Join us  

६३ वर्षांच्या सौदी माणसानं ४३ वर्षांत केली ५३ लग्न; व्हायरल बातमी आणि काही गंभीर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 4:00 PM

आपण ५३ लग्न केले तरी संसारात सुख नाही असं सांगणाऱ्या सौदी माणसाची गोष्ट आणि सोशल मीडियातली चर्चा

ठळक मुद्देअनेक लग्न, अनेक स्त्रियांशी संबंध हे अनेक पुरुषांना प्रतिष्ठेचे आणि पुरुषार्थाचे लक्षण वाटते हे मात्र यातून अधोरेखित होतेच.

अनेकदा काही बातम्यांची फार चर्चा होते. सोशल मीडियाच्या काळात त्यावर अनेक कमेण्ट्स केल्या जातात. लोक टिंगल करतात, मिम्स करतात आणि मजेशीर टिप्पण्याही करतात. मात्र त्यातून आपल्या जनमानसाचा एक चेहराही दिसतो. अनेकदा आपण खरंच प्रगत आहोत की मागास असा प्रश्न पडावा इतपत काही टिपण्ण्या वाह्यातही असतात. तशीच ही एक चर्चेतली बातमी. सौदी अरेबियातल्या अबू अब्दुल्ला या ६३ वर्षांच्या माणसाने गेल्या ४३ वर्षात ५३ लग्न केल्याची एक बातमी. सौदीतल्याच एमबीसी या मीडीया कंपनीला अबू अब्दूल्ला यांनी मुलाखत देत सांगितले की मी वयाच्या विसाव्या वर्षी पहिले लग्न केले आणि त्यानंतर पुढच्या ४३ वर्षांत ५३ लग्न केले. एक लग्न तर फक्त एक रात्रभर टिकले. आता पूर्वीच्या सर्व पत्नींना त्यांनी घटस्फोट दिला असून आता उतारवयात त्यांची एकच पत्नी आहे आणि सुखाचा संसार सुरु आहे.

(Image : google)

अशी ही बातमी. आता माध्यमांनी अर्थातच अब्दुल्ला यांना प्रश्न विचारला की तुम्ही एवढी लग्न का केली?तर त्यावर त्यांचं मोठं फिलॉसिफकल उत्तर आहे.ते म्हणतात लग्न करुन मन:शांती मिळेल, बायको सुख देईल अशी आशा होती. पण तसं काही झालं नाही. मग स्थैर्य आणि मन:शांतीच्या शोधात एकामागून एक लग्न करत राहिलो. पहिल्या लग्नानंतर मुलं झाली, बरं चाललं होतं. पण तक्रारी भांडणं होतीच. संसारात सुख नव्हतं. म्हणून मग पहिल्या बायकोला सांगून दुसरं लग्न वयाच्या तेविसाव्या वर्षी केलं. तरी तेच. त्याही लग्नात काही जमेना. मग चौथं-पाचवंही लग्न केलं. आधीच्या पत्नींना घटस्फोट दिला. मग सिलसिला सुरुच राहिला. काही विदेशी महिलांशीही मी लग्न केलं. पण तारुण्यातली लग्न काही टिकली नाही. आता उतारवयात केलेलं लग्न मला स्थैर्य आणि सुख देते आहे. आता पुन्हा लग्नाचा विचार नाही.या बातमीवरुन सोशल मीडियात बरीच चर्चा झाली. एवढी लग्न, पॉलिगामी, महिलांना मिळणारी वागणूक, पुरुषीपणा हे सारे चर्चेत आलेच. पण त्या अब्दूलांचा हेवा वाटणाऱ्याही अनेक कमेण्ट होत्या. काळ बदलला तरी अनेक लग्न, अनेक स्त्रियांशी संबंध हे अनेक पुरुषांना प्रतिष्ठेचे आणि पुरुषार्थाचे लक्षण वाटते हे मात्र यातून अधोरेखित होतेच.

टॅग्स :रिलेशनशिप