‘मिठीतला मी पहिला की दुसरा’ असा प्रश्न विनोदाने विचारला जातो. मिठी मारणे ही क्रिया इतकी नैसर्गिक आहे की आनंदाच्या भरात, खूप दु:खात असताना किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी आपण सहज एकमेकांना मिठी मारतो. आपल्याकडे मिठी मारण्याचा अर्थ अनेकदा शरीराशी लगट करणे असा घेतला जातो. मात्र त्या पलिकडे जाऊन या मिठीकडे पाहण्याची आवश्यकता आहे. ज्या गोष्टी आपण शब्दातून व्यक्त करु शकत नाही त्या गोष्टी आपण स्पर्शाने किंवा एका मिठीतून सहज व्यक्त करु शकतो. एकही शब्द न बोलता आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहचवण्याचे मिठी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. आपण अडचणीत किंवा दु:खात असताना किंवा घाबरलेलो असताना आपल्याला कोणी मिठीत घेतले तर आपल्याला मिळणारा दिलासा हा शब्दात व्यक्त न करता येण्याजोगा असतो. म्हणूनच मिठी मारणे हे शारीरिक जवळीकीपेक्षा इतर अनेक कारणांसाठी महत्त्वाचे असते. पाहूया मिठी मारण्याच्या क्रियेतून होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे कोणते...
१. हार्मोन्सची निर्मिती
मिठी मारल्याने हृदयाचा आरोग्याशी संबंधित असलेल्या ऑक्सिटोसिनचे उत्पादन वाढते. ऑक्सिटोसिन तसेच मिठी मारताना होणाऱ्या इतर होर्मोनल प्रतिक्रिया या खूप प्रभावी असतात. कोणत्याही नात्यात विश्वास, एकनिष्ठता, नातं दृढ करणे हे महत्त्वाचे पैलू असल्याने हे संप्रेरक नाते दृढ होण्यासाठी उपयुक्त असते.. यांच्याशी जोडले गेल्यामुळे ऑक्सिटोसिनला मिठी मारण्याचा संप्रेरक म्हणून ओळखले जाते.
२. मूड सुधारण्यास मदत
अनेकदा आपल्याला कामाचा खूप ताण असतो. कधी आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्याने आपण उदास असतो तर कधी आपल्याला खूप निराशाजनक वाटत असते. अशावेळी आपला मूड सुधारण्यासाठी किंवा सकारात्मक वाटावे यासाठी जोडीदाराला मिठी मारुन झोपणे केव्हाही फायद्याचे ठरते. सेरोटोनीन हार्मोनची निर्मिती मिठी मारल्याने होत असल्याने आपला ताण कमी होण्यास निश्चितच मदत होते.
३. प्रतिकारशक्ती वाढते
आता प्रतिकारशक्ती आणि मिठी मारण्याचा काय संबंध असे आपल्याला वाटेल. मात्र आपल्या शरीरात असणारे कॉर्टीसॉल या हार्मोनची निर्मीती मिठी मारल्याने कमी होते. हे हार्मोन कमी झाले की शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते. म्हणून विविध आजारांचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारणे अतिशय उपयुक्त ठरु शकते.
४. हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे
हल्ली हृदयरोग आणि रक्तदाब यांसारख्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपण मिठीत शिरतो तेव्हा आपण मनाने शांत होतो. अशावेळी हृदयाच्या ठोक्यांचा वेग नकळत कमी होतो. हा वेग कमी झाला की आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर मिठी मारणे हा उत्तम उपाय आहे.