मुलगा असो वा मुलगी , लग्नानंतर दोघांचंही आयुष्य 360 अंशाच्या कोनात बदलतं. लग्नाच्या बाबतीत मुलीलाच तिचं घर सोडून नवऱ्याच्या घरी यावं लागतं. प्रेमविवाह असेल तर किमान मुलगा, त्याचं घर, घरातले याबाबत बरीच माहिती असते. पण अरेंज मॅरेजमधे मात्र तिच्यासाठी सर्वकाही नवीन असतं. त्यामुळे मुलाच्या तुलनेत मुलीलाच लग्नानंतर बरीच आव्हानं पेलावी लागतात असा समज आहे. मात्र विवाहसमुपदेशक मात्र या गृहितकाला चुकीचं मानतात.अरेंज मॅरेजमधे मुलासाठीही अनेक गोष्टी आव्हानात्मक असतात. आपल्या घरातल्या माणसांमधे आपली बायको कशी मिसळेल, तिचं जमेल की नाही? तिला घराबद्दल , घरातल्या लोकांबद्दल आपुलकी निर्माण होईल का? जर आमच्या दोघात वाद झाले, किंवा बायकोचं आपल्याशी सोडून घरातल्या कोणाशीच पटलं नाही तर? अशा प्रश्नांचं टेन्शन मुलालाही असतं.
Image: Google
नवीन नात्यासोबतच नोकरी, करिअर, आर्थिक जबाबदाऱ्या यांनाही सामोरं जावं लागणार असतं. त्यामुळे अरेंज मॅरेजमधे मुलीला आपल्या नवऱ्याबद्दल जाणून घेणं जितकं गरजेचं असतं तितकंच मुलालाही होणाऱ्या बायकोची ओळख होणं गरजेचं असतं. आपल्या घरात आपली बायको म्हणून येणारी मुलगी नक्की स्वभावाने, विचाराने कशी आहे, तिची प्रकृती, आवडीनिवडी, इच्छा आकांक्षा याची जाणीव असणं गरजेचं असतं. लग्नानंतर वैवाहिक आयुष्याची सुरुवात हसत खेळत होण्यासाठी मुलाने मुलीला जाणून घेणं महत्त्वाचं असतं.
लग्न ठरल्यानंतर मुलानं मुलीशी एकांतात मोकळं बोलता यावं यासाठी काही वेळा तरी भेटायला हवं. घरी, कुटुंबियांसमोर होणाऱ्या भेटीगाठीत औपचारिक गप्पा टप्पा होतात. पण लग्नानंतर नव्या नात्याला, नात्यातील जबाबदाऱ्यांना मुला मुलीलाच सामोरं जावं लागणार असतं. त्यामुळे दोघांना एकमेकांची जरा खोलात ओळख होणं आवश्यक असतं.त्याठी वरचेवर भेटीगाठी आणि त्यात अनौपचारिक गप्पा होणं ही गरज असते. या गप्पा सुरु असतांनाच आपली होणारी बायको समजून घेण्याची संधी मुलाला असते. त्यामुळे या संधीचा मुलान्ं योग्य उपयोग करुन घ्यायला हवा. आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात सुखानं आणि समजून उमजून होण्यासाठी होणाऱ्या बायकोला मुलाने हे 3 प्रश्न अवश्य विचारायला हवेत.
Image: Google
1. तू तुझ्या करिअरकडे कसं बघतेस?
आज मुलं मुली बरोबरीनं शिकतात. शिकण्याच्या, काम करण्याच्या संधी दोघांनाही समान आहेत. अशा वेळेस लग्नानंतर आपली बायको शिकलेली असली तरी आधी तिनं घराला, घरातल्यांना महत्त्व, वेळ द्यायला हवा अशी मुलानं अपेक्षा ठेवणं चूक आहे. लग्नानंतर मुलाला स्वत:चं करिअर जसं लग्नाआधीइतकंच महत्त्वाचं असतं तसंच मुलीच्या बाबतीतही असतं. कदाचित लग्नानंतर तिला नोकरी सोडून वेगळं काही शिकून स्वत:साठी वेगळी संधी शोधायची असते. पण या गोष्टी लग्नानंतर् माहित होण्यापेक्षा लग्नाआधीच बोलल्या गेल्या तर मुलालाही ही बाब आपल्या कुटुंबियांसोबत बोलता येईल.
