नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहाण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न काय याचं काही आदर्श स्वरुप नाही. अमूक एक पुस्तक, अमूक एक माहितीपट, अमूक एक व्याख्यान नवरा बायकोचं नातं कसं टिकवावं, त्यातील प्रेम, आदर, विश्वास कसा वाढवावा हे सांगत नाही. पण नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन सांगतं की काही अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावर सकारात्मक परिणाम करतात. त्याचा फायदा दोघांमधलं नातं घट्ट होण्यावर, एकमेकांमधील प्रेम वाढण्यासाठी होतो. या सवयी फक्त बायकोलाच असाव्या, नवऱ्यानेच पाळाव्यात असं नसून दोघांमधेही त्या असायला हव्यात, असं अभ्यास सांगतो. आणि दोघांपैकी एकाला जरी या सवयी असल्या तरी तो/ ती आपल्या जोडीदाराला समजून घेण्यास, नातं टिकवून ठेवण्यास , नात्यातील प्रेम, ताजेपणा जपण्यास उपयोगी ठरतात.
Image: Google
नवरा बायकोच्या नात्यावर परिणाम करणाऱ्या सवयी
1.सकारात्मक विचार
अभ्यास सांगतो, की सकारात्मक विचार ही केवळ एक सवय नसून ती ताकद आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय असल्यास् जोडीदाराच्या वागण्यातील, सवयीतील काही खटकणाऱ्या गोष्टी असतील तरी त्या सकारात्मक पध्दतीने समजून घेण्याची ताकद त्या व्यक्तीत असते. घरातील कठीण प्रसंगात, जवळच्या व्यक्तीशी असलेल्या नाजूक संघर्षात सकारात्मकतेची ताकद ही जोडीदाराला बळ देते. समजा अशा प्रसंगांनी जोडीदार खचून जात असेल तर त्याला आपल्यात असलेली सकारात्मकता उभारी देते. सकारत्मकतेच्या सवयीमुळे एकमेकांना समजून घेण्यास मदत होते. सकारात्मक विचार करणारे नवरा बायको असतील तर कोणत्याही परिस्थितीचा विचार ते नकारात्मक पध्दतीने न करता ती परिस्थिती ते आव्हान म्हणून स्वीकारतात. 'तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरोसे भी मिल रही रोशनी है' अशी सोबतीची ताकद या सकारात्मक विचाराने मिळते.
Image: Google
2. फिटनेस
व्यायामाची सवय असणं, फिट राहून आरोग्य जपणं या सवयीमुळे केवळ आपलं आरोग्यच चांगलं राहातं असं नाही तर नवरा बायकोचं नातंही या सवयीमुळे 'हेल्दी' राहातं. रोज व्यायाम करण्याच्या सवयीमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. शरीर आणि मनाचा उत्साह वाढतो. व्यायामामुळे आत्मविश्वास येतो. याचा परिणाम नवरा बायकोच्या नात्यावरही होतो. आपला जोडीदार फिट असला की दुसऱ्यालाही फिट राहाण्याची प्रेरणा मिळते. नवरा बायको एकमेकांना फिटनेस चॅलेंज देवून आपलं आरोग्य तर सुधारु शकतातच शिवाय सोबत व्यायाम केला तर एकमेकांसोबत राहाण्यासाठी वेळ मिळतो, व्यायाम करायला प्रेरणा मिळते.
याबाबत झालेला अभ्यास म्हणतो, की फिटनेसचा परिणाम व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वावर होतो आणि नात्यावरही होतो. नवरा बायकोचं नातं उत्साही राहाण्यासाठी व्यक्तीचा फिटनेस खूप परिणाम करतो. अभ्यासातून हेही दिसून आलं आहे, की योग, ध्यानधारणा करण्याची सवय असल्याचा त्याचा चांगला परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. चिडचिडेपणा, भिती या गोष्टी कमी होतात. मनावरचा ताण निघून जातो. याचा फायदा नवरा बायकोच्या नात्यात ताण न निर्माण होण्यावर होतो. एकत्र , सोबतीनं योग आणि ध्यानधारणा केल्याचा चांगला परिणाम नवरा बायकोच्या नात्यावर होत असल्याचं अभ्यासातून सिध्द झालं आहे. याबाबतीत तज्ज्ञ म्हणतात, की शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या आपण कमजोर असू तर आपले आणि जोडीदाराशी असलेले संबंध देखील संघर्ष, नकारात्मक असतात. अशा परिस्थितीत नवरा बायकोच्या नात्यात सुख, आनंद, मोकळेपणाचा अभाव असतो. चिडचिड, संशय, वाद, अशांतता आणि संकुचितता आढळते.
