Join us  

लग जा गले ! जीवाभावाच्या माणसाची ‘जादू की झप्पी’ जगणं सोपं करते, मीठी मारण्याचे ७ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 1:07 PM

The Health Benefits of Hugging : आपण सर्वजण सुख-दु:खाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारतो. मिठी मारल्याने आपल्याला भावनिक आधार मिळतो. त्याचबरोबर यामुळे आपला ताणही कमी होतो.

आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी जर आपल्याला भेटले तर आपण आनंदाने मिठी मारतो. जर आपल्या जवळची व्यक्ती दुःखात असेल तर मिठी मारून तिचे सांत्वन करतो. आई - वडील आपल्या तान्ह्या बाळाला मिठीत घेऊन त्याचे लाड पुरवतात. बहीण - भाऊ एकमेकांना कडकडून मिठी मारून आपल्या भावना व्यक्त करतात. नवरा - बायको एकमेकांना मिठी मारून आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देतात. मिठी मारणाऱ्या व्यक्ती आणि कारण वेगळी असली तरी ही भावना खूप सुंदर असते की आपल्यासाठी कुणीतरी खास आहे. आपण सर्वजण सुख-दु:खाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारतो. मिठी मारल्याने आपल्याला भावनिक आधार मिळतो. त्याचबरोबर यामुळे आपला ताणही कमी होतो.अश्या या सुखः - दुःखात मारल्या जाणाऱ्या मिठीचे अनेक फायदे आहेत. कोरोनाकाळात जेव्हा एकमेकांपासून देहदूरी आवश्यक होती तेव्हा स्पर्श हरवल्याने जगण्यात काय काय पोकळी निर्माण होऊ शकते याविषयी इंग्लंडमध्ये विशेषत: अनेक लेख प्रसिध्द झाले. त्यांनतर काळजी घेऊन संपर्क अर्थात ‘कॉशस हग’ला परवानगी देण्यात आली. इनरड्राइव्ह नावाच्या एका ब्रिटिश ब्लॉगवर यासंदर्भात तपशीलवार आर्टिकल दिसते. त्यात त्यांनी मिठी मारण्याचे महत्त्व सांगितले आहे. (The Health Benefits of Hugging).

जादू की झप्पी आणि फायदे

१. टेंशन दूर होते - आजकालच्या फास्ट लाइफस्टाइलमुळे डोक्यात सतत टेंशन - ताण असतोच. मिठी मारणे हा ताण कमी करण्यासाठी चांगला उपाय आहे. मिठी मारल्यामुळे तुमच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. काही क्षणांसाठी तुम्ही तुमच्या मनातील चिंता काळजी विसरून जाता. 

२. पॉझिटिव्हिटी निर्माण होते - जर तुम्ही दुःखी, निराश असाल आणि कुणी तुम्हाला मिठी मारली तर तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. दिवसातून खूप वेळा जर तुमचे मूड स्विंग होत असतील तर दिवसातून किमान एक वेळ तरी जवळच्या व्यक्तीस मिठी मारा.

३. रक्तदाब नियंत्रित राहतो - ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल अशा लोकांनी जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने त्याचा रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यामुळे त्यांची हायपरटेंशनची समस्या दूर होऊ शकते.  

४. राग शांत होतो - जर तुम्हाला वारंवार राग येत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरेल. जर तुमच्या पार्टनरला अथवा मुलांना पटकन राग येत असेल तर त्यांच्यावर चिडण्यापेक्षा त्यांना घट्ट मिठी मारा. मिठीमध्ये एखाद्याचा राग शांत करण्याची ताकद असते. कारण मिठीमुळे तुम्ही तुमच्याजवळील सकारात्मक ऊर्जा व चांगल्या भावना समोरच्या व्यक्तीला देत असता. 

५. निरोगी राहण्यासाठी - प्रिय व्यक्तींना मिठी मारल्याने तुमचं मन नेहमी प्रसन्न राहतं. प्रसन्न मनाचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. मन आणि शरीर उत्तम असेल तर तुम्ही कायम निरोगी राहता. जास्तीत जास्त आजार हे तुमच्या नकारात्मक विचारसरणी आणि दुःखी मनातून निर्माण होत असतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारा. 

६. आत्मविश्वास वाढतो - एखादे संकट किंवा कठीण प्रसंग आल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. अश्यावेळी आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रिय व्यक्तीला मिठी मारा. आत्मविश्वास वाढविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. 

७. एकटेपणा दूर होतो - जर तुम्हाला सारखे एकटे - एकटे वाटत असेल किंवा भीती मनात असेल तर मिठी मारून एकटेपणाची भावना दूर करू शकता. मिठी मारल्याने आपलेपणाची भावना निर्माण होऊन एकटेपणा दूर होतो.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप