Lokmat Sakhi >Relationship > अरेंज मॅरेज करताना होणाऱ्या नवऱ्याला विचारायलाच हवेत असे 3 प्रश्न; संकोच कराल तर पस्तावाल

अरेंज मॅरेज करताना होणाऱ्या नवऱ्याला विचारायलाच हवेत असे 3 प्रश्न; संकोच कराल तर पस्तावाल

ठरवून होणार्‍या लग्नात लग्नानंतरचा प्रवास आपण एका अनोळखी पुरुषासोबत नाही तर आपण ओळखलेल्या पुरुषासोबत ( भलेही एकमेकांचे विचार वेगवेगळे असले तरी) करणार आहोत हा विश्वास येण्यासाठी लग्न ठरलेल्या मुलीने होणार्‍या नवर्‍याला 3 प्रश्न विचारणं गरजेचंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 05:53 PM2021-12-25T17:53:51+5:302021-12-27T12:42:18+5:30

ठरवून होणार्‍या लग्नात लग्नानंतरचा प्रवास आपण एका अनोळखी पुरुषासोबत नाही तर आपण ओळखलेल्या पुरुषासोबत ( भलेही एकमेकांचे विचार वेगवेगळे असले तरी) करणार आहोत हा विश्वास येण्यासाठी लग्न ठरलेल्या मुलीने होणार्‍या नवर्‍याला 3 प्रश्न विचारणं गरजेचंच!

3 questions that need to be asked by girlto the future husband in arrange marriage. | अरेंज मॅरेज करताना होणाऱ्या नवऱ्याला विचारायलाच हवेत असे 3 प्रश्न; संकोच कराल तर पस्तावाल

अरेंज मॅरेज करताना होणाऱ्या नवऱ्याला विचारायलाच हवेत असे 3 प्रश्न; संकोच कराल तर पस्तावाल

Highlightsलग्नानंतरच्या आर्थिक नियोजनासाठी मुलीनं न संकोचत आर्थिक बाबतीत बोलणं गरजेचं असतं.आपला होणारा नवरा लग्न का करतोय हे मुलीला माहीती हवंच! होणार्‍या नवर्‍याची दीनचर्या माहिती असेल तर त्याच्या स्वभावाचा नीट अंदाज येऊन् शकतो.

आई वडिलांच्या पसंतीनं मुला मुलींनी लग्न करणं ही अपेक्षा आजच्या काळातही पालक बाळगतात. तसंच अनेक मुला मुलींना देखील लग्न करताना आपल्या आईवडिलांची पसंती महत्त्वाची वाटते. घरात येणारी मुलगी/ होणारा नवरा जर आई वडिलांच्या पसंतीचा असेल तर घरातील सदस्यात किंतू परंतु राहाणार नाही. घरात वातावरण चांगलं राहिल, दोन्ही कुटुंबात चांगलं नातं तयार होईल या हेतूनं मुलगी आई वडिलांच्या पसंतीची हवी असा विचार मुलं करतात. तर अनेक मुलींनाही लग्नाबाबतीत स्वत: काही निर्णय घेऊन माहेरच्यांना दुखवायचं नसतं. लग्नानंतरही आपल्या माणसांनी तेवढंच प्रेम करावं अशी अपेक्षा मुलींची असते त्यामुळे त्यांनाही मुलागा आई वडिलांच्या पसंतीचा हवा असतो.

लग्न ही आयुष्यातली मोठी घटना. आयुष्य बदलवणारी, घडवणारी. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्ती नाही तर यात दोन कुटुंब गुंफली जातात. इतका महत्त्वाचा निर्णय एकट्याच्या बळावर घेण्याची हिंमत मुला मुलींमधे नसते, आपण जे निवडू ते योग्यच असेल अशी खात्री नसते, शिवाय पसंतीचा जोडीदार शोधण्यासाठी वेळच मिळालेला नसतो. त्यामुळे अनेक मुलं मुली लग्नासाठी जोडीदार निवडण्याची जबाबदारी आई वडिलांवर सोपवतात.

Image: Google

लग्नासाठी जोडीदार जरी आई वडील शोधणार असतील तरी ठरवून होणार्‍या लग्नात अर्थात अरेंज मॅरेजमधे मुला मुलींची स्वत:चीही काही जबाबदारी असते. लग्नानंतर आपलं नातं फुलावं, घट्ट व्हावं यासाठी दोघांनाही एकमेकांची जरा खोलवर ओळख असणं गरजेचं असतं. ही ओळख करुन घेण्यासाठी मुला मुलींनी लग्न ठरल्यावर थोडा वेळ घ्यायला हवा, एकमेकांना थोडा वेळ देऊन एकमेकांना चाचपडून पाहायला हवं. याचा फायदा जोडीदार अगदीच आपल्या विचारांच्या विरुध्द आहे, याचे हे विचार जर आधीच माहित असते तर. थोडंसं आधी बोललो असतो तर मनाची तयारी झाली असती .. असे विचार येऊन नात्याची सुरुवात नकारात्मक होत नाही. लग्नानंतर कुठे आपण एकमेकांसोबत असू, कुठे आपल्याला आपले निर्णय स्वत:च्या बळावर घ्यावे लागतील, लग्नानंतर काय गोष्टीत आपल्याला जुळवून घ्यावं लागेल, काय जुळवून घेणं शक्य होईल याचा अंदाज येतो. हा अंदाज मुलीच्या बाजूने तिला स्वत:ला येण्यासाठी तिनं होणार्‍या नवर्‍याला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणं आवश्यक आहे असं विवाह समुपदेशक म्हणतात.

