आपल्याकडे नवरा बायकोचे नाते हे सगळ्यात अतूट मानले जाते. प्रत्येक नवरा, बायको आपल्या आयुष्यात एकमेकांना जास्त महत्व देतात. इतर कोणत्याही नात्यांमध्ये ती जवळीक नसते जी एखाद्या नवरा बायकोमध्ये असते. नवरा बायकोचे नाते असे असते की ते न बोलताही एकमेकांच्या भावना समजू शकतात. आपल्याला नेहमी असे ऐकायला मिळते की माझा नवरा किंवा माझी बायको मला समजूनच घेत नाही. माझ्या इच्छा,अपेक्षांची कदरच करत नाही. नवरा बायकोच्या नात्यामध्ये दोघांनीही समान हातभार लावणे गरजेचे असते. फक्त एक बाजू योग्य असून चालत नाही. तर दोन्ही बाजूने नात्याचे समतोल ठेवावे लागते.कधी - कधी काही नाजूक विषय असतात. त्या विषयावर आपण आपल्या पार्टनरशी कसे बोलावे हे आपल्याला समजत नाही. अशावेळी कसे व्यक्त व्हावं हे सुचत नाही. नाजूक विषयांवर आपल्या पार्टनरशी कसं बोलावं किंवा आपली मतं कशी मांडावी याविषयी काही टीप्स समजून घेऊ. जेणेकरून अशा संवेदनशील विषयावर बोलताना तुमची गल्लत होणार नाही (8 Tips To Bring Up Sensitive Topics Up With Your Partner).
काय काय करता येऊ शकत ?
१. साधी - सरळ सोपी सुरुवात - एखाद्या नाजूक विषयावर बोलत असताना, सर्वप्रथम साधी - सरळ सोपी सुरुवात करावी. जो काय महत्वाचा मुद्दा आहे त्याला डायरेक्ट हात न घालता, हळू - हळू आपले मत मांडून विषयाला सुरुवात करावी.
२. योग्य भाषा वापरा - जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरशी एखाद्या नाजूक विषयावर बोलायचे असेल तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या भाषेवर लक्ष द्या. अशावेळी शिवीगाळ किंवा समोरच्याला वाईट वाटेल अशा भाषेचा वापर टाळा. बहुदा अशा संवेदनशील विषयावर बोलताना आपल्यात मतभेद होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मतभेद टाळून योग्य त्या भाषेचा वापर करून बोलणं सुरु ठेवा.
३.त्यांना थोडा वेळ द्या - आपली मतं समोरच्या व्यक्तींना समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या. तुम्ही ज्या विषयावर बोलत आहात तो विषय आणि त्याबाबत तुमची मतं त्यांना समजण्याआधी दुसरा विषय काढू नका. तो विषय समजून घेण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर त्याबाबत कसं व्यक्त व्हायचं, यासाठी त्यांना पुरेपूर वेळ द्या.
४. त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या - प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे किंवा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. व्यक्तिपरत्वे हे दृष्टिकोन वेगळे असूच शकतात. थोडंसं समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीला त्याचा दृष्टिकोन किंवा त्याची बाजू मांडायची संधी द्यावी.
५. स्वतःला शांत ठेवा - संवेदनशील विषयावर आपल्या पार्टनरशी बोलताना स्वतःला शांत ठेवा. एक - एक मुद्दे क्रमानुसार मांडा. सगळे इशू किंवा प्रॉब्लेम्स एकत्र सांगू नका. प्रॉब्लेम्स किंवा इशूवर चर्चा करताना त्याच्या निगेटिव्ह बाजूवर जास्त भर न देता पॉझिटीव्ह गोष्टींकडे पहावे.
६. शांतता मोडू नका - कधी कधी काही विषय असे असतात की, आपल्याला पुढे काय उत्तर द्यावे, काय सांगावे, बोलावे सुचत नाही. अशावेळी बोलताना आपल्यात एक प्रकारची शांतता तयार होते. ही शांतता भंग करू नका. त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार करण्याची प्रक्रिया सुरु असेल तर त्यांच्या विचारात अडथळा निर्माण करू नका.
७. मर्यादांच्या प्रती आदर राखा - काहीवेळा त्या व्यक्तीला आपल्यासमोर त्या विषयावर बोलण्याच्या मर्यादा येत असतील. अशावेळी त्या मर्यादा ओळखून त्यांचा आदर करा. अशा नाजूक विषयावर बोलताना एकमेकांच्या मर्यादांप्रती आदर राखा.
८. सकारात्मक शेवट - शेवट गोड तर सारंकाही गोड असं म्हटलं जात. एखाद्या नाजूक विषयावर पार्टनरशी बोलून झाल्यावर सकारात्मक शेवट करण्यावर भर द्या. सकारात्मक शेवट केल्याने पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही हा विषय काढाल तेव्हा सुरुवात करणे सोयीस्कर होईल.