3. पौष्टिक खाणं
पौष्टिक खाण्यामुळे निरोगी आरोग्य आणि फिटनेस मिळतो. आहारात पोषण मुल्यांचा समावेश आवर्जून करण्याची सवय असल्यास ही सवय फॅटनेस वाढू देत नाही, फिटनेस वाढवते. पोषणयुक्त आहारामुळे शरीरात 'हॅपी हार्मोन्स' निर्माण होतात. आनंदी राहाण्यासाठी पौष्टिक खाणं म्हणून महत्त्वाचं असतं. नात्यातल्या आनंदासाठी स्वत: व्यक्ती आनंदी असायला हवी. आपण आनंदी असू तर आपल्याकडे बघून, आपल्यासोबत राहून, आपल्याशी बोलून जोडीदारालाही आनंद मिळेल. आनंदी मन शांत असतं. अशा व्यक्तींचा कला जोडीदाराशी भांडण्याचा नसतो तर त्याला समजून घेऊन त्याच्याशी प्रेमानं वागण्याकडे असतो.
Image: Google
4. वैयक्तिक स्वच्छता
आपलं आरोग्य जपण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेला फार महत्त्व आहे. पण नवरा बायकोच्या नात्यातही ही वैयक्तिक स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. नवरा नीट आंघोळ करत नाही किंवा बायको अस्वच्छ राहाते म्हणून घटस्फोट हवा अशी प्रकरणं न्यायालयतही जातात. आपल्या भारतात अशा केसेस झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. ही वैयक्तिक स्वच्छता केवळ लैंगिक आरोग्यापुरतीच महत्त्वाची नसून मुख दुर्गंधी, केसात कोंडा, घामाचा वास अशा अनेक गोष्टींशी निगडित असते. अशा सवयींबाबत कधीकधी जोडीदार दबावानं किंवा घाबरुन बोलत नाही. पण अशा खुपणाऱ्या स्वच्छतेशी निगडित सवयी किंवा दुर्लक्ष नवरा बायकोच्या नात्यातून हवा असणारा आनंदही देत नाही.
5. स्वत:वर नियंत्रण ठेवणं
नवरा बायकोच्या नात्यात राग, संताप नियंत्रित ठेवणे याला महत्त्व आहे. केवळ आपला इगोच जपण्याची सवय असेल तर कळत नकळत जोडीदाराचा सन्मान दुखावला जातो. यामुळे शरीरानं जवळ असणारे नवरा बायको इगो, संताप या गोष्टींमुळे मनानं दूर जातात असं तज्ज्ञ सांगतात. आपले वैयक्तिक अंहकार बाजूला ठेवून महत्त्वाच्या बाबतीत एकमेकांशी चर्चा करणे, छोट्या मोठ्या गोष्टीत एकमेकांचा सल्ला घेणे यामुळे नवरा बायको मनानं जवळ येतात. शारीरिक दुरावा घालवण्यासाठी ही मनाची जवळीक खूप महत्त्वाची असून ती छोट्या छोट्या गोष्टीतून जपता येते, वाढवता येते असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
6. जोडीदारासोबत क्वाॅलिटी टाइम
क्वाॅलिटी टाइम ही संकल्पना केवळ मुलांना वेळ देतांनाच महत्त्वाची असते असं नाही तर जोडीदाराच्या बाबतीतही ती महत्त्वाची आहे. घरात असूनही सतत फोनवर, कुठल्यान कुठल्या स्क्रीनवर असल्यास त्याचा परिणाम म्हणून जोडीदाराशी संवाद खुंटणं, त्याच्या/ तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होणं हे वाढतं. सतत व्हर्च्युअल जगात राहाणाऱ्या व्यक्तीचा प्रत्यक्षातला जोडीदार मात्र त्याच्या/तिच्या या सवयीवर अतिशय नाराज असतो, चिडलेला असतो. यामुळे नवरा बायकोत भांडणंही जास्त वाढल्याचं अभ्यास सांगतो. घरात असताना कामापुरता फोन वापरुन आपल्या जोडीदाराला वेळ देणे, गप्पा मारणे, मिळून स्वयंपाक करणे, कामात मदत करणे याचा चांगला परिणाम नवरा बायकोच्या नात्यावर होतो असं अभ्यासातून दिसून आलं आहे.
Image: Google
7. जबाबदारी-साॅरी- मदत- थॅंक्यू
कोणत्याही गोष्टीसाठी जोडीदाराला दोष न देता आपण स्वत: जबाबदारी घेणे, घरातली कामं. नातातल्या जबाबदाऱ्या पार पाडणं यामुळे जोडीदारावरील ताण हलका होतो. करण्याच्या सवयीमुळे जोडीदार जर कोणत्या अडचणीत असेल, कामाचा जर ताण असेल तर तो समजून घ्यायला, प्र्त्यक्ष मदत करुन कामाचा भार हलका करायला आणि प्रत्यक्ष मदत करता येणं शक्य नसेल तर किमान मानसिक आधार देण्यास जोडीदाराच्या या मदत करण्याच्या चांगल्या सवयीचा फायदा होतो. त्यामुळे ताण तणावाच्या परिस्थितीतही नवरा बायको आपल्या मनाची , घरातली, नात्यातली शांतता एकमेकांच्या मदतीनं जपू शकतात.
काही चुकलं असल्यास पटकन आपली चूक कबुल करणं, जोडीदारानं छोटी का होईना मदत केली तर त्याबद्दल आभार ( शब्दातून-कृतीतून) व्यक्त केल्यास जोडीदाराला आनंद आणि समाधान मिळतं.