ठरवून होणार्‍या लग्नात लग्नानंतरचा प्रवास आपण एका अनोळखी पुरुषासोबत नाही तर आपण ओळखलेल्या पुरुषासोबत ( भलेही एकमेकांचे विचार वेगवेगळे असले तरी) करणार आहोत हा विश्वास येण्यासाठी लग्न ठरलेल्या मुलीने होणार्‍या नवर्‍याला 3 प्रश्न अवश्य विचारायला हवेत.

Image: Google

1. आई वडिलांप्रती तुझी जबाबदारी काय असणार आहे?

लग्नाआधी पहिल्याच भेटीत असा प्रश्न विचारणं मुलींना धाडसाचं वाटेल. पण विवाह समुपदेशक म्हणतात लग्नानंतर घरात शांती नांदावी असं वाटत असेल तर हा प्रश्न भलेही पहिल्या भेटीत विचारु नका. पण त्यानंतरच्या भेटीत अवश्य विचारा. कारण लग्नानंतर नवरा बायकोमधे आई वडिलांना पैसे देण्यावरुनच भांडणं जास्त होतात. लग्नाआधीच आपल्या होणार्‍या नवर्‍याला आई वडिलांना जबाबदारी म्हणून एवढे पैसे द्यावे लागणार आहेत हे जर मुलीला माहीती असेल तर दोघांच्या पगारातून किंवा एकाच्या पगारातून घर चालवण्याचं नियोजन स्वत:ची हौसमौज लक्षात घेऊन करता येईल. तसेच लग्नानंतर मुलीलाही आई वडिलांना आर्थिक मदत करणं गरजेचं असेल तर याबाबत होणार्‍या नवर्‍याच्या मनात स्पष्टता असेल.

2. तुझ्या आपल्या लग्नाकडून काय अपेक्षा आहेत?

लग्न का करावं? असा प्रश्न हल्लीच्या मुला मुलींना पडतोच. अनेकजण आपली शारीरिक, मानसिक, भावनिक गरज भागवण्यासाठी हक्काचा जोडीदार म्हणून लग्नाकडे बघतो, तर कोणी वय झालं आहे, घरातूनही प्रेशर आहे म्हणून लग्नाला तयार होतात तर कोणी घरातल्या आई वडिलांकडे बघणारी जवळची व्यक्ती असावी म्हणून लग्न करतात. आपला होणारा नवरा नेमक्या कोणत्या उद्देशानं लग्न करणार आहे हे समजलं तर मुलीला तिच्या घरातल्या जबाबदार्‍यांची जाणीव लग्नाआधीच होणं सोपं जाईल. त्यानुसार तिला नियोजन करायला वेळ मिळेल. कुठे आपल्याला नवर्‍याची मदत लागेल हे समजेल आणि तशी दोघांमधे समंजस चर्चा होणं सोपं जाईल. त्यामुळे मुलीनं आपल्या होणार्‍या नवर्‍याला तुझ्या आपल्या लग्नाकडून आणि माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे विचारायलाच हवं.

Image: Google

3. तुझी दिनचर्या काय आहे?

हा प्रश्न वरवरचा वाटत असला तरी हा प्रश्न समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच वागणं याचा अंदाज येण्यासाठी महत्त्वाचा आहे. काहीजण कमी बोलतात. कामापुरती बाहेर राहून घरी जास्त वेळ असतात. घरी बसून पुस्तक वाचणं, टी.व्ही पाहाणं हे त्यांना आवडतं, तर काही जण घरात येऊनही फोनवर असतात, सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात तर काहीजण घरात कमी आणि बाहेर मित्र मंडळींमधे जास्त राहातात. मित्रमंडळींसोबत त्यांना भटकायला आवडतं. लग्नाआधी आपल्या होणार्‍या नवर्‍याच्या आवडीनिवडी काय आहेत याचा अंदाज या प्रश्नाच्या उत्तरातून मुलींना येतो. लग्नानंतर नवर्‍याच्या कोणत्या आवडी निवडीबाबत आपण समझोता करु शकत नाही याची मुलीला कल्पना येऊन त्याबाबत मोकळा संवाद साधण्याची संधी लग्नअगोदरच मिळते.

Image: Google

हे तीन प्रश्न म्हणजे होणार्‍या नवर्‍याची तपासणी नाही; तर दोघांमधे संवाद सुरु होण्यासाठीची सुरुवातही आहे. होणार्‍या नवर्‍याला जाणून घेण्याची उत्सुकता मुलीनं दाखवली तर मुलगाही मुलीच्या आवडी निवडी, अपेक्षा समजून घेऊ शकतो. लग्न म्हणजे केवळ दोन शरीराचं मीलन नसतं तर ते दोन आत्म्यांचं मीलन असतं. असं तत्त्वज्ञान वयानं मोठी माणसं सांगतात. लग्नानंतर शरीरासोबतच आत्म्याचं मीलन कदाचित होतही असेल पण लग्नाआधी अशा प्रश्नांद्वारे मुला मुलीमधे संवाद झाल्यास लग्नाआधी मनाचं मीलन होईल हे नक्की!

Web Title: 3 questions that need to be asked by girlto the future husband in arrange marriage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.