हल्लीच्या वेगवान जमान्यात इंटरनेट, सोशल मीडिया, यांसारख्या माध्यमांमुळे गोष्टी खूप फास्ट आणि सहज सोप्या झाल्या आहेत. आजकाल प्रत्येक व्यक्ती या सोशल मीडिया साईटचा वापर खूप करतो यात काही शंकाच नाही. शाळेच्या जुन्या मित्र - मैत्रिणींना भेटण्यापासून ते थेट लग्न जमविण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी सोशल मीडिया साईट्सवर केल्या जातात. सोशल मीडियामुळे जग हे अगदी जवळ आले आहे हा त्याचा मोठा फायदा आहे. परंतु याच सोशल मीडियावरून बँक अकाऊंट हॅक करणे, एकमेकांच्या प्रोफाईलचा गैरवापर करणे, एकमेकांचे सोशल अकाउंट्स हॅक करणे यांसारखे सायबर क्राईम केले जातात. सर्वच गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. या गोष्टींसोबतच बर्याच ऑनलाईन डेटिंग अॅप्लिकेशन्सचा देखील यात समावेश आहे, ज्याचा तरुणांमध्ये अलिकडच्या काळात कल खूप वाढलेला दिसून येत आहे. हल्ली ३ जोडप्यांपैकी एकाला आजही आपलं प्रेम हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरूनच होत. परंतु सोशल मीडियावरून किंवा ऑनलाईन डेटिंग अॅप्लिकेशन्सवरून जोडीदाराची निवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबतीत काही टीप्स समजून घेऊ (Tips To Be Safe On Online Dating Apps).
काय काळजी घेता येईल ?
१. सुरक्षितता तपासून घ्या - तुम्ही ज्याच्याशी कनेक्ट आहात त्या व्यक्तीची सोशल मीडिया अकाऊंट्स आहेत का? त्याचे डेटिंग प्रोफाइल खरे आणि सुरक्षित आहे का? हे आधी तपासून पाहा. नियमीत ते चेक करत राहा. त्या व्यक्तीचे सर्व फोटो तपासा आणि त्यांच्या बायोशी जुळते का हे तपासा. कारण याबाबतीत सुरक्षितता ही तुमची पहिली जबाबदारी असली पाहिजे.
२. लगेच भेटीगाठी करू नका - या ऑनलाईन जगात सर्वकाही आभासी आहे. तुम्हाला पहिल्यांदाच जर एखाद्या व्यक्तीला भेटण्यास सोयीस्कर वाटत नसेल तर तुम्ही व्हर्च्युअल डेटवर जाऊ शकता. तुम्हाला त्यांना समोरासमोर भेटण्याची गरज नाही. परंतु तरीही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येईल.
३. गरजेपुरता माहिती द्या - जर तुम्ही सुद्धा ऑनलाईन डेटिंगच्या माध्यमातून आपला जोडीदार निवडणार असाल किंवा कोणाशी ओळख करण्याचा प्रयत्न करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की समोरच्यासोबत संवाद साधताना आपली माहिती गरजेपुरता द्या. अनावश्यक गोष्टी टाळा. जेवढी माहिती प्राथमिक स्तरावर देणे गरजेचे आहे तेवढेच सांगा.
४. माहिती तपासून घ्या - समोरच्या व्यक्तीची माहिती एकदा वैयक्तिक पातळीवर नक्कीच तपासून पाहा. या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये गेलं तर नातं कसं असेल? याचा विचार करूनच मग पुढचे पाऊल उचला. त्यामुळे आपली माहिती तर खोटी नसावीच शिवाय समोरच्याची माहिती देखील व्यवस्थित तपासूनच पुढे जावे.
५. समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या - एखाद्याच्या आपल्यासंदर्भातील भावना जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांना जाणून घेतले आहे का याची खात्री करा. कारण त्यांना जाणून घेण्यासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. समोरच्यासोबत चॅटिंग आणि फ्लर्टिंग चांगले वाटू शकते परंतु तुम्हाला खरोखरच त्यांच्यासोबत काही निर्णय घ्यायच्या असेल तर आधी जाणून घ्या. कारण अभासी विश्वात रमून भावनिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेणे केव्हाही चांगले ठरु शकते.
६. प्रोफाइल फोटो - जेव्हा ऑनलाइन डेटिंगचा प्रश्न येतो तेव्हा मुलं आणि मुली दोघेही खास करून एकमेकांचा प्रोफाइल फोटो पाहतात. या दरम्यान ते आपली व्यक्तिमत्व, फोटो व त्यातून दिसणारे हावभाव यांचे बारकाईने निरिक्षण करतात. स्वभावाआधी लोक दिसणं किंवा फोटोंवरूनच माणसाची पारख करतात आणि मगच पुढची पायरी गाठतात. त्यामुळे प्रोफाइल फोटो चांगला ठेवणं चूक नसलं तरी तो सुरक्षित कसा राहिल हे मात्र नक्की पाहावं.