Join us  

पुरुषांच्या भांडणात बायकांना शिवीगाळ, ट्रोलिंग, धमक्या? लोक असे का वागतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 4:47 PM

समाज माध्यमात नेत्या-अभिनेत्यांपासून सामान्य माणसांच्या कुटुंबातील महिलांना गलिच्छ ट्रोल करणारी ही मानसिकता काय सांगते?

ठळक मुद्देसमाजमाध्यमात दिसणारा हा समाजाचा चेहरा भयंकर नाही?

प्रियदर्शिनी हिंगे

भांडणं-वाद पुरुषांमध्ये झाले तरी शिव्या आई-बहिणींवरून देणं हे तसं समाजात काही नवीन नाही; मात्र आताशा समाजमाध्यमातही तेच घडतं. वाद राजकीय असो वा सांस्कृतिक, अगर अगदी वैयक्तिक असो, राजकीय नेत्यांपासून खेळाडू आणि अभिनेते ते सामान्य माणसं असो, त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करताना समाजमाध्यमात त्यांच्या पत्नी, आई, मुली, बहिणी यांच्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली जाते. त्यांना शिवीगाळ होते, ट्रोल केलं जातं आणि ट्रोलिंगची पातळी इतकी खालावलेली असते की वर्षभराच्या नसलेल्या मुलीवर बलात्कार करू इतपर्यंत म्हणण्याची बिभत्स पातळी ट्रोलर्स गाठतात. हे सारं आपल्या समाजाचं कोणतं चित्र दाखवतात?

अलीकडची काही उदाहरणं पाहू..

टी -२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली कप्तान म्हणून कमी पडला, संघ हरला तर त्याच्या वर्षभराच्याही नसलेल्या लेकीला ट्रोल करण्यात आलं. बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या. यापूर्वीही त्याच्या कामगिरीसाठी त्याच्या पत्नीला अनुष्काला ट्रोल करण्यात आलं होतं.

त्याआधी आयपीएलमध्ये आरसीबी संघातील ऑलराउंडर खेळाडू डॅनियल क्रिश्चियनलाच नाही तर त्याच्या जाेडीदारालाही ट्रोल करण्यात आलं. ते सारं त्याला इतकं अवघड झालं की, त्यानं कळकळीने आवाहन केलं की, माझ्या गर्भवती पार्टनरला तरी ट्रोल करू नका.

भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळीही किती सहजपणे विनोद फिरतात की, आफ्रिदीच्या आईला आज उचक्या लागणार! आता तर अजून एक नवा शाहीन आफ्रिदीही आला आहे.

अजून एक ताजं उदाहरण शाहरुख खानच्या मुलीचं. आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पुढे जामीन मिळाला. त्यावरून भयंकर वाद-प्रतिवाद रोज सुरू आहेत; मात्र त्या साऱ्यात सोशल मीडियावर शाहरुखची मुलगी सुहानालाही प्रचंड ट्रोल करण्यात आले. गलिच्छ भाषेत ट्रोलिंग झालं. तिला लोकांनी जाब विचारायला सुरुवात केली. तिने मग कमेण्ट सेक्शन बंद करून टाकलं.

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलीचे साराचेही ट्रोलिंग झाले. साराने टाकलेल्या एका फोटोला आर्यन खानने लाईक केले होते म्हणून त्याच्या संदर्भात तिला प्रश्न करण्यात आले.

या साऱ्या घटना काय सांगतात?

वाद कुठलाही असो, संबंधित व्यक्तिंच्या घरातील महिलांना अतिशय गलिच्छ शब्दात ट्रोल करणं, शिवीगाळ करणं, घाणेरड्या शिव्या देणं हे सारं आपल्या समाजाचा कोणता चेहरा दाखवतं?

सारा, अनुष्का, सुहाना या सगळ्या आपआपल्या दुनियेत खासगी आयुष्यात कशा आहेत, याचा न्यायनिवाडा नेटकरी ॲानलाइन करून मोकळे?

ज्या चुका त्यांनी केलेल्याच नाहीत, त्यासाठी त्यांना जाब विचारण्याचा, शिवीगाळ, ट्रोल करण्याचं काय कारण?

मात्र समाजमाध्यमात हे वारंवार घडतं. ट्रोलिंगची भाषा यावर तर बोलणंच नको. वाचवत नाहीत अशा शब्दांत कमेण्ट केल्या जातात; मात्र यावरून काही प्रश्न नक्की विचारायला हवेत?

ज्या चुका स्त्रियांनी केलेल्या नाही, त्यासाठी त्यांना गुन्हेगार ठरवत, जाब विचारणं ही मानसिकता भयानक नाही का?

कुणी पुरुष चुकला, किंवा त्याच्यावर टीका करायचीच असेल तर ती सरळ त्यावर करावी, त्याच्या कुटुंबातील अगदी लहान मुलींवर घाणेरडे शेरे मारणे, त्यांचे फोटो फिरवणे, त्यांना ट्रोल करणे, हे सारं भयंकर नाही?

समाजमाध्यमात दिसणारा हा समाजाचा चेहरा भयंकर नाही?

-उत्तरं कुणी कुणाला द्यायची?

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

टॅग्स :सोशल मीडियारिलेशनशिपअनुष्का शर्मासुहाना खान