलं जेवण अशा अनेक गोष्टी ठेवतो. काही पदार्थ खराब झाले की आपल्याला लवकर कळून येत नाही, ज्यामुळे संपूर्ण फ्रिज खराब होतो. या खराब झालेल्या पदार्थामुळे संपूर्ण फ्रिजमध्ये दुर्गंधी पसरते. अशावेळी आपण संपूर्ण फ्रिज साफ करतो. मात्र, तरी देखील फ्रिजमधील दुर्गंधी निघत नाही. दुर्गंधी काढण्यासाठी नेमके काय करावे? असा प्रश्न गृहिणींना पडतो. फ्रिजमधील दुर्गंधी काढायची असल्यास काही घरगुती उपाय आपल्या कामी येतील.
फ्रिजमधील दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाचा वापर करा. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. आता त्यात लिंबाचे दोन काप करून टाका. हे भांडं फ्रिजमध्ये तसेच ठेवा. या ट्रिकमुळे काही वेळात फ्रिजमधील दुर्गंधी निघून जाईल.
फ्रिजमधील दुर्गंधी काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर उत्तम ठरेल. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात बेकिंग सोडा मिसळा. या मिश्रणाने संपूर्ण फ्रिज साफ करा. यामुळे दुर्गंधी निघेल.
कॉफी बीन्सच्या मदतीने फ्रिजमधील दुर्गंधी निघून जाईल. यासाठी फ्रिजच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये कॉफी बीन्स ठेवा. आता फ्रिज रात्रभर बंद ठेवा. यामुळे दुर्गंधी निघून जाईल.
जेवणाची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे मीठ. आपण याने फ्रिजमधील दुर्गंधी देखील काढू शकता. यासाठी गरम पाण्यात मीठ मिसळा. कापडाच्या सहाय्याने फ्रिज पुसून घ्या. यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी निघेल यासह चकाचक दिसेल.
संत्र्याच्या सालीच्या मदतीने आपण फ्रिजला दुर्गंधीमुक्त करू शकता. यासाठी संत्रा सोलून त्याची साल वेगळी करा. आता संत्र्याची साले फ्रिजमध्ये ठेवा. काही वेळाने फ्रिजमधील दुर्गंधी निघून जाईल.
व्हिनेगरमुळे फ्रिजमधील दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात व्हिनेगर मिसळून ती वाटी फ्रिजमध्ये ठेवा. या उपायामुळे फ्रिज दुर्गंधीमुक्त होईल.