होणारी बायको लग्नानंतर शिकणार/ नोकरी करणार/ शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर गावी जाणार याचा मुलासह संपूर्ण कुटुंबाला अंदाज येण्यासाठी मुलानं मुलीला तिच्या करिअरबद्दलचं नियोजन, तिच्या महत्त्वाकांक्षा विचारायला हव्यात. शिवाय दोघांनी मिळून एकमेकांच्या करिअरचं नियोजन केलं तर लग्नानंतर नात्याचा ताण मुलाला नोकरी करताना आणि मुलीला तिचं करिअर पुढे नेताना येत नाही. आणि बायकोच्या नोकरीला धरुन घरात काही वाद विवाद होण्याचे प्रसंग अशा समजूतदार गप्पांनी टाळले जातात.
Image: Google
2. तुला काही आरोग्यविषयक तक्रारी आहेत का?
लग्नानंतर नवरा बायकोनं एकमेकांच्या सुखंदुखात, आनंदात -त्रासात एकमेकांची सोबत करायची असते याचं वचन लग्न करताना एकमेकांकडून घेतलं जातंच. पण लग्नाचं नातं हे आनंदी आणि सुदृढ असण्यासाठी मुला मुलीला एकमेकांचे स्वभाव, विचार माहित असणं महत्त्वाचं असतं तसंच एकमेकांची प्रकृती कशी आहे याची माहिती असणंही महत्त्वाचं आहे. केवळ शरीरसंबंधासाठीच नाहीतर् पुढे मूल होण्याच्या दृष्टिकोनातूनही एकमेकांच्या तब्येतीचा अंदाज आला तर आपल्या जोडीदाराला आपली कशासाठी, कुठे मदत किंवा आधार लागेल याची कल्पना येते. उपचाराची गरज असेल तर तसं नियोजनही करता येतं. मुलीला हा प्रश्न विचारताना मुलानेही आपल्या प्रकृतीबद्दलची, आरोग्यविषयक समस्या असतील तर त्याची माहिती होणाऱ्या बायकोला द्यायला हवी. पण मुलीला तिच्या आरोग्याची माहिती विचारताना आपण तिच्या खूप खोलात शिरतो आहोत अशी भावना तिच्यात निर्माण व्हायला नको. आपण एकमेकांचं गुपित विचारत नसून एकमेकांना मोकळेपणान्ं समजून घेतो आहोत हा भाव असे प्रश्न विचारताना असावा.
Image: Google
3. तू देवधर्म किती मानतेस?
शिकणं, आधुनिक जगणं म्हणजे आपल्या परंपरा सोडणं, देवधर्म न करणं असा होत नाही. धर्म, देव, परंपरा पाळणं, न पाळणं ही खूपच वैयक्तिक बाब आहे. नवरा बायको असले तरी ते ऐकमेकांवर आपले धार्मिक विचार, रीतीभाती परंपरा लादू शकत नाही. अनेक घरात हे असं होतं, हे होवू नये हा आदर्श विचार आहे. मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी येते तेव्हा ती केवळ तिचं घर सोडून् येते. बाकी ती, तिचे विचार, धर्म, परंपरा, देवपूजा याबाबतच्या तिच्या सवयी तिच्यात राहातातच. नवीन घरात नवीन सवयी स्वत:मधे उतरवताना ती तिच्या सवयीही जोपासत असते. धर्म , रीतिरिवाज, परंपरा, देवपूजा याबाबतच्या मुलाच्या घरच्या आणि मुलीच्या सवयी एकमेकांशी जुळल्या नाहीत तर मग वाद होवू शकतात. लग्नाचं नातं निभावताना अशा विषयांवरचे वाद घरात नाहक क्लेष निर्माण करतात, नात्यात कटुता आणतात. त्यामुळे होणाऱ्या बायकोचे धर्म, रीति परंपरा-देव याबाबतचे विचार, सवयी काय आहेत हे विचारण्यासोबतच आपल्या घरातल्या कोणत्या सवयी तिच्या सवयी आणि विचारांशी जुळतात, कोणत्या जुळत नाही याची देवाणघेवाण अनौपचारिक भेटी गाठीत होणाऱ्या गप्पांमधून व्हावी असा सल्ला विवाहसमुपदेशक विवाह ठरलेल्या मुलांना देतात.