मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला की भांड्यांचा तेलकट वास जात नाही? ८ सोपे उपाय-भांडी चमकतील नव्यासारखी... Published:August 30, 2024 06:12 PM 2024-08-30T18:12:16+5:30 2024-08-30T18:23:37+5:30
How to prevent odor in clay pots : Right way to Clean & Maintain Clay Pots : How to remove oil stains & food smell from clay utensils : मातीच्या भांड्यातील अन्नपदार्थांचा उग्र वास घालवण्यासाठी सोप्या टिप्स.... मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात असणारी लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यास मदत करतात, ज्यामुळे अन्नातील पोषक तत्व सुरक्षित राहतात. मातीच्या भांड्यात अन्नपदार्थ तयार करण्याचे फायदे अनेक असले तरीही या भांड्यांची स्वच्छता ठेवणे महाकठीण काम असते. या भांड्यांना वेळच्यावेळी स्वच्छ धुवून, पुसून ठेवले नाही तर अशी मातीची भांडी लवकर खराब होतात. ही भांडी कालांतराने त्यात कोणतेही पदार्थ तयार करण्यायोग्य राहत नाही. काहीवेळा आपण ही मातीची भांडी स्वच्छ करुन ठेवली तरीही यातील तयार केलेल्या अन्नपदार्थांचा किंवा मसाल्यांचा उग्र वास जाता जात नाही. अशावेळी ही भांडी वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ करुन ठेवली नाही तर भांड्यांना बुरशी लागून ती खराब होतात. मातीच्या भांड्यातील अन्नपदार्थांचा वास घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूयात( How to remove oil stains & food smell from clay utensils).
१. गरम पाणी व व्हिनेगर :-
मातीच्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ३ ते ४ टेबलस्पून व्हिनेगर घालून त्याचे द्रावण तयार करुन घ्यावे. गरम पाणी आणि व्हिनेगर मातीच्या भांड्यात १५ ते २० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर एखादा ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने हे भांडे हळुहळु धुवून स्वच्छ करुन घ्यावे. व्हिनेगर मातीच्या पृष्ठभागाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता मातीच्या भांड्यातील मसाल्यांचा उग्र वास काढण्यास मदत करते.
२. बेकिंग सोडा आणि लिंबू :-
मातीच्या भांड्यांच्या पृष्ठभागावर बेकिंग सोडा शिंपडा आणि नंतर अर्धा लिंबू घेऊन भांड्यांच्या आतील पृष्ठभागावर घासून घ्या. मातीच्या भांड्यांना हे मिश्रण १५ मिनिटे लावून तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने भांडे स्वच्छ धुवा. बेकिंग सोडा आणि लिंबू यांचे मिश्रण नॅचरल क्लिन्झर म्हणून काम करते आणि मातीच्या भांड्यांमधील मसाल्यांचा उग्र वास पूर्णपणे काढून टाकते.
३. तांदूळ शिजवलेले पाणी :-
तांदुळापासून भात तयार करताना तांदूळ ज्या पाण्यात शिजवून घेतो ते पाणी शिल्लक असेल तर हे पाणी मातीच्या भांड्यात ओतावे. तांदुळाचे हे पाणी किमान ३० मिनिटे भांड्यात तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर मातीचे भांडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. तांदुळाचे पाणी हे एक नॅचरल क्लिनर आहे जे मातीच्या भांड्यातील मसाले आणि तेलाचा वास काढून टाकण्यास मदत करते.
४. राख आणि नारळाच्या काथ्या :-
नारळाचा काथ्या किंवा किशी आणि लाकूडाचा भुसा यांचा वापर करून आपण मातीची भांडी स्वच्छ करु शकतो. मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी ही फार पूर्वीपासूनची पारंपरिक पद्धती आहे असे मानले जाते. कारण याचा वापर केल्याने मातीच्या पृष्ठभागांवर कोणत्याही प्रकारचा ओरखडा किंवा व्रण येत नाहीत.
५. उन्हात वाळवणे :-
मातीची भांडी स्वच्छ केल्यानंतर कडक उन्हात वाळवावी. मातीच्या भांड्यातील मसाल्यांचा वास सूर्यप्रकाशामुळे पूर्णपणे नाहीसा होतो. सूर्याची उष्णता आणि अतिनील किरणांमुळे मातीच्या भांड्यातील मसाल्यांचा वास नैसर्गिकरीत्या नाहीसा होतो.
६. मातीचा असा करा उपयोग :-
मातीच्या भांड्यात लाल माती घेऊन ती संपूर्ण भांड्यात भुरभुरवून घ्यावी. त्यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडावे. भांड्यातील माती आणि पाणी ३० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर हे मातीचे भांडे स्वच्छ धुवून घ्यावे. मातीचा वापर केल्याने मातीच्या भांड्यातील तेलकट किंवा मसाल्यांचा उग्र वास नाहीसा होतो, त्याचबरोबर या ट्रिकमुळे ही भांडी पुन्हा वापरण्यायोग्य होतात.
७. मीठ :-
मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण मिठाचा देखील वापर करु शकतो. मीठ हे सर्वोत्कृष्ट नॉन टॉक्सिक क्लिनर मानलं जात. मीठ मातीच्या भांड्यांमधील घाण स्वच्छ करून उग्र वास दूर करण्यास मदत करते आणि भांड्यांमधील बॅक्टेरियाचे प्रमाण कमी करते.
८. साबणाचा वापर करु नका :-
मातीच्या भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी साबणाचा वापर कधीही करु नये. मातीची भांडी साबण अगदी सहज शोषून घेतात. त्यामुळे या भांड्यांमध्ये ठेवलेल्या अन्न आणि पाण्यामधून साबणाचे कण आपल्या शरीरात जाऊन आरोग्याला मोठी हानी पोहोचवू शकतात.