मधुबाला! प्रेमभंगाची गहरी वेदना मनात लपवून जगलेली सौंदर्याची सम्राज्ञी! तिची ही गोष्ट.. Published:February 14, 2023 04:41 PM 2023-02-14T16:41:07+5:30 2023-02-14T16:48:23+5:30
Madhubala was a screen goddess like none other, loved by millions and hugely successful star of her generation आयुष्यातील चढ - उतार पार करत गाठले यश, मात्र, प्रेमाच्याबाबतीत अपयशी ठरल्या.. आपल्या मोहक सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मधुबाला. हिंदी सिनेसृष्टीत त्या सौंदर्यवतीचे नाव आजही घेतले जाते. प्रेमाच्या दिवशी या गुलाबाचा जन्म झाला आणि भारताला असंख्य मनावर मोहिनी घालणारी एक अभिनेत्री मिळाली. त्यांनी आपल्या खडतर प्रवासात अनेक चढ - उतार पाहिले. जीवनातील असंख्य दुखांमुळे त्यांना 'द ब्यूटी विद ट्रेजेडी' असेही नाव देण्यात आले होते. हृदयात जागा निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीचा अंत देखील हृदयाच्या संबंधित आजारामुळे झाला.
मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी, दिल्ली येथे झाला. वडिलांची नोकरी गेल्यानंतर, घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. वडील अताउल्लाह खां आणि आई आयशा बेगम यांना एकूण ११ मुलं होती. यात मधुबाला या पाचव्या आपत्य होत्या.
त्यांचे खरे नाव मुमताज जहां बेगम दहलवी होतं. सिनेसृष्टीत आल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून मुमताज ठेवले. नऊ वर्षांची असताना त्यांनी बसंत सिनेमातील एका गाण्यात लिपसिंक केले होते. त्यावेळी त्यांना मानधन म्हणून १५० रुपये मिळाले. यानंतर पहिला ब्रेक नीलकमल या चित्रपटामुळे मिळाला. त्यादिवसापासून तिने मागे वळून पाहिले नाही.
बॉलिवूडमध्ये भूमिका स्वीकारताना नायक कोण असावा याचा निर्णय देखील त्या स्वतः घ्यायच्या. असा उल्लेख फिल्म फेअर मासिकाच्या संपादकांनी केला होता. यासह बॉलिवूडमध्ये सुरक्षा रक्षक सोबत ठेवण्याची सुरुवात मधुबाला यांच्यापासून झाली असल्याचे बोलले जाते.
मधुबाला यांच्या सौंदर्याचे चर्चे सातासमुद्रा पार गाजत होते. त्यांच्या मोहक अदाकारामुळे त्यांना 'वीनस ऑफ इंडियन सिनेमा' हे नाव पडले. त्यांच्या सौंदर्याची तुलना हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मर्लिन मनरोशी केली जात होती.
चित्रपटासह मधुबाला यांचे वयक्तिक आयुष्य देखील तितकेच चर्चेत राहिले. मधुबाला यांचा पहिल्यांदा प्रेमनाथ यांच्यावर जीव जडला. दोघांचं नातं फक्त सहा महिने टिकले. कारण ठरले धर्म. प्रेमनाथ यांची इच्छा होती की, मधुबाला यांनी धर्म बदलावा. परंतु, मधुबाला यांनी स्पष्ट नकार दिला.
प्रेमनाथ यांच्यानंतर मधुबाला यांचा जीव अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर जडला. जवळपास नऊ वर्ष त्यांचे अफेअर चाललं. दोघांचा साखरपुडा देखील पार पडला. मात्र, दिलीप कुमार यांच्या एका हट्टापायी दोघांचं नातं कायमचं तुटलं.
दिलीप कुमार यांच्यासोबत नातं तुटल्यानंतर मधुबाला नैराश्यात गेल्या. यादरम्यान त्यांच्या आयुष्यात गायक किशोर कुमार यांची एन्ट्री झाली. तीन वर्षानंतर दोघांनी लग्न केलं. त्यानंतर मधुबाला सतत आजारी पडत होत्या. किशोर कुमार यांनी मधुबाला यांना उपचारासाठी लंडनला नेले. तेव्हा त्यांना समजलं की, त्यांच्या हृदयात छिद्र आहे. या जगात त्या फक्त २ वर्ष जगतील, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी ९ वर्ष काढले.
त्या काळात मधुबाला फार एकट्या पडल्या होत्या. किशोर कुमार यांनी मधुबालाला त्यांच्या वडिलांकडे सोडले, कारण त्यांचा सांभाळ करणारं कोणी न्हवतं. याकाळात दिलीप कुमार यांचे सायरा बानोशी लग्न झाले. मधुबाला यांची प्रेमकहाणी अधूरी राहिली. त्यांच्या लग्नानंतर मधुबाला खूप रडल्या.
मधुबाला यांना भेटायला दिलीप कुमार रुग्णालयात गेले होते, त्यांना जगण्याची फार इच्छा होती. त्या या आशेवर होत्या की त्यांच्या आजारावर डॉक्टर काही तरी तोडगा नक्कीच काढतील. मात्र, त्यांची जगण्याची झुंज २३ फेब्रुवारी १९६९ साली संपली. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.